Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

मेटेंसारखी विषवल्ली जनतेने उखडून फेकावी- मधू चव्हाण
मुंबई, २९ मे/प्रतिनिधी

 

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या अध्यक्षतेखाली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नियुक्ती करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायक मेटे यांनी करून जातीयवादाचे व विद्वेषाचे संतापजनक व हिडीस प्रदर्शन केले आहे ते केवळ निषेधार्ह नाही तर ही विध्वंसक विषवल्ली येथेच उखडून फेकून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जनतेने एकत्र येणे आवश्यक आहे, अशा तीव्र शब्दांत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार मधू चव्हाण यांनी हल्ला केला. पुरंदरे यांची नियुक्ती सरकारने रद्द केली तर भाजप त्या विरोधात संघर्ष करील, असा इशारा प्रदेश सरचिटणीस आमदार विनोद तावडे यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता विनायक मेटे यांनी मुंबईत शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या मेळाव्याला मधू चव्हाण हजर होते तर विनोद तावडे यांनी त्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र पुरंदरे यांच्या हकालपट्टीच्या मुद्दय़ावरून भाजपमधील या मराठा समाजाच्या नेत्यांनी मेटे यांना लक्ष्य केले आहे. चव्हाण म्हणाले की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व सरळ व प्रभावी भाषेत जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. त्या बदल्यात त्यांनी कोणताही राजकीय स्वार्थ साधला नाही. परंतु मराठय़ांच्या हिताचा ठेका जणू आपल्याकडेच आहे, सगळ्या मराठय़ांचे नेते आपणच आहोत अशा मिजाषित मेटे यांनी राहू नये. ‘मराठा’ शब्दाचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आपल्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी मेटे व त्यांचे साथीदार उपयोग करीत आहेत. पुरंदरे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला विरोध करून मराठा समाजाच्या भावनेवर स्वतची राजकीय पोळी भाजून घेणारे मेटे, खेडेकर हे मराठा समाजालाच बदनाम करीत आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावे. मेटे व खेडेकर हे शिवस्मारकाच्या विषयात विधायक सूचना करण्यासाठी जर आपली अक्कल कामास आणतील तर ते स्वागतार्ह ठरले असते. राज्य शासनाने अशी आगलावी प्रवृत्ती वेळीच ठेचावी. विनोद तावडे म्हणाले की, मराठा समाजाचे भावनिक राजकारण करण्याच्या नादात आपण काय बोलत आहोत याचे भान मेटे, खेडेकर यांना राहिलेले नाही. शिवरायांचा पराक्रम सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम पुरंदरे यांनी केले. परंतु आपली राजकीय पोळी भाजण्याच्या नादात त्यांच्यावर केली गेलेली टीका घृणास्पद आहे. भावनेच्या राजकारणाच्या भरात मेटे, खेडेकर जे कृत्य करीत आहेत त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे.