Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

या वर्षी मुबलक खत व बियाणे- कृषीमंत्री
औरंगाबाद, २९ मे/खास प्रतिनिधी

गतवर्षी खताचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे यंदा कृषी विभागाने खताच्या साठय़ासाठी राज्य सरकारची हमी घेऊन कर्ज काढले. ३ लाख मेट्रिक टन खतांचा संरक्षित साठा यंदा करण्यात आला आहे. त्यामुळे खताची टंचाई भासणार नाही तसेच बियाणांचीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. येथील वाल्मी सभागृहात औरंगाबाद विभागातील खरीप हंगामाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कृषी आणि सोयाबीनची बियाणे महाबीजच्या माध्यमातून दिली जात आहेत. बी.टी. पाकिटांच्या किमती पूर्वी १८०० रुपये होते. राज्य शासनाने हे दर ६५० आणि ७५० रुपयांवर आणले आहेत.

अफलातून
दिल्लीचा कुतुबमीनार मला नेहमीच मोह घालतो. त्याची नितांत वैयक्तिक कारणं आहेत. एक तर कुतुबमीनार ट्रॅजेडी आणि साहिरची प्रसिद्ध नज्म ‘कही और मिल कर मुझसे’ यांची सांगड घालून एक कथा मी फार वर्षांपूर्वी लिहिली होती. दुसरं कारण म्हणजे ‘तेरे घर के सामने’मधलं ‘दिल का भंवर करे पुकार’ या गीताचं दिग्दर्शक विजय आनंदनं कुतुबमीनारच्या पायऱ्या उतरताना देव-नूतनवर केलेलं अफलातून चित्रांकन! या गाण्यामध्ये गीत, संगीत व अभिनयामुळे जसा गोडवा आला आहे, तसाच तो कुतुबमीनारचा केलेला कलात्मक वापर यामुळे अधिकच वाढला आहे. कुतुबमीनार आवडायचं तेही एक कारण आहे.

कापूस व सोयाबीनच्या रोग आणि किडीवर कृषी खाते राबविणार अभिनव योजना
औरंगाबाद, २९ मे/खास प्रतिनिधी

जागतिक पातळीवर पर्यावरणात मोठय़ा प्रमाणावर बदल होत आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गारपीट वाढली आहे. वादळ, वारे वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याने भारतातील अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे कृषी व जलसंधारणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. कापूस व सोयाबीन - रोग आणि कीड यावर हा भारतातील प्रयोग होणार आहे.

कुक्कुटपालन केंद्राच्या रेकॉर्ड रूमला आग
परभणी, २९ मे/वार्ताहर
येथील गंगाखेड रस्त्यावरील अनुसया टॉकीजसमोर असलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील रेकॉर्ड रूमला आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागून या रेकॉर्ड रूममधील कार्यालयाची संपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली.गंगाखेड रस्त्यावर गोरक्षण परिसरात असलेल्या कुक्कुटपालन केंद्र गेल्या कित्येक दिवसांपासून अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात मात्र तिथे सर्वच बाबींची वाण आहे. या कुक्कुटपालन केंद्रात सध्या एकही पक्षी नाही. कुक्कुटपालन केंद्राचे एलडीओ देशमुख हे सुट्टीवर असल्याने कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. केवळ सेवक आणि वॉचमनच्या भरवशावर संपूर्ण कार्यालय सोडून इतरत्र भटकत असतात. या परिसरात नेहमीच चोऱ्यांचे सत्र चालू आहे. कुक्कुटपालन केंद्राच्या इमारतीची इतकी वाईट अवस्था आहे की, कुक्कुटपालन केंद्रातील कार्यालयातील खिडक्यांना पटदेखील चोरटय़ांनी ठेवलेले नाहीत. या कार्यालयाकडे वरिष्ठांचेदेखील कमालीचे दुर्लक्ष असते. त्यामुळे या कार्यालयातील कारभार रामभरोसे चालू आहे.

अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या परप्रांतीयाला राजस्थानमध्ये अटक
गंगाखेड, २९ मे/वार्ताहर
येथील डॉ. आंबेडकर नगरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवीत राजस्थान राज्यात पळवून नेत बेकायदेशीर लग्न करणाऱ्या नेमीचंद कान्हाराम चौधरी (वय ४०, रा. डोणी, ता. जि. राजस्थान) या परप्रांतीयास गंगाखेड पोलिसांनी २५ मे रोजी राजस्थानमध्ये अटक करून आज शुक्रवारी सदर मुलीला घरी आणून सोडले.याबाबत विमल मुंजाभाऊ उजगरे (रा. आंबेडकरनगर) यांनी २३ मे रोजी फिर्याद देऊन आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन राजस्थानमध्ये बेकायदेशीर लग्न केल्याची फिर्याद दिली. त्यावरून गंगाखेड पोलिसांनी एक खास पथक तयार करीत राजस्थान राज्यातील डोणी (ता. जि. फत्तेपूर) येथे पाठविले होते. पथकात आर. के. कंधारकर, हेड-कॉन्स्टेबल अशोक ताटे, अशोक हांडे यांचा समावेश होता. या पथकाने आरोपी नेमीचंद चौधरी व मुलीस ताब्यात घेऊन आरोपीला डोणी पोलिसांच्या ताब्यात दिले व मुलीस गंगाखेडला पालकांच्या ताब्यात दिले.

