Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

यंदाच्या डॉ. ना.भि.परुळेकर पत्रकारिता पुरस्काराकरिता जयंत धुळप यांची निवड
रोहा, २९ मे/खास प्रतिनिधी

 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. ना.भि. परुळेकर पत्रकारिता पुरस्काराकरिता यंदा ‘लोकसत्ता’चे रायगड जिल्हा प्रतिनिधी जयंत नारायण धुळप यांची निवड करण्यात आली असून, येत्या ३१ मे रोजी येथील डॉ. सी.डी.देशमुख सभागृहात होणाऱ्या संघाच्या ५२व्या वार्षिक संमेलनात संमेलनाध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे व संमेलनाचे यजमान तथा रोह्याचे उपनगराध्यक्ष अवधुत तटकरे यांनी दिली आहे.
जयंत धुळप यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा विकास वार्ता पुरस्कार सलग तीन वर्षे संपादन करून, राज्यात एक आगळी हॅट्रिक साध्य केली आहे. त्याव्यतिरिक्त रायगड जिल्हा परिषदेचा रायगड मित्र पुरस्कार, समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार, ग्रामविकास मंत्रालयाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार, स्नॅप अ‍ॅकॅडमी एक्सलन्स इन जर्नालीझम अ‍ॅवॉर्ड आदी विविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे ते राज्य अध्यक्ष असून, विविध जिल्ह्यांत त्यांनी पत्रकार कार्यशाळांचे आयोजन केले आहे. संघाच्या संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम विधितज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड.भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते होणार असून, यावेळी रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूर्वा मोहिते, दैनिक रामप्रहरचे संपादक मधुकर भावे, दैनिक पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक संजीव साबडे, दैनिक कृषिवलचे संपादक एस.एम.देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ‘वृत्तपत्र लेखक- समाजातील जागल्या’ या परिसंवादात कोकण वैभवचे कार्यकारी संपादक प्रा. हेमंत सामंत, पोलादपूर येथील पत्रकार शैलेश पालकर, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधुकर ताटके व शरद वर्तक हे सहभागी होणार आहेत, तर ‘रायगड जिल्हा- वेध भविष्याचा’ या परिसंवादात दैनिक सागरचे संपादक निशिकांत जोशी, दैनिक विश्वरूपचे संपादक सतीश धारप, दैनिक ‘लोकसत्ता’चे रायगड जिल्हा प्रतिनिधी जयंत धुळप व ज्येष्ठ साहित्यिका सुनीता जोशी हे सहभागी होणार आहेत.