Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

दुर्घटनेनंतरही ‘सर्चर’ची टेहळणी सुरूच राहणार
अनिकेत साठे
नाशिक २९ मे

 

प्रशिक्षणादरम्यान कोसळलेल्या ‘सर्चर मार्क-१’ या वैमानिकरहित विमानाच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी लष्कराच्या उच्चस्तरीय अधिकारी व तज्ज्ञांचे पथक उद्या, शनिवारी तोफखाना स्कूलमध्ये दाखल होत आहे. इस्त्रायली बनावटीचे हे विमान ज्या कंपनीचे आहे, त्या कंपनीच्या तज्ज्ञांनाही पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर, वैमानिकरहित विमानांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले असले तरी लष्कराच्या ताफ्यात असणाऱ्या ‘सर्चर मार्क १’ंच्या वापरावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
देवळालीच्या तोफखाना स्कूलच्यावतीने लष्करी अधिकाऱ्यांना वैमानिकरहित विमानांचे प्रशिक्षण ‘इंटर्नल, एक्स्टर्नल पायलट अ‍ॅण्ड ऑब्झव्‍‌र्हर’ या अभ्यासक्रमाद्वारे दिले जाते. गुरूवारी नेहमीप्रमाणे प्रशिक्षण सुरू असताना ‘सर्चर मार्क १’च्या इंजिनमध्ये दोष निर्माण झाला आणि ते शहरालगतच्या द्राक्षबागेत जावून कोसळले. जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने संचालन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तथापि, तो यशस्वी होवू शकला नाही, असे स्कूलचे म्हणणे आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत तोफखाना स्कूलने यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तातडीने चौकशी समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने विमानाचे अवशेष गोळा करण्यापूर्वी घटनास्थळाचे छायाचित्रण करण्यात आल्याची माहिती स्कूलचे कर्नल अशोककुमार भोईया यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या घटनेची चौकशी लष्कराच्या वैमानिकरहित विमानांच्या तंत्रज्ञानाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकारी व तज्ज्ञांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच हे विमान ज्या इस्त्रायली कंपनीचे आहे, त्या कंपनीच्या तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले आहे. कंपनीच्या तज्ज्ञांचा मात्र चौकशी समितीशी कुठलाही संबंध राहणार नसल्याचे भोईया यांनी सांगितले. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत या विमानांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले असले तरी लष्कराकडे असलेल्या ‘सर्चर मार्क १’ विमानांच्या वापरावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शत्रुच्या हद्दीतील संशयास्पद माहिती आणि टेहळणीसाठी वापरली जाणारी सर्चर मार्क - १, सर्चर मार्क - २ आणि हेरॉन जातीची विमाने सध्या भारतीय लष्कराकडे आहेत. युद्धकाळात त्यांचा वापर प्रामुख्याने तोफखाना विभागामार्फत केला जातो. या विमानाकडून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे कुठल्या ठिकाणांवर हल्ले चढवायचे त्याचे निर्णय घेतले जातात.
तोफखाना विभागाकडील तिन्ही विमाने इस्त्रायल बनावटीची असून ते सलग १२ ते १५ तास अवकाशात भ्रमंती करू शकतात. शिवाय, १२० किलोमीटरच्या परिघात रिमोट कंट्रोलद्वारे त्यांना नियंत्रित करता येते.