Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

निवडणुकीच्या काळात बेकायदा बांधकामांना पेव
के-पूर्व, पी-उत्तर, एल, आर, एच पूर्व विभाग आघाडीवर
प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या काळात उपनगरात बेकायदा बांधकामांना अक्षरश: पेव फुटल्याचे दिसून

 

येत होते. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कारण दाखवित पालिका अधिकारी कुठल्याच तक्रारींकडे लक्ष देत नाही, असे स्पष्ट झाले आहे. याचाच फायदा उठवीत झोपडीदादांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे केल्याचे दिसून येत आहे. अनधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदा बांधकामांमध्ये के-पूर्व, पी-उत्तर, एल, आर तसेच एच-पूर्व हे विभाग आघाडीवर आहेत.
के-पूर्व विभागातील अंधेरी पूर्व येथील मरोळ-मरोशी मार्गावरील आदर्शनगर-भंगारवाडा भागात पालिकेच्या मोकळ्या जागेवर बेकायदा आठ गाळे उभारण्यात आले आहेत. पूर्वी या ठिकाणी सहा गाळे होते आणि आता या गाळ्यांशेजारी दोन आणि त्यावर मजला चढवून आणखी सहा नवे व्यापारी गाळे बनविण्यात आले आहेत. याशिवाय गणेशपाडा परिसरात चार बेकायदा गाळे उभे राहिले तर मिलिटरी रोडवर खुल्या जागेत पाच गाळे उभारण्यात आले. याबाबत पालिकेच्या के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त रणजित ढाकणे यांना काही रहिवाशांनी दूरध्वनी करून बेकायदा बांधकामांची माहिती दिली. मात्र तरीही कारवाई होऊ शकली नाही. उलटपक्षी जोमाने काम सुरू राहिले, असे काही स्थानिक रहिवाशांनी सांगितले. अतिक्रमण निर्मूलन पथकाला दूरध्वनी केल्यानंतर त्यांची गाडी अध्र्या तासांत आली. परंतु कारवाई न करताच निघून गेली. या संदर्भात ढाकणे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही ते उपलब्ध झाले नाहीत.
मालाड पश्चिमेकडील मालवणी चर्च, चिकूवाडी तसेच अक्सा, दाणा पाणी बीच परिसरात मोठय़ा प्रमाणात बंगल्यांची कामे सुरू असून काही ठिकाणी गेस्ट हाऊससाठी मोकळ्या जागेवर दहा-बारा गाळे बांधले जात आहे. याबाबतही तक्रारी करून काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. एच-पूर्व परिसरात तर बेकायदा बांधकामे तोडण्याचे पालिकेचे पथक फक्त नाटक करीत असल्याचे दिसून येतच आहे. कूर्ला परिसरात तर एक मजली बेकायदा बांधकामांनी उच्छाद मांडला आहे. तीच गत बोरिवली पूर्वेतील आर विभागाची असून तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या नावाखाली पालिका अधिकाऱ्यांनी चांगलेच हात धुवून घेतल्याची चर्चा आहे.