Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

चिंता निकालाची अन् प्रवेशाची
प्रतिनिधी

आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाचे दहावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही या दोन्ही बोर्डातील विद्यार्थ्यांनी घसघशीत गुण मिळविल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. सीबीएसई-आयसीएसईमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण ५००च्या आसपास असू शकेल, असा प्राथामिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अकरावीसाठी मोठय़ा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी हे विद्यार्थी एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहेत.
सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससीमधील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये समानता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून यंदा ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’चे सूत्र लागू करण्याची शक्यता आहे. परंतु, या सूत्रामुळेही फारसा पडणार नाही, असे मत शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात ९७, ९८, ९९ असे गुण अगदी सहजपणे मिळतात. याउलट एसएससीच्या विद्यार्थ्यांना काही विषयात ९५ पेक्षा अधिक गुण मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वाधिक गुण असलेल्या पाच विषयांच्या गुणांची टक्केवारी काढून त्या आधारे प्रवेश देताना एसएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची खात्री नसल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.
यंदा सीबीएसई-आयसीएसईमधील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या तुलनेत एसएसएसीच्या परीक्षेत मुंबई विभागातून अशा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी असेल. दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला साधारण ९५-९६ टक्के गुण मिळतात. परंतु, यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या आयसीएसई-सीबीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. किंबहुना दोन वर्षांपूर्वी एसएससीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांला रूपारेल महाविद्यालयात पहिल्या प्रवेशयादीत स्थान मिळू शकले नव्हते. यंदा ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’मुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे शिक्षण विभागाकडून सांगितले जात असले तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही असा अंदाज असल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा अन्याय होईल. त्यातून पालक-विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ शकतो, असे बोलले जात आहे.