Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

(सविस्तर वृत्त)

केरळातला अभिनव प्रयोग

 

१९६२ साली केंद्र सरकारने पुण्यातला प्रभात स्टुडिओ विकत घेऊन तेथे चित्रपट प्रशिक्षण देण्यासाठी ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’ सुरू केली. केरळचा सध्याचा जगन्मान्य दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन फिल्म इन्स्टिटय़ूटच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी होता. तीन वर्षांनी दिग्दर्शनाचा डिप्लोमा घेऊन अदूर त्रिवेंद्रमला परतला. स्वत:चा चित्रपट दिग्दर्शित करण्याची खटपट त्याने आरंभली. त्याच्यासमोर दोन मुख्य समस्या होत्या. पहिली समस्या होती चित्रपटासाठी भांडवल मिळविण्याची. त्यासाठी मित्रांना जमवून अदूरने १९६५ मध्ये फिल्म को-ऑपरेटिव्ह सुरू केली. पण दुसरी समस्या त्याहून गंभीर होती. १९६७-६८ साली मल्याळी सिनेमा हा तामिळ सिनेमासारखा धंदेवाईक व फॉम्र्युलाप्रधान होता. मल्याळम् चित्रपट तेव्हा मद्रासलाच तयार होत होता. हिंदी धंदेवाईक सिनेमाला ‘मसाला फिल्म’ म्हणतात, तर दाक्षिणात्य धंदेवाईक चित्रपटांना ‘मसाला डोसा फिल्म’ त्यावेळी म्हणत. गाणी, नृत्य, मेलोड्रामा म्हणजे सिनेमा हे समीकरण मल्याळी प्रेक्षकांच्या मनात घट्ट रुतून बसलेले होते. अदूरला तर या चाकोरीबाहेरचा स्वत:चा सिनेमा करायचा होता. केवळ स्थानिक प्रेक्षकांपुरता नव्हे, तर आंतरराष्ट्रीय रसिकांपर्यंत पोचेल असा सिनेमा अदूरच्या मनात होता, पण प्रेक्षक प्रगल्भ नव्हता.
अदूरने चित्रपट निर्मितीची घाई केली नाही. मनातला सिनेमा जनांपर्यंत पोचविण्यासाठी त्याने सत्यजित राय यांचा मार्ग अवलंबिला. सत्यजितनी १९४७ साली प्रथम कलकत्ता फिल्म सोसायटी सुरू केली आणि आठ वर्षांनंतर त्यांचा पहिला चित्रपट ‘पथेर पांचाली’ प्रकाशित झाला. तेव्हा फिल्म सोसायटी चळवळ देशातच शिशु अवस्थेत होती. १९६७ सालात ती बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली, मद्रास येथे बऱ्यापैकी मूळ धरू लागली होती, पण केरळमध्ये फिल्म सोसायटीच नव्हती. सुजाण प्रेक्षक निर्माण करण्यासाठी अदूरने त्रिवेंद्रमला ‘चित्रलेखा’ फिल्म सोसायटीची स्थापना केली. केरळमध्ये तेव्हा ८० टक्के साक्षरता होती. इंग्रजी जाणणारेही बहुसंख्य होते. चित्रलेखा फिल्म सोसायटी एकदम लोकप्रिय झाली. हजार सदस्य झाले. पत्रकार, प्राध्यापक, लेखक या सर्वानी ‘चित्रलेखा’चे मनापासून स्वागत केले. त्यापाठोपाठ कालिकत व कोट्टायम येथे लगेच फिल्म सोसायटय़ा सुरू झाल्या. त्या मॉडेलवर १९७० सालापर्यंत १०-१५ फिल्म सोसायटय़ा केरळभर स्थापन झाल्या. नव्या सिनेमाचे स्वागत करणारा थोडाफार प्रेक्षक तयार झाला.
१९७० नंतर चित्रलेखा फिल्म को-ऑपरेटिव्हसाठी अदूरने ‘स्वयंवरम्’ हा चित्रपट निर्माण करायला आरंभ केला. सरकारच्या फिल्म फायनान्स कॉपरेरेशनकडून कर्ज मिळवले. ‘स्वयंवरम्’ १९७२ साली प्रकाशित झाली. शारदा या मल्याळीतील लोकप्रिय तारकेची त्यात प्रमुख भूमिका होती. ‘स्वयंवरम्’ला चांगला प्रेक्षक लाभला. को-ऑपरेटिव्हने फिल्म फायनान्स कॉपरेरेशनचे सर्व कर्ज फेडून टाकले. जेमिनीच्या वासनना ‘स्वयंवरम्’ खूपच आवडला. त्यांनी त्याचे हक्क खरेदी करून ‘शारदा’लाच प्रमुख भूमिका देऊन ‘समाज को बदल डालो’ हा हिंदी चित्रपट काढला.
फिल्म सोसायटी चळवळ १९७० नंतर केरळमध्ये इतकी वेगाने पसरली की जिल्हा, तालुका करत करत पंचायतीपर्यंत पोचली. सर्वात जास्त फिल्म सोसायटय़ा आज केरळमध्ये आहेत. आधी सुजाण प्रेक्षक, नंतर ‘कला’त्मक चित्रनिर्मिती हा अदूरचा अभिनव प्रयोग चांगलाच यशस्वी झाला.
सुधीर नांदगावकर
फेडरेशनचे केंद्रीय सचिव
cinesudhir@gmail.com