Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

मालदीव : स्वप्नांचे पारदर्शी कवडसे

 

‘नंदनवनाला जाणारा रस्ता मालदीव बेटांवरून जातो.’ या वाक्याचा कॉपीराइट (जोपर्यंत कुणी चोरून वापरत नाही) तोपर्यंत माझा आहे.
‘‘मी खूप आनंदी आहे. सुंदर सागर, प्रकाशमय दिवस, छान सेवा.. निसर्ग.. जे मी अनुभवलं ते मी कधीच विसरणार नाही. हा माझा ठेवा आहे. एक दिवस मला माझ्या पत्नीसोबत इथं यायचंय.’’
या प्रतिक्रियेच्या खाली दुसरी प्रतिक्रिया लगोलग लिहिलेली आहे. ‘‘.. आणि मी तिचा पती आहे. माझी ही सुटी अप्रतिम होती. इथल्या सेवेबद्दल काय बोलावं.. मी पूर्ण समाधानी आहे आणि पुन्हा कधी तरी मी माझ्या पत्नीसह इथे येईनच. थँक यू, मालदीव’’
या दोन प्रतिक्रियांच्या खाली ‘वकाको’ आणि ‘तेत्सुया’ अशी नावं एकाच हस्ताक्षरात लिहिली आहेत. मालदीवमधल्या ‘आयलॅण्ड हाइडअवे’ (लपायचे बेट) नावाच्या आराम हॉटेलात आमच्या आधी वास्तव्य केलेल्या जोडप्याने खोलीतील नोंदवहीत नोंदविलेली प्रतिक्रिया मी जशीच्या तशी इंग्रजीतून मराठीत ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी अनुवादित करून वरती दिली आहे.
‘वकाको’ आणि ‘तेत्सुया’ या नावावरून हे जोडपं जपानी होतं हे आम्हाला समजलं; पण एक गोष्ट बराच ऊहापोह करूनही आमच्या लक्षात आली नाही. हे जोडपं म्हणजे नवरा-बायको होते, की प्रेमी युगुल? दिवसभर तर्क लढवूनही जेव्हा मी व साधना (बायकोचं बरं का!) निष्कर्षांप्रत आलो नाही तेव्हा या वादावर पडदा टाकण्यासाठी मी म्हणालो, ‘‘हा नंदनवनाचा तुकडा आहे, इथं आल्यानंतर अविवाहितांना विवाहितांसारखा आनंद आणि विवाहितांना प्रेमी युगुलासारखे स्वातंत्र्य अनुभवायला येत असल्याने आपण नेमके कोण आहोत याचा व्यक्तीला सहज विसर पडत पडत असावा’’ साधना या विचाराशी सहमत झाली.
इथं काल आल्यापासून एक गोष्ट जाणवली. ‘आपण ‘मानवते’पासून खूप दूर आल्याची भावना. निसर्गाचा एक भाग असलेल्या माणसाने प्रगती करीत असताना विषमता, पिळवणूक, शहरं, वादविवाद, भेदाभेद, दंगली, संस्था, देश, इमारती, पुस्तकं- सगळं तयार केलं आणि तो जगणं विसरला. इथं मालदीवच्या या बेटावर सागर, आकाश, नौकाविहार, सोनेरी वाळू, बाथटब, जाकुझी, डायविंग, सर्फिग या सुविधांसह जगण्याचा आनंद देणारी स्थळं विचारपूर्वक तयार केलेली आहेत आणि जगभरचे लोक इथं मिळणाऱ्या एकांतासाठी गोळा होतात.
अर्थात याची एक किंमत आहे. मी ज्या बेटावर आहे ते सगळं बेट सध्या एका खासगी कंपनीकडे आहे. या बेटाच्या गर्द हिरव्या झाडीत २०-३० झोपडय़ांसारख्या दिसणाऱ्या पण सप्ततारांकित सोयीच्या बंगली (व्हिला) आहेत आणि एकेका खोलीचं भाडं आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. मला अतिप्रचंड सवलतीच्या दरात इथं प्रवेश मिळाला नसता तर मी स्वखर्चानं इथं कधीच आलो नसतो. हे बेट म्हणजे स्वर्गाचा तुकडा असेलही; पण सर्वसामान्य माणसाला या तुकडय़ाच्या आसपास फिरकणेसुद्धा शक्य नाही. शिवाय या बेटावरील सुविधांमध्ये मालदीवच्या जनतेला स्थान नाही. मालदीव हा मुस्लीम देश आहे आणि कायद्याने इथे सक्तीची दारूबंदी आहे. त्यामुळे मालदीवचे लोक या रिसॉर्टचा आनंद घ्यायला आले तरी ते दारू पिऊ शकत नाहीत. या बेटावर मला गेल्या तीन दिवसांत एकही मालदीवियन जोडपे दिसले नाही, एकही भारतीय जोडपे दिसले नाही. फक्त गोरे, त्यातही रशियन, जर्मन, फ्रेंच आणि याशिवाय जपानी. गरीब राष्ट्रांना आणि गरिबांना मज्जाव नाही; पण भांडवलशाहीच्या या परिपक्व नमुन्याच्या स्वत:च्या अनेक मर्यादा आणि विरोधाभास आहेत.
