Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

मिहान प्रकल्पाला आता खरी गती -प्रफुल्ल पटेल
आर्थिक सुधारणांसाठी ‘हन्ड्रेड डेज्’

नागपूर, २९ मे / प्रतिनिधी

आर्थिक मंदीची झळ विमान वाहतूक क्षेत्रालाही बसली असली तरी, विदर्भासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मिहान प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती देऊ आणि प्रत्येक कामात जातीने लक्ष घालून सर्व अडचणी दूर करू, अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज येथे दिली. नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून त्यांची ‘सेंकड इनिंग’ सुरू झाली. पहिल्या पाच वर्षांत देशातील विमानतळांचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आणि विमान वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या पटेल यांनी येत्या पाच वर्षांत वेगाने झेप घेऊ, असा विश्वास व्यक्त केला.

पाणी द्या, सभेचा ‘फार्स’ बंद करा
नगरसेवकांचा महापौरांवर क्षोभ
वाठोडावासीयांचा महापालिकेवर मोर्चा
कुठल्याही चर्चेविना प्रस्ताव मंजूर
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी

शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असताना सभा काय घेता, पाणी पुरवठा यंत्रणा हाताळू न शकणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि जनतेला पाणी द्या, अशी संतप्त मागणी नगरसेवकांनी महापौरांना केली. त्यावेळी महापौरांनी या प्रश्नावर लवकरच सर्वपक्षीय बैठक घेण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली.

वाघीण आणि चार बछडय़ांच्या रक्षणासाठी वन विभागाची ‘घेराबंदी’
सात अधिकारी तैनात
वनरक्षकांची सर्वत्र गस्त
लोकांना येण्यास मनाई
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी
नागपूर-केळझर मार्गावरील जंगलात मुक्काम ठोकणारी वाघीण आणि तिचे चार बछडे निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने वन विभागातर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जात असून, त्यांच्या देखभालीकरता दोन वनपरिक्षेत्र अधिकारी, दोन वनाधिकारी आणि तीन वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. एस.के. खेतरपाल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सरकारच्या मोफत योजनेमुळे नव्या-जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांवर संकट..
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी

सर्व शिक्षण मोहिमेत शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षांपासून सरकारने मोफत पुस्तक वाटप योजना जाहीर केल्याने विदर्भातील जुन्या व नवीन पुस्तकांच्या विक्रेत्यांवर संकट कोसळले आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात वह्य़ा पुस्तकाच्या ऑर्डर्स देण्यासाठी पुस्तक विक्रेत्यांची लगबग असते.

तूर्त मान्सून शांतच!
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी

नैर्ऋत्य मान्सून देशात वेळेआधी दाखल झाला असला, तरी येत्या चार-पाच दिवसांत तो पुढे सरकण्याची चिन्हे नाहीत. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातच तो पुन्हा सक्रिय होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, मान्सूनचे अपेक्षित आगमन लांबले असतानाच देशात पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, ओरिसा व विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे.

खंडणीसाठी प्रापर्टी डीलरच्या रोखपालाचे अपहरण; चौघांना अटक
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी

एका प्रॉपर्टी डीलरकडून खंडणी उकळण्यासाठी त्याच्या कार्यालयातील रोखपालाचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना राणाप्रतापनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासात बेडय़ा ठोकून अपहृत रोखपालाची सुखरूप सुटका केली. दरम्यान, या घटनेने प्रॉपर्टी डीलर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिलेचा गळा कापलेला मृतदेह सापडल्याने खळबळ
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी
उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवापूर तालुक्यातील इंदापूर-नाड मार्गालगत एका अनोळखी महिलेचा गळा कापलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. इंदापूर आणि नाड या गावाच्या मध्यभागी उपाशा नदीचा पाट आहे. या पाटातच गुरुवारी सकाळी ९ वाजता हा मृतदेह सापडला. या महिलेचा गळा कापला असून हात पाठीमागे बांधलेले होते तर पायही रुमालाने बांधलेल्या स्थितीत होते. घटनास्थळी बांगडय़ांचे तुकडे पडले होते.

पाईपवरून पडल्याने सुताराचा मृत्यू
नागपूर,२९ मे/ प्रतिनिधी

गच्चीवर झोपण्यासाठी पाईपवरून जाणाऱ्या एका सुताराच्या जीवावर बेतल्याची घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजीप्रभुनगर येथे घडली. आदाराम मजनाराम मीणा (२८) असे त्याचे नाव असून तो राजस्थान, बाळमेघ जिल्ह्य़ातील हळवा येथील रहिवासी आहे. बाजीप्रभुनगरातील प्लॉट क्र. ५ येथे फर्निचरचे काम करणे सुरू आहे. दिवसभर फर्निचरचे काम केल्यानंतर रात्री ११.३० वाजता तो झोपण्यासाठी पाईपद्वारे गच्चीवर जात असताना पाईप सुटल्याने तो खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने जागीच मरण पावला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

द.म.क्षे. सांस्कृतिक केंद्रातर्फे चित्र व शिल्पकला स्पर्धा
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑक्टोबर महिन्यात अखिल भारतीय पातळीवर चित्र, शिल्पकला प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार असून त्यात व्यावसायिक व युवा कलाकारांना संधी मिळेल. भारतीय संस्कृती जतन करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम या केंद्रातर्फे केले जाते. गेल्या २२ वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगढ या राज्यातील चित्रकार या स्पर्धेत होत असतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सिव्हील लाईन येथील केंद्राच्या कार्यालयात प्रवेशपत्र उपलब्ध आहेत. २३ ऑगस्टपर्यंत केंद्राकडे कलाकृती पाठविणे आवश्यक आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी २५६२९७४, २५८५१०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे केंद्रातर्फे कळविण्यात आले आहे.

