Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

चिंता निकालाची अन् प्रवेशाची
प्रतिनिधी

आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाचे दहावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दोन्ही बोर्डातील विद्यार्थ्यांनी घसघशीत गुण मिळविल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. सीबीएसई-आयसीएसईमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण ५००च्या आसपास असू शकेल, असा प्राथामिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अकरावीसाठी मोठय़ा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी हे विद्यार्थी एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहेत.

कामे नीट न झाल्याने जुहू परिसर धोक्यात
बंधुराज लोणे

मुंबईतील एक पर्यटनस्थळ बनलेला जुहू येथील सुपरस्टार अमिताभ बच्चन याचा ‘प्रतीक्षा’ बंगला यंदा पावसाळ्यात जलमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘प्रतीक्षा’च्या दिशेने येणाऱ्या नाल्यालगतची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली होती. ही अनधिकृत बांधकामे हटविण्यात आल्यामुळे ‘प्रतीक्षा’ला पावसाळ्यात कसलाही धोका नाही, असा दावा पालिकेतर्फे करण्यात येत होता. मात्र पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

नॅनो घरे
उद्योगपती रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी एक लाखात मालकीच्या गाडीचे स्वप्न अखेर पूर्ण केले. प्रत्यक्षात ही गाडी एक लाखात मिळणार नसली तरी जी घोषणा केली होती ती त्यांनी अंमलात आणली. त्यापाठोपाठ नॅनो घरांची संकल्पनाही त्यांनी मांडली असून ती लवकरच पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नॅनो घरासोबत एक नॅनो कारही देण्याचा त्यांचा संकल्प आहे. टाटांनी नॅनो घरांची संकल्पना मांडल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी एक लाख नॅनो घरे बांधण्याचे ठरविले आहे.

ऑनलाइन प्रवेशासाठी शिवसेनेची मदत केंद्रे
प्रतिनिधी

अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार असल्याच्या कल्पनेनेच अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या पोटात भितीचा गोळा आला आहे. इंटरनेट व संगणकाबद्दल काहीच माहिती नसलेल्या कुटुंबियांची या ऑनलाइन प्रवेशामुळे पंचाईत होणार आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी तर ही प्रक्रिया म्हणजे ब्रह्मराक्षस वाटू लागली आहे. घाबरगुंडी उडालेल्या विद्यार्थी व पालकांसाठी शिवसेनेने मात्र दिलासा दिला आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील प्रत्येक विधासभा मतदारसंघामध्ये संगणक व इंटरनेटने सुसज्ज असलेली मदत केंद्रे सुरू करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला अद्याप मुहूर्त नाही!
प्रतिनिधी

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमाला यंदा मे महिना संपत आला तरीही अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी हा कार्यक्रम मार्च किंवा एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येत असतो. तसेच वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर घेण्याचा संकेत आहे. मात्र राज्याबाहेरील कोणी संस्था कार्यक्रम घेण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. महाबळेश्वर येथे झालेले वादग्रस्त ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांची मनमानी आणि त्यांची भूमिका यामुळे हा वर्धापन दिन कार्यक्रम घेण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते.

निवडणुकीच्या काळात बेकायदा बांधकामांना पेव
के-पूर्व, पी-उत्तर, एल, आर, एच पूर्व विभाग आघाडीवर
प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या काळात उपनगरात बेकायदा बांधकामांना अक्षरश: पेव फुटल्याचे दिसून येत होते. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कारण दाखवित पालिका अधिकारी कुठल्याच तक्रारींकडे लक्ष देत नाही, असे स्पष्ट झाले आहे. याचाच फायदा उठवीत झोपडीदादांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे केल्याचे दिसून येत आहे. अनधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदा बांधकामांमध्ये के-पूर्व, पी-उत्तर, एल, आर तसेच एच-पूर्व हे विभाग आघाडीवर आहेत.

गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय वाढला पाहिजे - के. एल. प्रसाद
प्रतिनिधी

मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला कशामुळे झाला हे बाहेर येईलच. परंतु या अतिरेकी हल्ल्यानंतर आम्ही काही गोष्टी तातडीने शिकलो पाहिजे. विशेष म्हणजे गुप्तचर यंत्रणांमधील समन्वयही वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) के. एल. प्रसाद यांनी अलीकडे केले.

