Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

धोनी ब्रिगेड निघाली पुन्हा विश्वचषक जिंकायला
मुंबई, २९ मे / क्री. प्र.

 

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘ट्वेण्टी-२०’ क्रिकेटचे विश्वविजेतेपद राखण्यासाठीच्या मोहिमेवर भारतीय क्रिकेट संघ आज रवाना झाला. आयपीएल स्पर्धा खेळून दक्षिण आफ्रिकेहून नुकत्याच परतलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा उत्साहाचे उसने अवसान घेतले होते. जायबंदी झहीर खान स्पर्धेआधी तंदुरुस्त होणार या आशेने मात्र या संघात उत्साहाचे वारे संचारले होते. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरच एका हॉटेलात भारतीय संघाने काल परवापासून तळ ठोकला होता. धोनी, सेहवाग, युवराजसिंग, हरभजन या बिनीच्या मोहऱ्यांनी या अवधीतही आपल्या जाहिरातदारांना नाराज केले नाही. सरावाच्या वेळेत आपापली जाहिरातींची कामे संपवून, संघ विश्वचषक विजेतेपद राखण्यासाठी लंडनकडे रवाना झाला. भारतीय संघाचे चाहते सुरक्षाकवच भेदून हॉटेलमध्ये पोहोचू शकले नाहीत. पण विमानतळावर मात्र संघाला शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी होती.
भारतीय संघाने प्रयाणाची वेळही बदलली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रात्री ९ नंतर भारतीय संघाचे प्रयत्न होणार होते; परंतु संघाने शुक्रवारी दुपारीच लंडनची वाट धरली.
कर्णधार धोनीची पत्रकार परिषद सकाळी लवकर उरकण्यात आली. तीच घाई आणि गडबड खेळाडूंच्या अल्पोपहाराच्या हॉटेलमध्येही दिसत होती. एकमेकांची थट्टा-मस्करी करीत अल्पोपहाराचा आस्वाद घेणाऱ्या या खेळाडूंची छबी टिपण्यासाठी शेकडो कॅमेरामन सजग होते. खेळाडूंच्या जवळ जाण्यास असलेला मज्जाव कॅमेऱ्यांच्या लेन्सेसनी मात्र सहजपणे झुगारला होता.