Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

प्रादेशिक

धारावी फेस्टिव्हलचा ब्रँड अँबेसेडर जॉनी लिव्हर
प्रिन्स चार्ल्सही हजेरी लावणार
समर खडस
मुंबई, २९ मे

धारावीच्या पुनर्विकासाच्या एका सेक्टरचा आराखडाही आता जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या विकासाला सुरुवात झाली की हाहा म्हणता काही वर्षांतच जुनी धारावी नामशेष होणार आहे. मुंबई महानगरीला सेवा पुरविणारी आणि पितळेच्या वस्तुंपासून ते चर्मोद्योगापर्यंत तसेच मिठाया, फरसाणापासून ते मातीच्या भांडय़ापर्यंत अनेकविध उद्योगांचे केंद्र असलेल्या या आशिया खंडातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीचा ‘धारावी महोत्सव’ नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

प्रधानांचा अहवाल शहीदांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळणारा -गडकरी
मुंबई, २९ मे/प्रतिनिधी

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबत राज्य शासन व मुंबई पोलीस यांना क्लिन चिट देणारा राम प्रधान समितीचा अहवाल म्हणजे त्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांच्या तसेच मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातलगांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली.

‘अतिवरिष्ठ अधिकारीही नेतृत्त्वात कमी पडले’
चौकशी समितीतील एका सदस्याने दिली ‘ब्लॉग’वर माहिती
मुंबई, २९ मे / प्रतिनिधी
२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याला तोंड देताना मुंबई पोलिसांतील अतिवरिष्ठ अधिकारीही नेतृत्त्वात कमी पडल्याचे दोन सदस्यांच्या चौकशी समितीने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी आठ गंभीर चुका केल्या आहेत. याशिवाय अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची प्रक्रिया पार पाडताना १६ चुका केल्या असून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी समितीने २४ शिफारशी केल्या आहेत.

मुंबईत ५५ ठिकाणी पाणी तुंबणार
मुंबई, २९ मे / प्रतिनिधी

पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये म्हणून कोटय़वधी रुपये खर्च करून योग्य त्या उपाययोजना केल्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाने शहरात किमान ५५ ठिकाणी पाणी तुंबणार असल्याची स्पष्ट कबुली आज दिली. पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये म्हणून पालिकेने नाल्यातील गाळ काढण्यासाठी १०८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मैंने किसी को नहीं मारा!
कसाबच्या उलटय़ा बोंबा..

मुंबई, २९ मे / प्रतिनिधी

सीएसटी, कामा परिसर, मेट्रो जंक्शन आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणी काही पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक निरपराधांचे बळी घेणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने आपण कोणालाही मारले नाही, असा पवित्रा घेत ‘मेरा फैसला कोर्ट ही करेगा’ अशी मुक्ताफळे आज उधळली. सुनावणीदरम्यान विनाकारण हसणाऱ्या कसाबला विशेष न्यायालयाने वेळोवेळी समज दिली आहे. बरेचदा फटकारलेही आहे. एवढे होऊनही कसाबच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही. इतकेच नव्हे तर पश्चात्तापाचा कोणताही लवलेष त्याच्या कृतीतून दिसून येत नाही.

‘टाटा मोटर्स’मध्ये महत्त्वपूर्ण नेतृत्व बदल; नफ्यात ५० टक्के घट
मुंबई, २९ मे/ व्यापार प्रतिनिधी

टाटा मोटर्सने आज आपल्या नेतृत्त्वात महत्त्वाच्या फेरबदलांची घोषणा केली. कंपनीचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक रवी कांत यांना बिगर-कार्यकारी उपाध्यक्षपदी तर प्रकाश तेलंग यांना भारतातील व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक अशी पदोन्नती दिली गेली आहे. दरम्यान सरलेले आर्थिक वर्ष कंपनीसाठी खूपच खडतर ठरले आणि वार्षिक निव्वळ नफा निम्म्याने घटल्याचे आज घोषित करण्यात आले.

‘तिरुपतीवारी’ची अखेर मुख्यमंत्र्यांकडून दखल
मुंबई, २९ मे / प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील डीसी रूल ३३ (७) अंतर्गत कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यासाठी ४०० सरकारी अधिकाऱ्यांना तिरुपतीवारी घडविणाऱ्या एका बडय़ा बिल्डरच्या प्रकरणाची अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दखल घेतली असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सुतोवाच केले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर ही कारवाई तात्काळ होईल, असे सांगितले जाते.

