Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

..तर राज ठाकरे यांना उभा महाराष्ट्र आडवा केल्याशिवाय राहणार नाही
मुंबई, २९ मे / प्रतिनिधी

 

सगळ्या महाराष्ट्राच्या हिताचा मक्ता घेतल्यागत बोलण्याची सवय लागलेल्या राज ठाकरे यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, म्हणजे आपण काय लायकीचे आहोत ते त्यांच्या लक्षात येईल. अध्र्या हळकुंडाने पिवळे पडल्यागत राज ठाकरे नको त्या गोष्टीत नाक खुपसून अपुऱ्या माहितीच्या आधारावर वाटेल ती बकबक करीत आहेत. खरे तर राज ठाकरे महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाच पर्यावरणाच्या व अन्य विकासाच्या नावाने तीव्र विरोध केला होता हे कदाचित ठाकरे महाशय विसरले असतील, पण शिवप्रेमी जनता विसरली नाही. त्यामुळे छत्रपती शिवरायांविषयी आदराची भावना नसलेल्या माणसाला या संदर्भात खरेतर कुठलेही वक्तव्य करण्याचा अधिकारच उरत नाही. यामुळे त्याचे खरे रूप लोकांसमोर आलेले आहे. केवळ राजकारणाला राजकारण करून छत्रपती शिवरायांविषयी नको तो वाद करणाऱ्या राज ठाकरे यांना उभा महाराष्ट्र आडवा केल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे.
या संदर्भातील प्रसिद्धीपत्रकात मेटे म्हणतात, की आपण छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या कोणत्याही समितीवर नसताना या समितीवरून मला दूर करण्याची मागणी करणे, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी मी कुठलेही चुकीचे वक्तव्य केले नसताना (व्यक्तिश: मला त्यांच्याविषयी आदरच आहे) परंतु माझी सुरुवातीपासूनची (आत्ताची नव्हे) भूमिका आहे, की या स्मारकाची मोठी व्याप्ती पाहता त्यासाठी लागणारा वेळ, पैसा, आवश्यक त्या परवानग्या आणि वेळेवर स्मारक पूर्ण व्हावे याकरिता स्मारकाच्या अध्यक्षपदी पदसिद्ध मुख्यमंत्री (व्यक्तिश: अशोकराव चव्हाण नव्हे) असावेत. याव्यतिरिक्त या स्मारकासाठी ज्यांची ज्यांची मदत घेणे आवश्यक वाटेल ती मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, त्यास आमचा विरोध असायचे काहीही कारण नाही; परंतु माझ्या या भूमिकेची माहिती न घेता ऐकीव माहिती घेऊन त्याचा विपर्यास करून त्याला जातीचा रंग देणाऱ्या राज ठाकरे यांनी बेताल बडबड करू नये.
राज ठाकरे यांनी हे लक्षात घ्यावे, की देवाने फक्त तुम्हालाच हात दिलेले नाहीत. आमच्याही बाजूने हजारोच नाही तर लाखो हात उठतील; पण आमची ती संस्कृती नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झाडावर नको असलेले तुमच्यासारखे बांडगूळ बाळासाहेबांनी आणि शिवसेनेनी वेळीच छाटले नाही याचा पश्चाताप बाळासाहेबांना आणि शिवसेनेला आजही होताना दिसतो आहे ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही, याकडेही मेटे यांनी लक्ष वेधले आहे. विनायक मेटे पुढे म्हणतात, की मी कुणाचा इतिहास लिहील की नाही ते माहीत नाही; परंतु महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी राज ठाकरे यांनी आपल्या सख्ख्या काकांचाच कसा विश्वासघात केला व त्यांच्या मुळावरच उठले हा इतिहास मात्र लिहिला असेल तो मात्र ठाकरे यांनी जरूर वाचावा. सगळ्या धर्मातल्या लोकांना सामावून घेऊन राज्य करणाऱ्या छत्रपती शिवरायांविषयी जर त्यांना खरोखरच आदर असता तर परप्रांतियांशी लढाया करण्याची गुंडगिरीची भाषा त्यांच्या तोंडी आली नसती. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर घाला घालणाऱ्या राज ठाकरे यांनी आम्हाला महाराष्ट्रधर्म शिकवू नये. अर्थात ज्यांनी घरभेदीपणा केला त्याला हे कळणार नाही म्हणा. महाराष्ट्राचे केवळ आपणच मसिहा असल्यागत अहंपणाचे बोलणे राज ठाकरे यांनी आता तरी सोडावे आणि खऱ्या अर्थानी थोडे तरी समाजकार्य करावयाचा प्रामाणिक प्रयत्न करावा. अपुऱ्या ज्ञानावर सतत राजकीय स्टंटबाजी करून लोकांची दिशाभूल करणे बंद करावे, असा सल्लाही मेटे यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.