Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडेच
मुख्यमंत्र्यांनी मेटे, खेडेकर यांना फटकारले
मुंबई, २९ मे / खास प्रतिनिधी

 

मुंबईतील नियोजित शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला असतानाच समितीचे अध्यक्षपद आपल्याकडेच असल्याचे सांगून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला कोणी सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर आक्रमक झालेल्या विनायक मेटे व खेडेकर या मराठा संघटनांच्या नेत्यांना हाणला आहे.
स्मारक समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे यांची निवड झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून त्याची तीव्र प्रतिकिया उमटली होती. मेटे व खेडेकर यांनी पुरंदरे यांच्या नियुक्तीस विरोध केला होता. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी पुढे सरसावले होते. हा वाद चिघळणार अशी चिन्हे असतानाच मुख्यमंत्र्यांनी स्मारक समितीचे अध्यक्षपद आपल्याकडेच असल्याचे स्पष्ट केले आहे. मेटे व खेडेकर यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, मला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये आणि कोणाचा सल्ला घ्यायचा हे मी ठरवेन, असे सांगून मेटे व खेडेकर यांना चांगलेच फटकारले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्टय़ा त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री कोणताही निर्णय घेणार नाहीत, अशीच एकूण चिन्हे आहेत.