बीअर शॉपीचे रुपांतर वाइन शॉपीमध्ये करण्याची मागणी
प्रतिनिधी
बीअर शॉपीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून परवान्याचा खर्च आणि इतर खर्च भागविणे अशक्य झाल्याने बिअर शॉपीचे वाइन शॉपीमध्ये रुपांतर करावे अथवा त्याला देशी दारू किंवा ब्रँडीचा परवाना देण्यात यावा, अशी मागणी समाधान व्यापारी असोसिएशनतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे. समाधान व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्यामते, बिअरच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे बिअर शॉपी चालविण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत नगण्य असते. या शुल्कातून परवाना शुल्काची रक्कम, नोकरांचे पगार, सरकारी शुल्क, वीज शुल्क, दुकानाचे भाडे, दुकान भाडे आदी खर्च भागविणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या बिअर शॉपीचा व्यवसाय डबघाईला आला असून सगळ्याच बिअर शॉपी मालकांना मोठय़ा प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. काही बिअर शॉपी मालकांनी तर बिअर शॉपीचा व्यवसाय बंद केला आहे व ते ज्या व्यवसायातून अधिक फायदा मिळतो त्याकडे वळले आहेत. सरकारने बिअर शॉपी मालकांच्या समस्या जाणून घेऊन बिअर शॉपींचे रुपांतर वाईन शॉपींमध्ये करावे अन्यथा त्यांना देशी दारू, बकार्डी, ब्रँडी शॉपींचा परवाना देऊन डबघाईला आलेल्या या व्यवसायाला नवी संजीवनी देण्याची मागणी बिअर व्यावसायिकांनी केली आहे.

स्वामी समर्थ मठाचा शतसावंत्सरिक महोत्सव
प्रतिनिधी
दादर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ३१ मे २००९ रोजी शिवाजी मंदिर येथे शतसावंत्सरिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते असतील. तर दीप प्रज्वलनानंतर प्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रमही होणार आहे. यावेळी मठाबद्दलची इत्यंभुत माहिती असलेल्या डीव्हीडीचेही अनावरण केले जाईल.

‘बीएस्सी इन फोरेन्सिक सायन्स’ अभ्यासक्रम सुरू होणार
प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठात यंदापासून ‘बीएस्सी इन फोरेन्सिक सायन्स’ व ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कंझ्युमर गाईडन्स’ हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केली होती. त्यानुसार विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या सर्व अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे.

स्टाफ सिलेक्शनच्या भरतीसाठी आवाहन
प्रतिनिधी
स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे ४०० डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि प्रति तासाला आठ हजार डिप्रेशन वेग असलेल्या आइ १ जून २००९ रोजी १८ ते २७ दरम्यान वय असलेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, दुसरा मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस सोडून सायंकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेत कार्यालय चिटणीस मधुकर जाधव व शरद एक्के यांच्याशी संपर्क साधावा. (मो. क्र. ९८२१४१६१५१, ९३२२००३८१४)

रावाच्या वतीने संगीत संध्याचे आयोजन
प्रतिनिधी

श्री. श्री. आनंदमूर्ती यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त आनंद मार्ग प्रचारक संघाची सांस्कृतिक शाखा ‘रेनेसॉ आर्टिस्ट अ‍ॅण्ड राईटर्स असोसिएशन’ (रावा) आणि बौद्धिक शाखा रेनेसॉ युनिव्हर्सल (आरयू) यांच्यातर्फे ‘प्रभात संगीतावर’ या संकल्पनेवर आधारित एक संगीत संध्या व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. यावेळी शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना ‘रावा’च्या वतीने गौरविण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता’चे निवारी संपादक सुधीर जोगळेकर या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, हिंदी साहित्यातील लेखक विश्वनाथ सचदेव उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध गायिका आश्विनी भिडे-देशपांडे श्री. श्री. आनंदमूर्ती यांनी रचलेल्या ‘प्रभात संगीताचे’ या विषयावरील गायन करतील.