Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठीच ‘नर्सरी’ला खतपाणी
प्रतिनिधी / नाशिक

इयत्ता पहिलीत प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे वय पाच वर्षांहून अधिक असणे बंधनकारक आहे. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांने बालवाडीत प्रवेश घेणे अनिवार्य असल्याचा कुठलाही नियम नाही. तथापि, जवळपास सर्वच शाळांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या उद्देशाने के. जी. व नर्सरीच्या (बालवाडी) स्वतंत्र शाळा बिनदिक्कतपणे काढण्याचा मार्ग स्वीकारला आहे. शासन नियम इयत्ता पहिलीपासून लागू होत असल्याने त्याआधी जर शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना एखाद्या वर्गात प्रवेश देत असतील तर त्याविषयी कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे सांगत शिक्षण विभागाने हात झटकण्याची भूमिका ठेवली आहे.

..तर ही वेळ आली नसती!
दिनांक २१ मे. रात्रीचे साडेअकरा वाजलेले. नाशिकरोडहून निघालेली बस शहरातील वेदमंदिरजवळ आली असता बसमधून उतरताना एका प्रवाशाला आपला मोबाईल कोणीतरी चोरत असल्याची जाणीव झाली. प्रवाशाने त्याबद्दल हरकत घेतली असता ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ प्रमाणे चोरटय़ानेच मारहाण करण्यास सुरूवात केली. याशिवाय त्याचे साथीदार ताबडतोब एका वाहनातून तेथे दाखल झाले, आणि सर्वानी त्या प्रवाशास बेदम मारहाण केली. प्रवाशाकडील रोख रकमेसह इतर ऐवजही चोरून नेला. विशेष म्हणजे हा प्रकार होत असताना बसच्या चालक-वाहकांसह इतर कोणीही मदतीला धावले नाही. प्रवाशाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

घंटागाडीप्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय
अल्पमुदतीची निविदा काढणार
आयुक्तांसह प्रशासनावर टीका
प्रतिनिधी / नाशिक
घंटागाडीच्या विषयावरून थेट महापालिका आयुक्तांसह प्रशासनावर ताशेरे ओढतानाच दिवसेंदिवस गुंतागुंतीच्या बनलेल्या या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय शुक्रवारी पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. स्वतच्या मालकीच्या घंटागाड्या वापरात आणताना पालिकेने आपल्या हिताच्या अटी व शर्तींना प्राधान्य देवून अल्प मुदतीची फेरनिविदा काढावी असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. घंटागाडी प्रकरणावरून झालेल्या वादळी चर्चेचा अपवाद वगळता कोटय़वधी रूपयांचे अन्य प्रस्ताव यावेळी चर्चेविना मंजूर करण्यात आले.

पालिका स्थायी समितीच्या सदस्यांची आज नियुक्ती
प्रतिनिधी / नाशिक
जोरदार रस्सीखेच सुरू असल्यामुळे सर्वाचे लक्ष लागलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती शनिवारी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत जाहीर केली जाणार आहे. शिवसेना व भाजपचा अपवाद वगळता जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर न करण्याची खबरदारी घेतल्याने उत्सुकता अधिकच वाढली आहे.

अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
प्रतिनिधी / नाशिक

शहराच्या सिडको परिसरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित मात्र अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मच्छीमार व शेततळे धारकांसाठी आज नाशिकमध्ये कार्यशाळा
नाशिक / प्रतिनिधी
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नाशिक यांच्या विद्यमाने शनिवारी येथील कालिका देवी मंदिर सभागृहात दुपारी १२ ते ४ पर्यंत जिल्ह्य़ातील क्रियाशिल मच्छिमार व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे पदाधिकारी व शेततळीधारक यांच्याकरिता मत्स्योत्पादनाचे मार्गदर्शन व तात्विक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन तसेच ‘मत्स्य व्यवसाय : एक दृष्टीक्षेप’ पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्या हस्ते होणार आहे. मच्छिमारांना व शेततळे धारकांना सल्ला, मार्गदर्शन व तात्विक प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील मच्छिमार व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शेततळे धारकांनी मोठय़ा संख्येने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त बी. डी. पवार यांनी केले आहे.