Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

जळगावात बारा बलुतेदारांच्या एकतेची गुढी ; आंदोलनाचा निर्धार
जळगाव, २९ मे / वार्ताहर

 

बारा बलुतेदार समाजाच्या व्यथा आजवर कोण्या राजकारण्यांनी मनावर घेतल्या नाहीत आणि या लहान जाती सुद्धा एकत्र येत नसल्याने राजकारणी लोकांनी त्याचा फायदा घेतला, असा सूर व्यक्त करतानाच येथे आयोजित मेळाव्यात बारा बलुतेदारांच्या एकतेची गुढी उभारण्यात आली. त्याचप्रमाणे आपल्या हक्कांसाठी जनआंदोलनाचा निर्धार व्यक्त करून ही संघटना कोणाच्याही दबावाखाली काम करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बारा बलुतेदार समाजाचा विभागीय जनजागृती मेळावा शहराच्या नूतन मराठा महाविद्यालयात धोबी, न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, सोनार आदी समाजाच्या राज्य तसेच जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडला. धोबी समाज संघटनेचे बालाजी शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, बलुतेदारांच्या व्यथा आजवर कोणीही जाणून घेतल्या नाहीत. असंघटीत असल्यानेच या समाजांच्या पदरी ही निराशा पडली आहे. त्यासाठी आता मजबूत संघटना स्थापन करून आपल्या न्याय्य मागण्या व हक्कांसाठी शासनावर दबाव टाकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या समाजांनी जेव्हा कधी एकत्र येण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजकारण्यांनी त्यात फूट पाडली. पण आता तसे होणार नाही या संघटनेवर कोणाचा दबाव नसेल व नियंत्रणही नसेल आणि आता आम्हीच आमच्या मागण्यांसाठी प्रखर जन आंदोलन उभारू असानिर्धार व्यक्त करताना मेळाव्यात सर्व समाजांच्या एकतेची गुढी उभारण्यात आली.
शिंपी समाजाचे मुकुंद मेटकर, नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे, जिल्हाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, कुंभार समाजाचे चंद्रशेखर कापडे, परिट धोबी समाजाचे अरूम शिरसाळे व विवेक ठाकरे, राजेश वानखेडे, विठ्ठल सावकार, सुतार समाजाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दळवी आदींनी मनोगत व्यक्त केले. धोबी व न्हावी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, कुंभार व भोई समाजाला सुद्धा यात समाविष्ट करावे, बलुतेदारांना शैक्षणिक सुविधा, उद्योगासाठी अल्प दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.