Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला अद्याप मुहूर्त नाही!
प्रतिनिधी

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या वर्धापन दिन

 

कार्यक्रमाला यंदा मे महिना संपत आला तरीही अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी हा कार्यक्रम मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येत असतो. तसेच वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर घेण्याचा संकेत आहे. मात्र राज्याबाहेरील कोणी संस्था कार्यक्रम घेण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. महाबळेश्वर येथे झालेले वादग्रस्त ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांची भूमिका यामुळे हा वर्धापन दिन कार्यक्रम घेण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय हे महाराष्ट्रात असल्याने महामंडळाच्या राज्याबाहेर असलेल्या शाखांनी किंवा संलग्न संस्थांनी महामंडळाच्या वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम आयोजित करावा, असा संकेत आहे. यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम गोवा किंवा गुजराथ राज्यातील संस्थानी आयोजित करावा, असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे समजते. राज्याबाहेरील संस्थानी हा कार्यक्रम आयोजित केला नाही, तर महामंडळाला आता हा का र्यक्रम महामंडळाला राज्यातच घ्यावा लागेल, असे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्यामुळे महामंडळाचा वर्धापन दिन कार्यक्रम होऊ शकला नाही. हा कार्यक्रम राज्याबाहेर घेण्याचा संकेत असला तरी तो दरवर्षी बाहेरच झाला पाहिजे, असा काही नियम नाही. या वेळी वर्धापन दिन कार्यक्रम राज्याबाहेर न होता आम्ही तो लवकरच पुण्यात आयोजित करत आहोत.
या संदर्भात घेण्यात येणाऱ्या आक्षेपात काहीही तथ्य नसल्याचा दावा करून यंदाचा वर्धापन दिन कार्यक्रम राज्याबाहेर न होता आम्ही तो लवकरच पुण्यात आयोजित करत असल्याचेही ठाले-पाटील यांनी सांगितले.