Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

अमृतेश्वर! सह्य़ाद्रीच्या कुशीतल्या या पाषाणशिल्पाच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व खात्यातर्फे अलीकडेच हाती घेण्यात आले आहे. शिखर, छत, तसेच संरक्षक भिंतीची दुरुस्ती सध्या सुरू आहे. आवारातील शहाबादी फरशा काढून तेथे दगडी चिरे बसवण्यात येणार आहेत. दगडातील फटी चुन्याने लिंपण्यात येत आहेत. अमृतमयी प्रवरेचा प्रवाह याच यादवकालीन मंदिरातील महादेवाच्या पिंडीस अभिषेक करीत पुढे जातो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा पुरातत्त्व खात्याचा प्रयत्न आहे.

जखमी पेंटेड स्टॉर्कचे पक्षिमित्राने वाचविले प्राण
राशीन, २९ मे/वार्ताहर

कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील प्राथमिक शिक्षक व पक्षिमित्र देवराम बोरुडे यांनी जखमी पेंटेड स्टॉर्क (चित्रबलाक) पक्ष्याला पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविले. हे पक्षी जानेवारीत येथे वास्तव्यास येतात. वटवृक्षावर घरटी करतात. त्यात पिल्लांना जन्म देऊन ती मोठी होईपर्यंत येथेच थांबतात. पावसाळा सुरू झाल्यावर जूनमध्ये परत जातात.

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला नगरच्या शिक्षण संस्थांचा विरोध!
मोहनीराज लहाडे, नगर, २९ मे

अकरावीच्या प्रवेशातील गोंधळ टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय नगर शहरातील शिक्षण संस्थांनी हाणून पाडला! संस्थांनी संमती दिली असती, तर विभागाच्या वतीने यंदापासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार होती. दहावीचा निकाल लवकरच जाहीर होईल. या पाश्र्वभूमीवर ही घटना लक्षवेधी आहे.

जमिनीच्या वादातून दलित कुटुंबास मारहाण
भांबोऱ्यात १९जणांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’
कर्जत, २९ मे/वार्ताहर
तालुक्यातील भांबोरे येथे शिवाजी पोपट रंधवे या तरुणास व त्याच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ व जबर मारहाण करून त्यांचे राहते छप्पर पेटवून दिले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी या प्रकरणी १९जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

राज्यातील मंदिरांसाठी परिसर विकास प्राधिकरण - विखे
राहाता, २९ मे/वार्ताहर

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या राज्यातील सर्वच धार्मिकस्थळांवर सरकारचे नियंत्रण असावे, अशी सरकारची भूमिका असली, तरी यामध्ये मंदिर ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करतानाच भाविकांकडून येणाऱ्या निधीचा विनियोग मंदिर परिसर विकासासाठी व्हावा, याकरिता सर्व देवस्थानांनी परिसर विकास प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना आपण करणार असल्याची माहिती विधी व न्याय खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तिघांना अटक
संगमनेर, २९ मे/वार्ताहर

तालुक्यातल्या उंबरी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिघा तरुणांना अटक केली. बाबासाहेब मारुती खेमनर (वय २१), किरण विश्वनाथ नन्नवरे (२८) आणि अजित चांगदेव उंबरकर (२८) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी संगनमत करून गावातीलच एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. २२ रोजी घडली. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मोढा (ता. रोहा, जि. रायगड) येथे वरील तिघा आरोपींसह अत्याचारित मुलीस आज पोलिसांनी ताब्यात घेऊन संगमनेरला आणले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

इंडिका कार घोटाळ्यातील आरोपीस पोलीस कोठडी
संगमनेर, २९ मे/वार्ताहर

इंडिका कार भाडय़ाने घेण्याच्या घोटाळ्यातील काल अटक करण्यात आलेल्या आरोपी दीपक भोर याला येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. बँकेला कार भाडय़ाने दिल्यास बख्खळ पैसा मिळेल, असा बनाव करत येथील अकराजणांना कोटी रुपयांना तिघांनी गंडा घातला होता. त्यातील भोर पोलिसांना मिळाला असून पती-पत्नी असलेल्या दोघांना अजून ताब्यात घ्यायचे आहे.

