Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

‘मार्ड’चा संप सुरू; प्रशासन भूमिकेवर ठाम
पुणे, २९ मे/प्रतिनिधी
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी निवासी विद्यार्थी डॉक्टर महिलेस रागावल्यामुळे तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ निवासी विद्यार्थी डॉक्टरांच्या (मार्ड) संघटनेने काल रात्रीपासून संप पुकारला. या संपास परिचारिका संघटनेने पाठिंबा दिल्याचा दावा संघटनेने केला असून, सायंकोळी निषेध मोर्चाही काढला. दरम्यान, वैद्यकीय सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

गांजाच्या गोदामावरच छापा
सुमारे ४० लाख रुपये किमतीचा तब्बल दोन हजार ५७ किलो गांजा जप्त; एकास अटक

पुणे, २९ मे/प्रतिनिधी

पुणे शहरात गांजाचा पुरवठा करणाऱ्याला जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले असून, त्याच्या कोंढवा येथील गोडाऊनमधून सुमारे ४० लाख रुपये किमतीचा तब्बल दोन हजार ५७ किलो गांजा पोलिसांना मिळाला. मागील काही वर्षांमध्ये पुण्यात प्रथमच मोठय़ा प्रमाणावर गांजाचा साठा मिळाला आहे. अयुब अमिर खान (वय ५०, रा. नाना पेठ, पुणे, सध्या रा. गुलमोहर हॉलीजनसमोर, कोंढवा खुर्द) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योती पूरकर यांनी त्यास ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिंपरीत ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर जलपर्णी काढणार
पिंपरी, २९ मे/प्रतिनिधी

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिके चा अजब कार्यक्रम अत्यंत चुकीचा व केवळ ठेकेदारांचे हित पाहाणारा असल्याने रद्द करावा, अशी रोखठोक मागणी सामान्य जनतेच्या आघाडीचे राजू सावळे व पांडुरंग गरसुंडे यांनी आज केली. दरम्यान, या आरोपात तथ्य नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी अधिकारी राजाराम बोरकर यांनी सांगितले.

चाकणचा संग्रामदुर्ग उजळणार दुर्गदिनी!
पुणे, २९ मे/प्रतिनिधी

फिरंगोजी नरसाळा या शूर किल्लेदाराने शिवकाळात गाजवलेल्या चाकणच्या संग्रामदुर्गच्या दुरवस्थेचे फेरे आता संपुष्टात आले असून, येथील फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून हा भुईकोट कात टाकत आहे. या निमित्ताने येत्या दुर्गदिनी (१ जून) या भुईकोटातच पुण्याच्या इतिहासप्रेमी मंडळाच्या मदतीने येथे दुर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्लास्टिक पिशव्या बंदीची वाट खूपच दूरची आणि खडतरही!
पुणे, २९ मे/ प्रतिनिधी
शहरात सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या व कॅरीबॅगना बंदीचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला असला, तरी या निर्णयाच्या अंमलबजावणीचा रस्ता अजून खूपच दूरचा आणि खडतर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहऱ्यातील कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांना व कॅरीबॅगना बंदी करण्याचा निर्णय स्थायी समितीने गेल्या मंगळवारी एकमताने घेतला.

पिंपरी पालिका देणार नगरसेवकांना बॅज
पिंपरी, २९ मे / प्रतिनिधी

शहरातील वाढती गुन्हेगारी, पालिका इमारतीत होत असलेले गुन्हे, वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे, घेराव यासारखी आंदोलने आणि नागरिकांच्या गर्दीत ओळखू न येणारे नगरसेवक आदींचा विचार करुन िपपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व ११० नगरसेवकांना यापुढे ओळखचिन्ह (बॅच) देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

विद्येच्या माहेरघरात राज्यातील पहिले ‘कम्युनिटी कॉलेज’
पुणे, २९ मे/खास प्रतिनिधी
वंचित घटकांमधील मुला-मुलींना कौशल्याधारित शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या ‘कम्युनिटी कॉलेज’ची चळवळ आता राज्यातही सुरू होत असून पुण्याजवळील लवळे येथून त्याचा प्रारंभ होत आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे देशभर ‘कम्युनिटी कॉलेज’ ही चळवळ सुरू करण्यात आली आहे.

