Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कर्जत नगर परिषद हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू
कर्जत, २९ मे/वार्ताहर

 

कर्जत नगर परिषद हद्दीतील ज्या रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते खोदण्यात आले आहेत; अशा सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम कर्जत नगर परिषदेच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या कामाचा प्रारंभ कर्जतचे नगराध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आला. या विशेष मोहिमेच्या अंतर्गत कर्जत व दहिवली यांना जोडणाऱ्या श्रीराम पुलापासून आमराई परिसरात जुन्या सिद्दिक मंझिलनजीक असलेल्या हॅपी होम अपार्टमेंटपर्यंतचा रस्ता हा फारच खराब झालेला असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय कर्जत नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आला होता. त्यानुसार हाती घेण्यात आलेल्या या कामाचे उद्घाटन कर्जतचे नगराध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे, नगर परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती गुरुनाथ पालकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती दीपक मोरे, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राहुल डाळिंबकर, भारतीय जनता पक्षाचे कर्जत शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सुनील गोगटे, माजी नगरसेवक दिनेश भोपतराव तसेच संदीप शिंदे, प्रकाश जैन, शाम जोशी, सुनील हरपुडे, संतोष थोरवे, महेंद्र लाड, नीलेश चौंडिये, रवींद्र लाड यांच्यासह अनेक नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.