पत्नीच्या जाचास कंटाळून शिक्षकाची आत्महत्या!
नांदेड, २९ मे/वार्ताहर

गेल्या चार वर्षांपासून पत्नीकडून होणाऱ्या जाचास कंटाळून मुक्रम लालू पवार या ४२ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केली.सिडको परिसरात राहणारे शिक्षक मुक्रम पवार यांचा गुरुवारी सिडको परिसरात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली होती. परंतु रात्री रमेश पवार यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुक्रम पवार यांची पत्नी सुमनबाई पवार हिला अटक केली आहे. गेल्या चार वर्षांपासून सुमनबाई पतीस त्रास देत होती. तसेच ती बाहेरख्याली होती. पत्नीकडून होणाऱ्या सततच्या छळाला वैतागून मुक्रम पवार याने आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूस पत्नीच कारणीभूत आहे, अशी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. पतीच्या छळाला कंटाळून पत्नीच्या आत्महत्या सातत्याने होत असल्यातरी पत्नीच्या छळाला वैतागून पतीने आत्महत्या करण्याची घटना विरळच मानली जाते.

घराची भिंत कोसळून चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू
नांदेड, २९ मे/वार्ताहर

भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आसियाखान अरबनखान या चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री हिमायतनगर शिवारात ही घटना घडली.यवतमाळ जिल्ह्य़ातल्या पुसद येथील आसियाखान ही आपल्या आईसोबत मामाकडे म्हणजे मिर्झाबेग यांच्याकडे उन्हाळी सुटय़ा घालविण्यासाठी आली होती. सायंकाळी साडेपाच वाजता आसियाखान खेळत होती व तिची आई कपडे धूत होती. पाण्याच्या शोधात भटकंती करणारी वानराची एक टोळी उडय़ा मारत मिर्झा बेग यांच्या घरावर आली. कमकुवत असलेल्या भिंतीमुळे वानरांच्या उडय़ांनी भिंतीचा एक भाग कोसळला. यात आसियाखानचा मृत्यू ओढवला.

गेवराई तालुक्यात शिक्षकांच्या १३१ जागा रिक्त
गेवराई, २९ मे/वार्ताहर
तालुक्यात १३१ शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. अपुऱ्या शिक्षकांमुळे अनेक गावांत एका शिक्षकाला दोन दोन वर्ग सांभाळावे लागत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षांत ही रिक्त पदे भरली जावीत, अशी अपेक्षा पालक करीत आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची १०, प्राथमिक पदवीधर ४७ तर प्राथमिक शिक्षकांची ७४ अशी एकूण १३१ पदे रिक्त आहेत. या वर्षीच्या समायोजनामध्ये सहशिक्षकांच्या १९ जागा कमी झाल्या आहेत. तसेच १५ पदांची निर्मिती झाली आहे. या वर्षीच्या सहयोजनांमध्ये विद्यार्थी संख्या घटल्यामुळे पांढरवाडी, गुळज, पाथरवाला (बु.), राक्षसभुवन, खांडवी, पाचेगाव, बंगाली पिंपळा, गायकवाड जळगाव, माध्यमिक शाळा- उमापूर, माध्यमिक शाळा- धोंडराई, उर्दू शाळा- हिवरवाडी या जि. प. शाळांमधील १९ शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. केंद्रीय शाळा धोंडराई, सुरळेगाव, गुंतेगाव गुळज, तळेवाडी, सिरसदेवी, गामचारी तांडा, सिरसदेवी, एरंडगाव, बंगाली पिंपळा, उमापूर, मालेगाव तलवाडा, आंतरवाली (उर्दू), गढी (उर्दू), चोरपुरी या शाळांना अतिरिक्त झालेली १९ पदे गरजेनुसार जोडण्यात आली आहेत. याशिवाय १५ नव्या शाळांची निर्मिती करण्यात आली आहे.

