Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

नवनीत

जी व न द र्श न
विवेकशीलता आणि एकाग्रता

 

प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. सावधान राहात जा. आस्थायुक्त आणि धैर्यशील राहात जा.
हा बौद्ध जीवनमार्ग होय.
आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारावर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल तर दु:ख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे.
अविचारी बनू नका. आपल्या विचारावर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत्मार्गापासून आपली मुक्तता करा.
कशा तरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहाते त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात.
ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही.
दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे काम-बंधनातून विमुक्त होतात.
जर माणसाची श्रद्धा अचल नसली, जर सद्धर्म त्यास अज्ञात असेल, आणि जर त्याची मन:शांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही.
एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्टय़ाला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते.
आईबाप, आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

कु तू ह ल
अंतराळवीरांचे पोशाख

अंतराळवीरांचे पोशाख कसे असतात? कालानुरूप यात काही बदल झाला आहे का?
अंतराळवीराचा जाडजूड पोशाख म्हणजे त्याचा प्राण असतो. कारण तो पोशाख हवा, पाणी, संपर्कसाधने, तापमानदाबाचा समतोल राखण्याची सोय व मलमूत्रविसर्जनाची सोय असलेले एक महान यंत्रच असते. या पोशाखात आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी हवाईछत्रीचीही सोय असते. पृथ्वीवर आपल्याला ज्या तापमान व हवेच्या दाबाची सवय झालेली असते, त्याच प्रकारची हवा पोशाखात भरली जाते. या पोशाखाला इवलेसे जरी भोक पडले तरी माणसाचा जीव धोक्यात येऊ शकतो. मोकळय़ा अंतराळात या पोशाखाशिवाय १५ सेकंदांत माणसाला मृत्यू येईल. अंतराळवीर हे उड्डाणाच्या वेळी (व परत येताना) हे पोशाख घालतात. परंतु एकदा यान कक्षेत पोहोचले की त्यांना साधे कपडे घालता येतात. यानाच्या आतमध्ये हवा आणि तापमान नियंत्रित केलेले असते.
यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ फेरी मारायला जाताना किंवा चंद्रावतरणासाठी जाताना त्यांना पूर्ण पोशाख करणे अर्थातच अत्यावश्यक असते. चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांच्या पोशाखाला १७ स्तर होते. हे पोशाख टेफ्लॉन, फायबर ग्लास, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक व रबर या गोष्टींपासून बनविलेले होते. हे पोशाख खूप अवजड व टणक होते. पण चंद्रावर फिरण्यासाठी सुरक्षित होते. चंद्रावरील ऊन-सावलीतील अडीचशे-तीनशे अंश सेल्सिअस फरकाच्या आत्यंतिक तापमानांना तसेच सूक्ष्म अशनिच्या माऱ्यालाही तोंड देऊ शकणारे हे पोशाख होते. गेल्या चाळीस वर्षांत या पोशाखामध्ये भरपूर संशोधन झाले आहे. त्यामुळे अंतराळवीरही आता कमी वजनाचे कपडे वापरू लागले आहेत. आता तर अंतराळवीरांसाठी अंगाबरोबरीचे ‘स्पायडरमन’सारखे आटोपशीर कपडे तयार केले जात आहेत. या कपडय़ांमुळे अंतराळवीरांना हालचाल करणे बरेच सोपे होणार आहे.
गौरी दाभोळकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर

गोमंतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असा नावलौकिक मिळणाऱ्या डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म गोव्यातील सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले या गावी ३० मे १८९४ रोजी झाला. पोर्तुगीज भाषेतून शिक्षण घेणाऱ्या पिसुर्लेकरांनी कायद्याचाही अभ्यास केला होता. पण पेशा त्यांनी शिक्षकाचा पत्करला. कालांतराने इतिहास संशोधन हेच आपले जीवन सर्वस्व मानणाऱ्या पिसुर्लेकर पणजीच्या अभिलेखागारात १९३१ साली जे शिरले ते जवळ जवळ तीन दशके संचालक होईपर्यंत तेथे कार्यरत होते. इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज, संस्कृत, कोकणी या भाषांखेरीज मोडी लिपीही त्यांना चांगल्या प्रकारे अवगत होती. आपल्या तीन दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी अभिलेखागारातील दफ्तरखाना सुधारला. त्यातील कागदपत्रे खंडवार लावून त्याची स्वतंत्र सूची तयार केली. गोवा स्वतंत्र झाल्यावर पणजीत जे इतिहास संशोधन केंद्र स्थापन झाले, त्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती. पिसुर्लेकरांचे स्फुटलेखन, शोधनिबंध, पुस्तके प्रामुख्याने पोर्तुगीज भाषेत असून, त्यांच्या लिखाणाची मराठी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. ‘अ आन्तिगिदादी दु किश्नाई ज्यू’ या पुस्तकातून त्यांनी ‘कृष्ण संप्रदाय’ हा इसवी सनापूर्वीपासून अस्तित्वात होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोर्तुगीज भाषेतील शेकडो कागदपत्रे त्यांनी प्रसिद्ध केली. कृष्णदास श्यामांचा मराठी ग्रंथ संपादित करून गोव्याचा आद्य ग्रंथकार मराठीच होता हेही त्यांनी सिद्ध केले. पिसुर्लेकरांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यात प्रामुख्याने पोर्तुगीज शासनाचा ‘नाइट ऑफ द मिलिटरी ऑर्डर ऑफ सँरिएगो’ हा किताब तसेच एशियाटिक सोसायटी बंगाल, मुंबई यांनीही सुवर्णपदके देऊन त्यांचा गौरव केला. लिस्बन विद्यापीठाने डी.लिट. ही सन्माननीय पदवी त्यांना दिली. कर्करोगाच्या आजाराने १० जुलै १९६९ रोजी पणजी येथे त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
मी पैसे घेतले