छोटय़ा पडद्यावरील कलावंतांसाठी १ जूनपासून कार्यशाळा
नागपूर, २९ मे/ प्रतिनिधी
छोटय़ा पडद्यावर काम करण्यासाठी अनेक कलावंत उत्सुक असतात पण त्यांना संधी मिळत नाही किंवा सादरीकरणात ते कुठेतरी कमी पडतात. त्यामुळे अशा कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी निर्झर फिल्म सोसायटीतर्फे १ ते १५ जून दरम्यान छोटय़ा पडद्यासाठी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाचा ललित कला विभाग व निर्झर फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेत चित्रपट दिग्दर्शक संजय सुरकर आणि त्यांच्यासोबत काम करणारे कलाकार प्रशिक्षण देणार आहे. या कार्यशाळेत एक लघुपट तयार करण्यात येणार असून त्या अनुषंगाने अभिनय कला, निर्मिती, तंत्र, रंगभूषा, प्रकाश योजना, कॅमेरा, दिग्दर्शन, एडिटिंग या विषयांची माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळा सकाळी ११ ते ४ या वेळेत होईल. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव समीर नाफडे (९७६६५८९४५०) यांच्याशी संपर्क साधावा.

समता नगरातील बोअरिंगचे उद्घाटन
नागपूर, २९ मे/ प्रतिनिधी

उत्तर नागपुरातील नारा येथील समता नगरमध्ये पाण्याच्या टंचाईला बोअिरगचा आधार मिळाला. येथे पाण्याची मोठीच समस्या आहे. साडेचार लोकवस्ती असलेल्या या नगरातील सर्व विहिरी आटल्या आहेत. अनेक बोअरिंग नादुरुस्त अवस्थेत आहेत. नगरसेवक डॉ. मिलिंद माने यांनी या नगरामध्ये ११ बोअरिंग लावून दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखी चार बोअरिंग लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वस्तीत रस्तेच नसल्याने टँकर येऊ शकत नव्हते. वस्तीतील नागरिकांना बोअरिंगच्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत या भागात अनेक बोअरिंग बसवून देण्याचे काम डॉ. माने यांनी केले. बोअरिंगचे उद्घाटन संजय निकोसे, सुधीर रोडगे, शेखर मेश्राम, बी.एस. लांजेवार, प्रभाकर वासनिक, मनोज गजभिये, दिलीप पाटील, नरेश ढोके, लुईस क्लार्क, इंद्रजित सिंह कपूर, गौतम भजगवरे आणि राजूसबाई मेश्राम यांच्या उपस्थितीत पार पडले.

‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ वितरण ५ जूनला
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी
छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कारा’ इतिहास संशोधक डॉ. भा.रा. अंधारे (डी.लिट्.) यांना जाहीर झाला आहे. इतिहास संशोधन क्षेत्रात केलेल्या स्पृहणीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला असून शुक्रवारी ५ जूनला सायंकाळी ६.३० वाजता लक्ष्मीनगरमधील सायंटिफिक सभागृहात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण राहणार असून विधिसभा सदस्य डॉ. वेदप्रकाश मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

मुकुल वासनिक आज येणार
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांचे उद्या रात्री मुंबईहून नागपूर येथे आगमन होत आहे. रविवारी ते रामटेक मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. मुकुल वासनिक प्रथमच रामटेक येथून विजयी झाले असून त्यांचा मंत्रिमंडळात समावेशही झाला आहे. उद्या, शनिवारी ते दिल्लीहून मुंबई येथे व तेथून सांयकाळच्या विमानाने नागपूर येथे येणार आहेत. रात्री त्यांचा मुक्काम गांधीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी असेल. रविवारी सकाळी ११ वाजता ते रामटेक येथे, १ वाजता कन्हान आणि ३ वाजता कामठीला भेट देणार असून तेथे कार्यकर्त्यांशी चर्चा करतील, उद्या त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी विमानतळावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष सुनिता गावंडे यांनी केले आहे.

दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न; चुलत भावास अटक
नागपूर, २९ मे / प्रतिनिधी

शेतीवरून झालेल्या वादात दोन भावांना जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरहर या गावात घडली. याप्रकरणी चुलत भावाला अटक करण्यात आली आहे. उकंड खंडाते (४५) असे आरोपीचे नाव आहे, तर वसंता (४०) आणि भारत केशव खंडाते (४५) अशी जखमी भावांची नावे आहेत. वसंता आणि भारत वडिलोपार्जित घरात राहतात. त्यांच्याच घराशेजारी आरोपीचे घर आहे. २७ मे रोजी रात्री उकंड खंडाते हा घरासामोर येऊन त्यांना शिवीगाळ करत होता. वसंताने त्याला हटकले तेव्हा उकंड घरी गेला व भाला आणून वसंताच्या पोटावर व मानेवर वार करू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भारतवरही त्याने वार केले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केशव खंडाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.