कळंबच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आतिया शेख
कळंब, २९ मे/वार्ताहर
कळंब नगरपालिकेच्या इतिहासामध्ये अडीच वर्षांमध्ये चार नगराध्यक्षांचा कारभार कळंबच्या जनतेस पाहावयास मिळाला. आता फक्त वीस दिवसांच्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतिया सलीम शेख यांची निवड करण्यात आली. या नगरपालिकेच्या त्या पहिल्या मुस्लिम नगराध्यक्षा आहेत. या पूर्वी सेनेचे नरसिंग जाधव यांनी पावणेदोन वर्षे नगराध्यक्ष पदाचा कारभार केला. त्यानंतर दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन श्री. जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणला. त्यात त्यांना पायउतारव्हावे लागले. यानंतर तीन महिन्यांसाठी काँग्रेसचे गटनेते शिवाजी कापसे हे अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विद्यमान उपाध्यक्षा आशाताई भवर या महिन्याभरासाठी प्रभारी नगराध्यक्षा झाल्या. आचारसंहिता संपल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या करारानुसार शिवाजी कापसे यांनी राजीनामा दिला. वीस दिवसांचा कालावधी नूतन नगराध्यक्षासाठी मिळणार असून, यासाठी ज्येष्ठ नगरसेवक सलीम मिर्झा, गटनेते संजय मुंदडा हे शर्यतीमध्ये होते. परंतु पक्षश्रेष्ठींनी मुस्लिम समाजाच्या आतिया सलीम शेख यांना नगराध्यक्षपद बहाल केले.

महिलेची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या
परळी वैजनाथ, २९ मे/वार्ताहर

परळी रेल्वे स्थानकातून निघालेल्या रेल्वेखाली गुरुवारी सायंकाळी एका महिलेने आत्महत्या केली. रेल्वे मार्गाच्या जवळच असलेल्या गौतमनगरमध्ये राहणारी निर्मल उत्तम सूर्यवंशी (वय ३३) ही विवाहित महिला सायंकाळी पाचच्या सुमारास रेल्वे मार्ग ओलांडून शौचालयास जात असताना आणि त्याच वेळी परळी रेल्वे स्थानकातून परभणीकडे निघालेली उस्मानाबाद- निझामाबाद रेल्वेखाली आल्याने ती जागीच ठार झाली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

‘राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना बीड जिल्ह्य़ात राबवावी’
गेवराई, २९ मे/वार्ताहर
दारिद्रयरेषेखालील कुटुंबाकरिता राज्य सरकारने आरोग्य विमा योजना राबविण्याचे धोरण जाहीर केले आहे. ‘राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना’ ही बीड जिल्ह्य़ात तात्काळ राबवावी, अशी मागणी समता परिषदेने केली आहे. प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, या विमा योजनेअंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटुंबाकरिता आरोग्य विमाचा लाभ होणार आहे. ही योजना ग्रामीण व शहरी भागासाठी असून लाभार्थ्यांचा हप्ता केंद्र व राज्य सरकार भरणार आहे. या योजनेअंतर्गत ७२५ प्रकारच्या शस्त्रक्रिया या विम्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेल्या आहेत. या योजनेंतर्गत कुटुंबाला ३० हजारांचा विमा उतरविण्यात येणार आहे.राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना बीड जिल्ह्य़ात तात्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी श्री. भालशंकर यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उन्हाळीवर्गाचा आज समारोप
औरंगाबाद, २९ मे/खास प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम विभागीय क्षेत्राचा उन्हाळी वर्ग सुरू आहे. हा वर्ग जटवाडय़ाच्या आर्य चाणक्य विद्याधाममध्ये चालू आहे. या वर्गाचा जाहीर समारोप शनिवारी सायंकाळी सहा वाजता सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी आणि शाकाहाराचे पुरस्कर्ते रतनलाल बाफना हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून गुजरातचे विभागीय कार्यवाह सुनीलभाई मेहता हे उपस्थित राहणार आहेत.

