Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

अनधिकृत नॅनो हाऊसिंगचा मध्यमवर्गीयांनाही फटका
जयेश सामंत
नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाचे नाव पुढे करत वेगवेगळ्या गावांलगत असलेल्या मोकळ्या भूखंडांवर उभारण्यात आलेल्या चाळींमधून लॅण्ड माफिया तसेच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी काही कोटींच्या घरात गुंतवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत असतानाच, या चाळींमधील घसघशीत नफ्याचे गणित लक्षात घेऊन केवळ गोरगरीबच नव्हे, तर काही मध्यम-उच्च मध्यमवर्गीयांनीही या अनधिकृत नॅनो हाऊसिंग स्कीममध्ये पैसे गुंतविल्याची धक्कादायक माहिती आता पुढे येऊ लागली आहे. सिडकोने साधारण आठवडाभरापूर्वी गोठीवली-रबाळे या भागात केलेल्या कारवाईत तब्बल ८२२ अनधिकृत घरे जमीनदोस्त करण्यात आली.

नवी मुंबईत जनता त्रस्त; पोलीस सुस्त
बेलापूर/वार्ताहर - नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाढत्या चोऱ्यांमुळे येथील रहिवासी एकीकडे त्रस्त झालेले असताना गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीचा एकही गुन्हा उघडकीस न आल्याने स्थानिक पोलीस काहीशा प्रमाणात सुस्तावले असल्याची चर्चा जनतेत आहेत.
उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने अनेकजणांनी गावचा रस्ता धरल्याने आयते कोलीत मिळालेल्या भुरटय़ा चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांनी नवी मुंबईत धुमाकूळ घातला आहे.

नेरुळमध्ये आज सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
नवी मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रवादीच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखालील श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेतर्फे शनिवार, ३० मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन नेते व माजी खासदार रामदास आठवले, नवनिर्वाचित खासदार संजीव नाईक, ‘लोकसत्ता’चे उपनिवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या विवाह सोहळ्यास दरवर्षी वाढता पाठिंबा मिळत आहे. दोन वर्षांंपूर्वी ४४ जणांचे, तर गतवर्षी ५१ जोडप्यांचा विवाह झाला. यंदा किमान १०१ सर्वधर्मीय विवाह व्हावेत, असे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे, असे मंदाताई म्हात्रे म्हणाल्या. शनिवारी सायंकाळी ५ वा. सेक्टर ४६, एनआरआय कॉम्प्लेक्स, नेरुळ येथे हा समारंभ होईल.

सावरकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम
पनवेल - स्वा. सावरकरांच्या १२६व्या जयंतीनिमित्त येथील बल्लाळेश्वर मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता सावरकरांचा पुतळा, तसेच सभोवतीचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यानंतर बल्लाळेश्वर मंदिरामध्ये विशेष कार्यक्रम होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला वेद प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जय महाराष्ट्र संघ, जागृती मित्रमंडळ आदी संस्थांचे कार्यकर्ते, तसेच असंख्य सावरकरभक्त उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक प्रथमेश सोमण यांनी दिली.

ओवे कॅम्पमधील पाणी प्रश्न सुटला
पनवेल - शेकापचे आमदार विवेक पाटील आणि जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नांमुळे खारघरच्या ओवे कॅम्पमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे मत इनरव्हील क्लबच्या खारघर शाखेच्या संचालिका जस्मिता ठक्कर यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबतर्फे विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांचा शेकाप कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. ओवे कॅम्पमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत होता. सिडकोतर्फे पाण्याच्या टाकीचे सुरू झालेले काम अर्धवट बंद पडल्याने नागरिकांचे हाल होत होते; परंतु या नेत्यांनी वेळोवेळी सिडको प्रशासनाशी पत्रव्यवहार करून, तसेच व्यक्तिगत चर्चा करून हा प्रश्न सोडविला, असे ठक्कर यांनी सांगितले. खारघरमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपला पक्ष नेहमीच अग्रेसर राहील, असे आश्वासन बाळाराम पाटील यांनी यावेळी दिले.

दीड लाखांचे मंगळसूत्र लांबविले
बेलापूर - सीबीडी उड्डाण पुलाखाली बसची वाट पाहात उभी असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरटय़ांनी खेचून लांबविल्याची घटना नुकतीच येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी अहिल्याबाई शिलकर यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रात्री १०च्या सुमारास बस थांब्यावर त्या उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा केला.

मंडप डेकोरेटरच्या घरी चोरी
बेलापूर - करावे गाव येथे राहणारे मंडप डेकोरेटर वीरसेन कडू यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आतील ५६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. कडू हे काही कामानिमित्त दुपारी केवळ एक तास घराबाहेर गेले असता, चोरटय़ांनी वरील किमतीचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या एका घटनेत नेरुळ येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे बाल-माता रुग्णालयात चोरटय़ांनी रात्रीच्या वेळी नर्स रूमच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतील ४० हजार रुपये किमतीचे संगणक चोरून नेले. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.