मी जांभळाच्या झाडाखाली मातीचे बैल करत बसलो होतो. शिदा मागं कधी येऊन उभा राहिला कळलंच नाही. ‘गंमत बघायचीय?’ त्यानं विचारलं. एक मुंगसाचं पोर खिशातून बाहेर काढलं. ते चिऽर्रऽऽर्र चिऽर्रऽऽर्र करत गळय़ात बांधलेल्या दोरीला हिसके देत धावू लागले. त्याच्या अंगावर लोकरीच्या गोंडय़ासारखे मऊ करडे केस होते. त्यावर पांढरे ठिपके होते. गुंजेसारखे लाल डोळे, तांबडे नाक व तोंड, चेहऱ्यावर चौकस भाव, लांबुळके शरीर, आखूड पाय, जाडजूड, गोंडेदार शेपूट, अर्धगोलाकार कान, ते फारच गोजिरवाणे पोर मला कुरवळावेसे वाटले. ‘हवंय का तुला! मुंगूस नागाला, विषारी सापालासुद्धा भारी ठरतं. नखं पाहिलीस? फाडून टाकतील कुणालाही,’ शिदा भसाडय़ा आवाजात बोलला. माझ्याकडे कुत्रा होता, मांजर होते, पोपट आणि कासव होते, पण मुंगूस नव्हते. ‘हवंय का तुला बोल?’ शिदाने विचारले. मी म्हणालो, ‘हो, पण तू थोडाच देणार आहेस मला?’ ‘देईन की! पण मोबदल्यात दहा रुपये दे.’ ‘माझ्याकडे रुपया आहे आणि गोष्टीचं पुस्तकही देतो तुला. मग देशील?’ मी काकुळतीला आलो. ‘हय़ँ, मला पैसेच हवेत. तुला देता येत नसले तर मी दुसऱ्याशी बोलेन,’ शिदा म्हणाला. मी काहीच बोललो नाही. थोडय़ा वेळाने तो म्हणाला, ‘तुझ्याकडे नसले तरी घरी असतील ना! फक्त दहा रुपयेच तर आणायचे आहेत.’ म्हणजे चोरी करायची घरी. मी मनाशीच म्हणालो. शिदा मुंगसाच्या दोऱ्याला हिसडा देऊन जाऊ लागला तसे मी म्हटले, ‘शिदा, मला मुंगूस हवे आहे. तू थांब इथे थोडा वेळ, मी घरी जाऊन येतो.’ मी पळत घरी गेलो. स्वयंपाकघरातल्या दुभत्याचे कपाट उघडले. आईने मडक्यात ठेवलेल्या नाण्यांपैकी १० रुपयांची नाणी घेऊन पळत शिदाकडे आलो. शिदाने पैसे घेऊन मुंगूस दिले. मी घरी येऊन एक खोकं घेतलं. त्यात पाणी, फळं ठेवली. त्याला भोकं पाडली अन् मुंगसाचं घर तयार झालं. रात्री आई भाकऱ्या भाजत असताना दारावर कुणी आलं आणि नंतर आईचा घंटानाद झाला. वडील पारावर काकाशी गप्पा मारत बसले होते. आई वडिलांना म्हणाली, ‘अक्कीला पाठवायचे म्हणून २५ रुपये साठवले होते. १० रुपये कमी आहेत. घरातल्यांनीच घेतले.’ तिचा रोख काकावर होता. काकाही चिडून उलट बोलू लागला. मला फार अपराधी वाटू लागलं. सगळा धीर एकवटून मी कसेबसे सांगितले. ‘मी पैसे घेतले, मुंगूस पाळायचे म्हणून’. ‘अरे, मग मागायचे. न सांगता घेतलेस?’ बाबा म्हणाले. मला रडे आवरेना. ‘मुंगसासाठी एवढे पैसे तुम्ही देणार नाही वाटले.’ आईने जवळ घेतले. मी भीतीने थरथरत होतो. ‘स्वत:ला लाज वाटेल असे काम पुन्हा करणार नाहीस असे वचन दे’, ती म्हणाली. मी धावत मुंगसापाशी गेलो व म्हटले, ‘शप्पथ, मी पुन्हा चोरी करणार नाही.’ ते चटकन माझ्या कुशीत शिरले. प्रत्येक दिवस हा आयुष्याची नवी सुरुवात असते. तुम्ही काल काय केले, बोललात, वागलात, त्यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होत असेल तर आज त्याबद्दल स्वत:ला माफ करा आणि दिवसाची नव्याने सुरुवात करा. चूक घडली असेल तर ती सुधारण्यासाठी जे करता येईल ते करा आणि आज सगळे नाही करता आले तर त्यासाठी उद्याचा दिवस आहे हे विसरू नका. आजचा संकल्प- मी सर्व शक्यतांचा विचार करीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com