मालदीवमध्ये तीन प्रकारची बेटं आहेत. पहिली मनुष्यवस्ती असलेली, दुसरी मनुष्यवस्ती अजिबात नसलेली, तिसरी विलास आणि ऐशोआरामाची केंद्रं म्हणून विकसित केली गेलेली. तिसऱ्या वर्गातल्या बेटातलं स्वर्गसुख अनुभवल्यानंतर मी मनुष्यवस्ती असलेल्या पहिल्या गटातल्या एका बेटाला भेट दिली. उतीम नावाच्या या बेटानं मला आणखीनच शहाणं केलं.
मालदीवच्या ११९२ बेटांमधल्या फक्त २०० बेटांवर मनुष्यवस्ती आहे हे त्यातलं एक. माझ्या लपायच्या बेटांपासून मोटारबोटने २० मिनिटांचा समुद्र पार करून
या बेटावर उतरायला धक्का नाही. किनाऱ्यापर्यंत कशी तरी बोट आली आणि आम्ही उडय़ा मारल्या. वाळूतून चालत बेटावर आलो. हे या देशातील एक अति उंच बेट मानलं जातं, कारण समुद्रसपाटीपासूनची उंची २.५ मीटरच्या आसपास आहे. इतरत्र ही उंची सरासरी दीड मीटपर्यंतच आहे. गावाची लोकसंख्या ७८३. त्यातले २०० विद्यार्थी. बाकी प्रौढ लोक. अर्धे पुरुष, अध्र्या स्त्रिया. बेटाचा परिघ सव्वा कि. मी. आमच्या तिथल्या तीन तासांच्या वास्तव्यात फार तर १५-२० लोक रस्त्यावर दिसले असतील. लगबग किंवा घाई कुणालाच नव्हती. या बेटापलीकडच्या विश्वाचा या गावाला पत्ताच नसावा, असे वातावरण.
या गावात (किंवा बेटावर) तीन गोष्टी पाहिल्या. ठाकूरफानू या राष्ट्रीय नेत्याचे जन्मघर. १६ व्या शतकात त्याने पोर्तुगीजांना या देशातून पळवून लावले. गनिमी काव्याने त्यांच्यावर हल्ला करून पराभव केला आणि माले या राजधानीच्या शहरात स्वत:ची सुल्तानी सुरू केली. माले बेटाला प्रदक्षिणा घालणारा सगळ्यात मोठा रस्ता ठाकूरफानू या नावाने ओळखला जातो उतीममध्ये. त्यांचे घर जसेच्या तसे जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. छोटय़ा छताचे हे छोटेखानी घर, त्यातले त्याचे छोटे शय्यागृह, कोठी, दोन खोल्या यांना ‘महाल’ का म्हणायचे असा आपल्याला प्रश्न पडतो. पण स्थानिकांना तो राष्ट्रपुरुष असल्याने त्यांच्या दृष्टीने ते घर म्हणजे अभिमानाची जागा आहे.
रस्त्यावरून चालता चालता तिथले प्राथमिक आरोग्य केंद्र दिसले. ‘चला पाहूया’ म्हणून आत घुसलो. तिथल्या सुविधा पाहून थक्क झालो. स्वच्छ भिंती, आधुनिक उपकरणं, सुंदर खुच्र्या-टेबले पाहून आपल्या प्राथमिक केंद्रांची आठवण झाली. तुलनासुद्धा कठीण व्हावी इतका फरक. डॉक्टरांना भेटायचे ठरवले तर चक्क भारतीय नमस्कारासहीत चंदिगढचे डॉ. पुरी समोर आले. ते व त्यांच्या पत्नी दोन भारतीय नर्सेस इथं काम करताहेत. त्यांचं जीवनही या बेटापुरतंच. ‘इथं करमणूक नाही, कंपनी नाही, वृत्तपत्रे नाहीत. एवढेच काय आजारी लोकही फारसे नाहीत.’ त्यामुळे डॉक्टरांना फावल्या वेळात काय करावे सुचत नाही. पत्रं यायला दोन-दोन महिने लागतात, कारण नियमितपणे या बेटाचा जगाशी संपर्क नाही. ‘इथं काही भारतीय शिक्षक आहेत’ असं ते म्हणाले. तेव्हा मी लगेच शाळा पाहाण्याची इच्छा का व्यक्त केली.