भगवान गडावरील कार्यक्रम लांबणीवर
पाथर्डी, २९ मे/वार्ताहर

तालुक्यातील भगवानगडावर नवनिर्वाचित खासदार गोपीनाथ मुंडे व दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत येत्या रविवारी (दि. ३१) होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तो आता दि. ७ जून रोजी होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिली. खासदार झाल्यानंतर प्रथमच तालुक्याच्या दौऱ्यावर मुंडे व गांधी येणार असल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले होते. पाथर्डी व शेवगाव तालुक्यांच्या वतीने मुंडे व गांधी यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार होता. मुंडेंची भगवानगडावर मोठी श्रद्धा असून येत्या ७ जूनला ते व गांधी भगवानगडावर येणार आहेत.

गंगवाल यांचे निधन
कोपरगाव, २९ मे/वार्ताहर

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त शाखाधिकारी तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी सुरेश झगूलाल गंगवाल (वय ६५) यांचे अल्प आजाराने निधन झाले.

आरोग्यविज्ञान विद्यापीठात डॉ. अर्चना शिंगी प्रथम
नेवासे, २९ मे/वार्ताहर
महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात डॉ. अर्चना भगवानलाल शिंगी हिला पाच सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ४५ होमिओपॅथिक महाविद्यालयांतून तिने प्रथम क्रमांक पटकाविला. नाशिकला हा कार्यक्रम झाला.पद्मविभूषण डॉ. के. बी. गोयल, राजेश टोपे, कुलगुरू डॉ. मृदुला फडके, शोभा बच्छाव या वेळी उपस्थित होत्या. डॉ. अर्चना ही येथील कापड व्यापारी भिकुशेठ शिंगी यांची नात आहे. सरपंच नंदकुमार पाटील, उपसरपंच सीमा मापारी, डॉ. जी. आर. कुलकर्णी, संघपती अशोक गुगळे, बाबूशेठ शिंगी, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष वैभव नहार यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आज बैठक
कोपरगाव, २९ मे/वार्ताहर

पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियोजनाची बैठक आमदार अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (शनिवारी) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात आयोजित केली आहे. बैठक सभागृहात सकाळी १०.३० वाजता सभापती, गटविकास अधिकारी रामचंद्र म्हस्के यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत बियाणे, रासायनिक खते मागणी उपलब्धता, कृषीविषयी शासकीय योजना, खरीप हंगामासाठी पाटपाणी उपलब्धता, पीक कर्जवाटपाबाबत माहिती, वीज उपलब्धता, पीकविमा योजना यावर चर्चा होणार आहे.

सरकारी अनुदान न मिळाल्यास शेतक ऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
वाडेगव्हाण, २९ मे/वार्ताहर

सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४५ हजारांचे अनुदान जाहीर केले, परंतु अद्याप पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना ते मिळाले नाही. आठ दिवसांत हे अनुदान न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा विठ्ठल कारखिले, नानाभाऊ नरोडे, अर्जुन रासकर, अरुण भोसले, माजी सरपंच नानाभाऊ पठारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. तालुक्यातील शेतकरी आता फळबागांकडे वळले आहेत. त्यामध्ये राळेगण थेरपाळ, जवळे, गुणोरे, गाडीलगाव, कोहकडी, कुरुंद, म्हसे या गावांत शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात डाळिंबबागा घेतल्या आहेत. सरकारने मातीपरीक्षण केले, तरी कृषी विभागाने अद्यापपर्यंत अनुदान न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. वातावरण बदलामुळे डाळिंब उत्पादक सतत आर्थिक अडचणीत सापडतो. कमी पाण्यात डाळिंब पीक घेतले जाते, परंतु सरकारकडून अनुदान मिळत नाही, ही शोकांतिका असल्याची भावना शंकर कारखिले यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारी नोकर संयुक्त संघातर्फे १ जूनला निदर्शने
नगर, २९ मे/प्रतिनिधी
राज्य सरकारी नोकर संयुक्त संघाच्या जिल्हा शाखेतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. १) सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस योगीराज खोंडे यांनी दिली. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सर्व प्रकारचे भत्ते, सोयी-सुविधा मिळाव्यात, डॉ. हकीम समितीच्या शिफारशी रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात येणार आहेत.

