Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी जीआर जारी
प्रवेश प्रक्रिया चालणार ३५ दिवस
मुंबई, २९ मे / प्रतिनिधी

 

यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शासन निर्णय (जीआर) अखेर आज शालेय शिक्षण विभागाने जारी केला. एमएमआरडीए क्षेत्रातील (मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्य़ातील) अकरावीचे प्रवेश केवळ ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने प्रवेश देण्यात येणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे महाविद्यालय स्तरावर अर्ज सादर करण्याचा पर्याय विद्याथ्यार्ंसाठी यंदा उपलब्ध असणार नाही. मात्र अल्पसंख्याक महाविद्यालयातील ५० टक्के व एमसीव्हीसी अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर होतील, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
एमएमआरडीए क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने ७०:३० कोटय़ाची अंमलबजावणी होणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संदिग्ध उल्लेखामुळे ७०:३० कोटय़ाची अंमलबजावणी जिल्ह्य़ाऐवजी ‘एमएमआरडीए क्षेत्र व त्याबाहेरील क्षेत्र’ अशा पद्धतीने राबविण्यात येणार अथवा नाही, याबाबत काहीच उलगडा या आदेशामुळे झाला नसल्याचे स्पष्ट होते. दहावीतील टक्केवारीनुसार की ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार अकरावीसाठी प्रवेश देणार याबाबतही त्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. हा आदेश जारी झाल्यानंतर सर्व शंकाचे निरसन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यामधील संदिग्ध भाषेमुळे विद्यार्थी-पालकांचा गोंधळ उडण्याची शक्यताच अधिक असल्याचे बोलले जात आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया अचूकपणे पार पाडण्याची तांत्रिक जबाबदारी एमकेसीएलवर सोपविण्यात आली आहे. एमकेसीएल व शालेय शिक्षण विभाग यांच्यात याबाबत एक करारही करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच प्रवेश अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया निकालानंतर सात दिवस चालेल. या सात दिवसांत विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची संधी मिळणार नाही. विद्यार्थ्यांना सायबर कॅफे, मित्र, नातेवाईक, शाळा, महाविद्यालये अथवा एमकेसीएलच्या अधिकृत केंद्रावरील संगणकांद्वारे ऑनलाइन अर्ज भरता येईल.
या अर्जाच्या दोन प्रिंटआऊट्स काढून त्या शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या अधिकृत सबमीशन सेंटरवर सव्वाशे रूपये शुल्कासह सादर कराव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दहावीच्या निकालानंतर दहाव्या दिवसापासून पुढील आठ दिवस गुणवत्ता याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू राहील. अकरावीच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी ३५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत एकूण तीन प्रवेश याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यानंतरही रिक्त जागा राहिल्यास महाविद्यालयांना इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची अनुमती देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून ऑनलाइन प्रक्रियेत अनेक त्रुटी असून त्यामुळे विद्यार्थी-पालकांना नाहक त्रास होणार आहे.