‘मन’ विषयावर चित्रप्रदर्शन
पुणे, २९ मे / प्रतिनिधी

कलातीर्थ या संस्थेतर्फे आयोजित ‘मन’ या विषयावरील तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन येत्या मंगळवारी (दि. २ जून) रोजी करण्यात येणार आहे. बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी इतिहासाचे अभ्यासक निनाद बेडेकर व ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अमोल काळे यांनी दिली. चित्रप्रदर्शनात तीन ते साठ या वयोगटातील मुलांना सहभागी केले जाते. प्रदर्शनाचा यंदाच्या वर्षीचा विषय ‘मन’ हा असून त्यामध्ये रामदास स्वामीकृत ‘मनाचे श्लोक’ यावरील चित्रे आहेत. लहानमोठय़ांसह सर्वानी त्यांच्या मनात येणाऱ्या भावना प्रदर्शनामध्ये चित्ररूपाने सादर केल्या आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालवधीत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले असल्याचेही काळे यांनी सांगितले.

महसूल कर्मचाऱ्यांची संरक्षणाची मागणी
पुणे, २९ मे/ प्रतिनिधी

गुलटेकडी औद्योगिक विभागात रॉकेलच्या अवैध साठा सापडल्याच्या दिवशी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना वाढत असल्याने कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांनी याबाबत एक निवेदन दिले आहे. मारहाणीबरोबरच स्थानिक पुढारी व दलालांकडून सातत्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात मांडली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास त्यांना कायद्याचे विशेष संरक्षण द्यावे. त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करावा, आदी मागण्याही संघटनेने केल्या आहेत.

विजेच्या धक्क्य़ाने बापलेकीचा मृत्यू
शिक्रापूर, २९ मे/वार्ताहर

आपटी (ता. शिरूर) येथे विजेचा धक्का बसून एका युवतीचा तसेच तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांचाही मृत्यू झाला. आज सकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव शोकाकूल झाले होते. विठ्ठल गोपाळा गुंड (वय ४५) आणि त्यांची मुलगी अर्चना (वय १७) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरणचे वायरमन अंकुश गव्हाणे व सुभाष जगताप यांना बेदम मारहाण केल्याने ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील दवाखान्यात दाखल केले आहे.

जिल्हा परिषदेतील कर्मचारी तडवळकर सेवानिवृत्त
पुणे, २९ मे / प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहायक विजय तडवळकर आज सेवा निवृत्त झाले. सेवा निवृत्त झाल्याने प्रशासनामार्फत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली आबणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीवकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. बनकर आदींची यावेळी उपस्थिती होती. तडवळकर यांची ३८ वर्षांच्या सेवेपैकी जिल्हा परिषदेत २५ वर्षे सेवा झाली.

चऱ्होली परिसरात पाणीटंचाई
पिंपरी २९ मे / प्रतिनिधी

चऱ्होली परिसरात गेल्या महिनाभरातील तीव्र पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून महापालिकेने त्वरित दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. विष्णू तापकीर यांनी दिला आहे. महापौर अपर्णा डोके व पालिका आयुक्त आशिष शर्मा यांना दिलेल्या लेखी निवेदनात या परिसराचे गाऱ्हाणे मांडले आहे. चऱ्होली बुद्रुक, वडमुखवाडी, चोविसावाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, ताजणेवस्ती, बुर्डेवस्ती, दाभाडेवस्ती या भागात वाडय़ावस्त्यांवर पाणी टंचाई आहे. पालिके तर्फे दिवसातून एकदाच अत्यंत अपुरे पाणी देते, तेसुध्दा कमी दाबाने फक्त १५ ते २० मिनिटेच असते. पालिकेने अद्याप या गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे, असे तापकीर यांनी निदर्शनास आणले. पालिकेने सात दिवसांत कायमस्वरुपी पाणी पुरवठय़ाचे नियोजन करावे, अन्यथा सर्व गावांतील महिलांचा ‘हंडा मोर्चा ’काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.