सुभाष तवले यांचे निधन
नगर, २९ मे/प्रतिनिधी

येथील तवलेनगरमधील सामाजिक कार्यकर्ते सुभाष सुरेश तवले यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ३३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. तवले यांनी महापालिकेची निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली
होती.

दोन लाखांची रोकड असलेली बॅग लांबविली
नगर, २९ मे/प्रतिनिधी
चहा पिण्यासाठी खाली उतरलेल्या प्रवाशाची २ लाख रुपये असलेली बॅग भामटय़ाने बसमधून लांबवली. हा प्रकार आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नगर-औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल महाराजासमोर घडला. नीलेश नरेंद्र ओसवाल (रा. मालरोड, कोल्हापूर) हे सराफ व्यावसायिक खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसमधून पुण्याहून नागपूरला चालले होते. ही बस हॉटेल महाराजासमोर चहापाण्यासाठी थांबली असताना ओसवाल यांची १ लाख ९८ हजार रुपये असलेली बॅग चोरीस गेली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास सहायक उपनिरीक्षक शेंडे करीत आहेत.

‘मंगळसूत्रचोरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन’
नगर, २९ मे/प्रतिनिधी
सावेडी उपनगरातील मंगळसूत्रचोरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सावेडी शाखेतर्फे देण्यात आला. सहायक पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना शाखाध्यक्ष अनिकेत कराळे यांनी हे निवेदन दिले. गेल्या काही महिन्यांपासून सावेडीत मंगळसूत्रचोरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे महिलांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

शहर सहकारी व भिंगार अर्बनला वसंतदादा उत्कृष्ट बँक पुरस्कार
नगर, २९ मे/प्रतिनिधी
महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स संघटनेतर्फे नागरी सहकारी बँकांना देण्यात येणारा पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार येथील शहर सहकारी बँक व भिंगार अर्बन सहकारी बँकेस जाहीर झाला आहे. बँक संघटनेचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार देताना बँकेची आर्थिक स्थिती, कर्जव्यवहार, एनपीए प्रमाण, सामाजिक बांधिलकी, व्यवस्थापकीय खर्च आदींचा विचार केला जातो. उत्कृष्ट कामामुळे शहर बँक व भिंगार बँकेस पुरस्कार मिळाला, असे सांगण्यात आले. शहर बँकेचे संस्थापक संचालक प्रा. मुकुंद घैसास, अध्यक्ष डॉ. रावसाहेब अनभुले, उपाध्यक्ष सुनील फळे यांनी पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले. बँक या पद्धतीने यापुढेही काम करेल, असा विश्वास प्रा. घैसास यांनी व्यक्त केला. भिंगार बँकेचे अध्यक्ष गोपाळराव झोडगे यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करून संचालक व अधिकाऱ्यांच्या अथक कामामुळे बँक प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.

हिवाळे ट्वेंटी-२० स्पर्धेत समर्थ नेटला विजेतेपद
नगर, २९ मे/प्रतिनिधी
आदर्श युवा संचालित व पोलाईट स्पोर्टस् अकादमी आयोजित डॉ. भा. पां. हिवाळे ट्वेंटी-२० क्रिकेट करंडक स्पर्धेत समर्थ नेट संघाने विजेतेपद मिळवले. पोलाईट अकादमी संघ उपविजेता ठरला. ही स्पर्धा गेले आठ दिवस नगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होती. स्पर्धेत १५ सामने खेळले गेले. राजू जाधव (उत्कृष्ट फलंदाज), साजीद खान (उत्कृष्ट गोलंदाज), संजय सिद्दम (मालिकावीर) यांनी वैयक्तिक पारितोषिके मिळवली. पारितोषिक वितरण महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, क्रिकेट संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण जगताप यांनी सहकार्य केले. संयोजनासाठी संदीप घोडके, संदीप आंतेपोलू, अतुल जाधव, फय्याज शेख, पवन लहारे, जावेद सय्यद, हर्षद वालेकर, प्रवीण गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.