Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

ऑनलाइन प्रवेशासाठी शिवसेनेची मदत केंद्रे
प्रतिनिधी

अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार असल्याच्या कल्पनेनेच

 

अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या पोटात भितीचा गोळा आला आहे. इंटरनेट व संगणकाबद्दल काहीच माहिती नसलेल्या कुटुंबियांची या ऑनलाइन प्रवेशामुळे पंचाईत होणार आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी तर ही प्रक्रिया म्हणजे ब्रह्मराक्षस वाटू लागली आहे. घाबरगुंडी उडालेल्या विद्यार्थी व पालकांसाठी शिवसेनेने मात्र दिलासा दिला आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील प्रत्येक विधासभा मतदारसंघामध्ये संगणक व इंटरनेटने सुसज्ज असलेली मदत केंद्रे सुरू करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.
सुमारे २०० ते ५०० विद्यार्थ्यांच्या सेवेला एका केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ऑनलाइन नावनोंदणी करणे, त्याच्या इच्छेनुसार विविध महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम निश्चित करून देणे आणि प्रिंटआऊट्स देणे इत्यादी प्रकारची मदत या केंद्रांवर करण्यात येणार आहेत. खास प्रशिक्षण दिलेले स्वयंसेवक (शिवसैनिक) या केंद्रांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे स्वयंसेवक विद्यार्थी-पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत करणार आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारमार्फत सुमारे एक हजार सबमिशन सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. शिवसेनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या मदत केंद्रांची संख्या त्यापेक्षाही अधिक असेल, अशी माहिती आमदार डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन उपलब्ध करण्यात आलेली सेंटर्सची कमी पडली तर त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होईल. तसे होऊ नये म्हणून शिवसेनेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी ही मदत केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. झोपडपट्टी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना या सुविधेचा मोठा फायदा होईल, असे सावंत यांनी सांगितले. गोरगरीब विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज भरणे परवडणार नाही. त्यामुळे शिवसेनेने ही सुविधा विनामूल्य सुरू करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या मदतीमुळे केवळ आपले नाव तसेच प्रवेशासाठी इच्छुक महाविद्यालयांची नावे सुचविण्यापलिकडे विद्यार्थ्यांला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत.