Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

कामे नीट न झाल्याने जुहू परिसर धोक्यात
बंधुराज लोणे

मुंबईतील एक पर्यटनस्थळ बनलेला जुहू येथील सुपरस्टार अमिताभ बच्चन याचा ‘प्रतीक्षा’ बंगला

 

यंदा पावसाळ्यात जलमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘प्रतीक्षा’च्या दिशेने येणाऱ्या नाल्यालगतची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली होती. ही अनधिकृत बांधकामे हटविण्यात आल्यामुळे ‘प्रतीक्षा’ला पावसाळ्यात कसलाही धोका नाही, असा दावा पालिकेतर्फे करण्यात येत होता. मात्र पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
जुहू हा परिसर समुद्रालगत असल्याने आणि तेथील इर्ला नाल्यामुळे मुसळधार पाऊस पडला की हा विभाग जलमय होतो. गेली काही वर्षे पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होत आहे. अमिताभ बच्चन याच्या जलमय झालेल्या बंगल्याची छायाचित्रे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. पावसाळ्यात अमिताभ बच्चन याचा बंगला जलमय होऊ नये यासाठी गतवर्षी पालिका प्रशासनाने काही उपाययोजना केली होती. इर्ला नाल्यावरील अनधिकृत बांधकामांमुळे पावसाळ्यात हा परिसर पाण्याखाली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने ही बांधकामे तोडली होती. त्यामुळे यंदा पावसाळ्यात इर्ला नाल्याचा प्रवाह सुरळीत होईल आणि या परिसरात पाणी साचणार नाही, असा दावा पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
मात्र आता या परिसरात दुसरी समस्या निर्माण झाली आहे. येथे एक पंम्पिंग स्टेशन बांधण्यात येत आहे. त्याचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण करण्याची मुदत कधीच संपली आहे. मात्र या पंम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण न झाल्यामुळे सदर नाल्यातून भरतीच्या काळात उलटे येणारे समुद्राचे पाणी रोखणे अशक्य आहे. पंम्पिग स्टेशनचे काम पूर्ण झाले असते तर या परिसराला पूराचा धोका कमी झाला असता, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चितळे समितीने या ठिकाणी पंम्पिग स्टेशन बांधण्याची शिफारस केली होती.
पंम्पिंग स्टेशनचे डेब्रिज नाल्यात पडले आहे. नाल्यात पडलेले डेब्रिज हटविण्यात आले नाही, तर या परिसराला पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्याशिवाय नाला सफाईचे कामही समाधानकारक झालेले नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवाशी करीत आहेत. २६जुलै २००५ पासून दरवर्षी हा परिसर जलमय होत आहे. गेल्या वर्षी जुहूतील अनेक विभागात पाणी साचले होते.
यंदा तर परिस्थिती अधिकच वाईट आहे, असे स्थानिक नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला कळविले आहे. मात्र प्रशासन या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते यावर रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर हा परिसर जलमय होण्याची दाट शक्यता आहे.