Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

भारतीय विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियात ‘पेट्रोल बॉम्ब’चा हल्ला
मेलबर्न, २९ मे/वृत्तसंस्था

 

भारतीय विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले वांशिक विद्वेषातून होत नसल्याचा कितीही दावा ऑस्ट्रेलियाई प्रशासन करीत असले, तरी हल्ल्यांचे प्रमाण मात्र वाढत आहे. ताज्या घटनेत काल सिडनीमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांवर ‘पेट्रोल बॉम्ब’ने हल्ला करण्यात आल्याचे उघडकीस आले. हल्ल्यात विद्यार्थी ३० टक्के होरपळला असल्याचे वृत्त येथील भारतीय समुदायाचे स्थानिक वृत्तपत्र ‘साऊथ एशिया टाइम्स’ने दिले आहे. या आठवडय़ात झालेला हा चौथा हल्ला आहे.
राजेश कुमार असे या विद्यार्थ्यांचे नाव असून त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्रांनी हल्ल्यानंतर तात्काळ या विद्यार्थ्यांला ‘ब्लँकेट’मध्ये गुंडाळल्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळल्याचे वृत्तात म्हटले आहे.दरम्यान, ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून असे हल्ले होऊ नयेत यासाठी स्थानिक यंत्रणेने कठोर योजना आखावी, असे आवाहन भारताच्या ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त सुजाता सिंग यांनी प्रशासनाला केले आहे. हल्ल्यांप्रकरणी ऑस्ट्रेलियातील पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली असून, त्यातील एकावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले हे वांशिक विद्वेषाच्या हेतूने होत नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्याने केला आहे. भारतीय नागरिक सहजपणे बळी पडू शकतात म्हणून त्यांच्यावर हल्ले होत असून त्यात वांशिक विद्वेषाचा संबंध नाही, असे मेलबर्नचे पोलीस उपायुक्त काईरान वॉल्श यांनी आज स्पष्ट केले.
दरम्यान, गुरुवारी आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांला मेलबर्न ट्रेनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. सौरभ शर्मा असे या मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असल्याचे वृत्त ‘हेराल्ड सन’ने दिले आहे. या मारहाणीमध्ये शर्माच्या गालाचे हाड तसेच एक दात तुटला आहे. रेल्वेमधील ‘क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरा’तील फूटेजवरून हल्लेखोर स्पष्ट दिसत आहेत. शर्माला हल्लेखोरांकडून वांशिक अपशब्दांना सामोरे जावे लागल्याचे त्याने ‘हेरॉल्ड सन’ला सांगितले.
ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यास जबाबदार असलेल्या आणखी दोषींना पकडण्यासाठी तसेच भारतीय समुदायावर होणारे हल्ले थांबविण्यासाठी ‘फूटस्कॅरी एम्बोना टास्कफोर्स’ कार्यरत असल्याची माहिती मेलबर्न पोलीस उपायुक्तांनी दिली.