‘स्लमडॉग’मधील बालकलावंतांना मुख्यमंत्र्यांनी दिली म्हाडाची घरे
मुंबई, २९ मे/प्रतिनिधी

ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने जगातील असंख्य दर्शकांची मनेजिंकणाऱ्या बाल कलावंत अझहर इस्माइल आणि रुबिना अली कुरेशी यांना ‘म्हाडा’च्या सदनिका विशेष बाब म्हणून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आहे. मध्यंतरी अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई करताना या दोन्ही कलाकारांच्या झोपडय़ा पाडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे दोन्ही कलाकार अत्यंत व्यथित झाले होते. त्यांच्या घरासाठी ‘स्लमडॉग मिलिऑनर’चे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनीही पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. या पाश्र्वभूमीवर आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज निर्णय घेऊन म्हाडाची घरे या मुलांच्या कुटुंबासाठी मंजुर केली. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी ही मागणी केली होती. या घरांची प्रत्येकी चार लाख रुपये किंमत ही मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने भरण्यात येणार आहे. या कलावंतांना चांगल्या दर्जाचे जीवन जगता यावे व झोपडपट्टीतील जीवनाने त्यांच्या पुढील आयुष्यातील प्रगतीत कोणतेही अडथळे येऊ नयेत, असे वाटल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘बिग बझार’मध्ये सवलती व बक्षिसांची लयलूट
मुंबई, २९ मे/ व्यापार प्रतिनिधी

फ्युचर ग्रुपद्वारे प्रवर्तित हायपर मार्केटची शृंखला असलेल्या ‘बिग बझार’ने आपल्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईकर ग्राहकांसाठी विविध ऑफर व इनामांची योजना आखली आहे. रु. ४९९ व त्या पुढे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी बक्षिसे असलेल्या भाग्यवान सोडतीत सहभागी होता येईल. लोअर परळ येथील फिनिक्स मिल्समध्ये २००२ साली सर्वप्रथम पहिले ‘बिग बझार’ स्टोअर सुरू झाले. त्यानंतर मुंबई व उपनगरांत तब्बल १० स्टोअर्स सुरू झाले असून या सर्व स्टोअर्समध्ये हा वर्धापन दिन उत्सव ३० मेपासून ७ जून असा आठवडाभर सुरू राहील. सात दिवस चालणाऱ्या दैनंदिन सोडतीत धोनीची स्वाक्षरी असलेली क्रिकेट बॅट, होम थिएटर व डीव्हीडी ते ट्रॅव्हल व्हाऊचर्स तसेच ‘बम्पर लकी ड्रॉ’मध्ये लोढा-सिटी ऑफ ड्रीम्स संकुलात अपार्टमेंट, 'हुडांइ आय-१० मोटार, महिंद्र फ्लाइट बाइक, सात दिवसांची आंतरराष्ट्रीय सहल अशी बक्षिसे जिंकता येतील. या शिवाय खरेदीवर भरपूर सवलतीही ग्राहकांना उपभोगता येतील.

मुंबईतील बडय़ा टायर कंपन्यांवर विक्रीकर विभागाच्या धाडी
मुंबई, २९ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागातील अन्वेषण शाखेमार्फत मुंबईतील नामांकित टायर विक्रेत्यांकडे धाडी टाकून सुमारे २३ कोटी रुपयांचा संशयास्पद हवाला व्यवहार उघटकीस आणला आहे. त्यात डनलॉप इंडिया लि., मोनटोना टायर्स लि., फाल्कन टायर्स लि., गिरीश कमर्शियल प्रा. लि., परफेक्ट विनिमय प्रा. लि., तीर्थ ट्रेडर्स प्रा. लि. आणि जेसोफ आणि कंपनी लि. या व्यावसायिकांचा समावेश आहे. या कंपन्या या प्रत्यक्षात खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता खरेदी-विक्रीच्या बोगस पावत्या एकमेकांना देऊन त्या आधारे शासनाकडून कोटय़वधी रुपयांचा परतावा घेतात अशा प्रकारे फसवणूक करण्याची त्यांची कार्यपद्धती असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.

डॉ. रा. म. साठे यांचे निधन
मुंबई, २९ मे/प्रतिनिधी

अणुशास्त्रज्ञ, विचारवंत, प्राध्यापक डॉ. रामचंद्र साठे यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. डॉ. साठे प्रदीर्घ काळ भाभा अणुसंशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. याच काळात त्यांनी महिलांसाठी सोप्या, उपयुक्त व व्यावहारिक रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्यासक्रम एसएनडीटी विद्यापीठात पदवीसाठी लावण्यात आला होता. रा. स्व. संघाचे ते कार्यकर्ते होते. ‘हिंदू संस्कृतीचे मापदंड’ तसेच ‘विज्ञानपुष्पे’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.