शाळा आरोग्य केंद्राप्रमाणेच सुसज्ज व अद्यावत. भारतातील केरळचे जोसेफ तिथले प्राचार्य. अठरापैकी नऊ शिक्षक भारतीय. सगळ्यांना भेटलो. वर्ग पाहायची इच्छा होती. सगळे वर्ग पाहिले, दोन वर्गात प्रवेश करून गप्पा मारल्या. सगळ्यांचे चेहरे प्रसन्न होते, गणवेश स्वच्छ होते आणि विद्यार्थी थोडेसे बाहेरच्या व्यक्तीला पाहून बुजलेले दिसले. पण प्रश्नांची उत्तरं लाजत मुरडत का होईना दिली. मुलं-मुली एकत्र शिकताहेत. मुलींचे डोके स्कार्फने झाकलेले. ‘काय व्हायचंय पुढं जाऊन?’ विचारलं तर एक विद्यार्थी म्हणाला, ‘पोलीस.’ मला आश्चर्य वाटलं. त्या बेटाची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती इतकी चांगली आहे की तिथं पोलीसच नाहीत. ‘पोलीस आले तर गुन्हेही वाढतील का?’ असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. गंमत म्हणून मी त्या विद्यार्थ्यांना ‘मला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा’, म्हणालो. ‘सिंधु संस्कृतीची तीन वैशिष्टय़ं सांगा’ असा अवघड प्रश्न अचानक कुणीतरी विचारला आणि भारतीय उच्चायुक्तांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर.. या विचारानंच माझी भंबेरी उडाली.
बेटावरची भेट संपवून परतीच्या प्रवासात डॉ. पुरी निरोप द्यायला आले त्या वेळी इथल्या लोकांचं भवितव्य काय? असा प्रश्न मी त्यांना विचारला. ते म्हणाले, ‘‘इथल्या लोकांना सप्ततारांकित हॉटेलात वेटर किंवा बटलर व्हावंसं वाटतं. कारण त्यापलीकडचं जग त्यांना माहीत नाही. रेल्वे, टेकडी, रस्ता, अशा साध्या गोष्टीही त्यांना फक्त चित्रपटातच दिसतात..’ परतीच्या प्रवासात मी बेटावरच्या माणसांचा विचार करत राहिलो. हे सगळं थोडंसं स्वर्गसुखासारखंच आहे. सगळी सुखं आहेत. पण कार नाही, भाजीपाला नाही आणि दूरवर चालून यावं तर रस्ता नाही.
मालदीवचे सौंदर्य व शाप इथला सागर आहे. या देशाच्या नशिबात समुद्राचे वैभव आहे. पण मातीचा स्पर्श नाही. प्रवाळातून बनलेल्या या बेटात वाळू आहे. पण माती नाही, दगड नाहीत. मालदीवचे खरे सौंदर्य पाहायचे तर त्याला ‘विहंगम’ होणे गरजेचे आहे. आकाशातून पाहताना मालाद्वीप म्हणजे काय याचा प्रत्यय येतो. अनेक छोटय़ा छोटय़ा बेटांची (ज्याला हे लोक अटोल म्हणतात) आणि अशा अनेक माळा गुंफून तयार झालेला हा बेटांचा हार आहे. आकाशातून हिंद महासागरावरचे हे ठिपके पाहताना त्याच्या सौंदर्याचे आकलन होते. असे वाटते की, निसर्गाने स्वप्नांचे बुडबुडे हिंद महासागरावर ठेवले आहेत. त्या प्रत्येक ठिपक्याची एक सुंदर कविता बनेल. पण त्या कवितेसाठी शब्द कुठून आणायचे? असे शब्द अजून जन्माला यायचे आहेत. मला मालद्वीपात दोन-तीन वर्ष राहायचंय. कुणी सांगावं मलाच ते शब्द सापडतील आणि बेटं आणि समुद्र यातलं स्वर्गसुख चिमटीत पकडता येईल.
या दरम्यान, ‘लपायच्या जागे’तील मानवनिर्मित सुख अनुभवतोय. जेवणाचा मेन्यू सर्वाना माहीत आहे. पण मानेखाली घ्यायच्या उशीचा मेन्यू इथे आहे. अशा उशांचे १५ प्रकार दिले आहेत. आपल्याला हवी ती मागवून घ्यायची. चंदेरी, पिसांसारखी, शुद्ध कापसाची, हवा खेळणारी, बदकाच्या पिसांची, बकरीच्या केसांची, पहाटेसारखी वगैरे वगैरे.
मला मात्र राजधानी मालेचे वेध लागले आहेत. समुद्र आणि बेटांचे सौंदर्य दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ पचवणे कठीण आहे. माले हे माणसांचं शहर आहे. किती माणसं आहेत तिथं? जगातली सगळ्यात दाट वस्तीची राजधानी लोकसंख्या? एक लाख. क्षेत्रफळ? अडीच किलोमीटर!
ज्ञानेश्वर मुळे
dmulay@hotmail.com