Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

भाषिक वृत्तपत्रांची भविष्यात प्रगती होणार - दिनकर रायकर
पनवेल, २९ मे/ खास प्रतिनिधी

 

देशामध्ये ६४ हजार नोंदणीकृत वृत्तपत्रे असून सर्वाचा खप दोन कोटी आहे, तर देशाची लोकसंख्या सुमारे सव्वाशे कोटी आहे, त्यामुळे वृत्तपत्रवाढीला मोठी संधी असल्याचे स्पष्ट करून, भाषिक वृत्तपत्रांची आता नजिकच्या भविष्यात प्रगती होणार असल्याचे मत दैनिक लोकमतचे संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले आह़े रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनचा पाचवा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवारी येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होत़े
यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गजानन बाबर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार तुकाराम सुर्वे, रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख बबन पाटील, रायगड मनसे अध्यक्ष मनीष खवळे, अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जयंत धुळप, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. रायकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, पत्रकारांनी आपला धर्म पाळला तर तो कोणाचा शत्रू होण्याचे कारणच नाही़ खरे आहे ते लिहिले, तर समाजाची चांगली प्रगती होऊन समाजजागृती होते, असेही ते म्हणाल़े रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष मनोज घोसाळकर यांनी प्रास्ताविक केल़े प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दैनिक सकाळचे प्रतिनिधी व अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष आविष्कार देसाई यांना निर्भीड युवा पत्रकारिता पुरस्कार, माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद परुळेकर यांना पोलीस भूषण पुरस्कार, वंदना मोरे यांना हिरकणी पुरस्कार, कांतिलाल कडू यांना समाजभूषण पुरस्कार, उदय कळस यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, सुधीर माने यांना आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल़े मान्यवरांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.