दुचाकी - मालमोटर अपघातात एक ठार, एक जखमी
हिंगोली, २९ मे/वार्ताहर

नांदेड येथील लेबर कॉलनीत राहणारे रवींद्र आश्रुजी हुंडे पाटील व त्यांचा मित्र राजरतन गायकवाड हे दोघे काल रात्री अकराच्यानंतर वारंगा-नांदेड रस्त्याने दुचाकीवरून नांदेडला जात असताना वरुड तांडा येथे अज्ञात मालमोटारीने दुचाकीला धडक दिल्याने रवींद्र हुंडे (वय २८ वर्षे) जागीच ठार झाले. राजरतन गंभीर जखमी झाले आहेत. संभाजी पांडुरंग हुंडे पाटील यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विकास कारखान्यावर वृक्षारोपण
लातूर, २९ मे/वार्ताहर
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विकास कारखान्यावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी विकास को.ऑप. बँकेचे उपाध्यक्ष विद्यासागर शेरखाने, विकास कारखान्याचे उपाध्यक्ष विजय देशमुख, कार्यकारी संचालक एस. डी. बोखारे, सरव्यवस्थापक आर. बी. माने, संचालक दयानंद पुरी, राजेंद्र मस्के, ज्ञानोबा शेंडगे, राजकुमार झुंजे पाटील, िलबराज पवार, गुरुनाथ गवळी, महादेव मुळे आदी उपस्थित होते. एस. डी. बोखारे म्हणाले कारखान्यास पर्यावरण संतुलनाचे १४००१-२००४ हे नामांकन मिळाले आहे. पर्यावरणाचे नामांकन मिळविणारा विकास कारखाना सहकार क्षेत्रातील एकमेव कारखाना ठरला आहे.

राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणीवर मंगल पांडे
परभणी, २९ मे/वार्ताहर
राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी येथील मंगल पांडे यांची निवड झाली.परिषदेची बैठक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. या बैठकीस राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश वरपूडकर, मदन पाटील, आमदार भाई जगताप, आमदार रमेश कदम, प्रा. गणपतराव माने, कार्याध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्य़ांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत राज्यातून नऊ सदस्यांची कार्यकारी मंडळावर निवड करण्यात आला. त्यामध्ये श्री.पांडे यांची निवड झाली आहे. श्री. पांडे यांनी गेल्या २५ वर्षांत कबड्डीच्या विकासासाठी, प्रचारासाठी अविश्रांत परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या कार्यामुळे गेल्यावर्षी राज्यातील सवरेत्कृष्ट कार्यरत जिल्ह्य़ाचा पुरस्कार परभणीला मिळाला. जिल्ह्य़ातील ग्रामीण खेळाडूंना ते प्रोत्साहन देत असतात.

आयबीएमकडून ‘कॉक्सिट’ ला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मान्यता
लातूर, २९ मे/वार्ताहर

जगातील नामांकित आयबीएम कंपनीने येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाला (कॉक्सिट) सेंटर ऑफ एक्सलन्सची मान्यता दिली असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. या मान्यतेमुळे आयबीएमच्या थेट सेवा विद्यार्थ्यांना मिळतील. मेन फ्रेम ट्रेनिंग, आय सेरीज, ए एस ४०० आदी प्रशिक्षणाची सोय महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारच्या प्रशिक्षण बंगळुरु, पुणे, हैदराबाद व लातूरमध्ये उपलब्ध आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. पाटील यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग
जालना, २९ मे/वार्ताहर

बजाज एंटरप्रायझेस या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानास आग लागून मोठी हानी झाली. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या या दुकानास लागलेल्या आगीत दूरचित्रवाणी संच, फ्रीज, एअरकुलर, एअरकंडिशनर इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
बीड, २९ मे/वार्ताहर
कौटुंबीक वादातून एका ५५ वर्षीय महिलेने जिल्हाधिकारी कचेरीसमोर आत्मदहन करण्यचा प्रयत्न केला. आपल्या पतीला सुनेच्या भावाने पळविले आहे. पण पोलीस दखल घेत नाहीत असा आरोप या महिलेने केला असून तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. केज तालुक्यातील विडा येथील लक्ष्मीबाई मनोहर दुनघव (वय ५५) यांच्या कुटुंबात नेहमी वाद होत. या वादातून सुनेने आपल्या भावाला सांगून लक्ष्मीबाईचा पती मनोहर दुनघव यांना पळवून नेले. या संदर्भात आपण केज पोलीस ठाण्यात तक्रार केली; परंतु पोलिसांनी दुर्लक्ष केले असा आरोप लक्ष्मीबाई यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करत काल त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. पेटवून घेणार तेवढय़ात शिवाजीनगर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले.

नांदेडच्या तापमानात वाढ
नांदेड, २९ मे/वार्ताहर

शहरातल्या तापमानात गेल्या दोन दिवसांत अचानक वाढ झाल्याने नांदेडकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. उन्हामुळे दिवसभर रस्ते ओस पडले होते.नांदेडमध्ये आज ४२.५ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदले गेले. शहरातल्या तापमानात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात नांदेडचे तापमान ४३ अंश सेल्सियस इतके गेले होते. गेल्या आठवडय़ात तापमान कमी झाले. जिल्ह्य़ाच्या काही भागात झालेल्या बेमोसमी पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढले आहे. उन्हामुळे उष्माघात, गॅस्ट्रो तसेच तापाच्या आजाराची साथ काही भागात पसरली आहे.