Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

गटसचिवांच्या लेखणी बंद आंदोलनाचा खरीप हंगामावर परिणाम
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, २९ मे

 

सहकार विकास सोसायटय़ांच्या राज्यातील सुमारे ४० हजार गटसचिवांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केल्याने, खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य शासनाने त्यावर पर्यायी तोडगा न काढल्यास शेतकऱ्यांना सावकाराच्या दरवाजावर जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सहकार विकास सोसायटी गटसचिवांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे. त्या मागण्या मान्य करण्यात आल्या नसल्याने ४० हजार गटसचिवांनी २५ मेपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८० गटसचिवांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
सहकारी सोसायटी गटसचिवांच्या राज्यस्तरीय सहकारी चिटणीस फेडरेशनने हे आंदोलन छेडले आहे. सर्व गटसचिवांना सहकार आयुक्तांच्या अधिपत्याखाली सरकारी सेवेत सामावून घेणे, गटसचिवांचे पगार व देणी त्वरित देण्यात यावी, सर्व संस्थांची व जिल्हा बँकेची येणी व थकबाकी पगार, वर्गणी वसूल करून मिळावी, अशा संघटनेच्या मागण्या आहेत.
राज्यातील गट संघटनेबरोबर चर्चा करून स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह गटसचिवांच्या नोकरी व पगाराच्या हमीबाबत हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
गाव पातळीवर विविध विकास सेवा सोसायटीच्या वतीने गटसचिव गावातील शेतकऱ्यांना शेती, शेतघर, बैलजोडी, शेती यंत्रे, शेती बियाण्यासाठी पतपुरवठा करणारा प्रस्ताव जिल्हा बँकेस सादर करतो. त्यानंतर जिल्हा बँक हा पतपुरवठा मंजूर करते.
केंद्र व राज्यातील कर्जमाफी, नियमित कर्जवाटप, व्याज, सूट आदी योजना गटसचिव यांच्यामार्फत राबविल्या जातात. ऐन हंगामात सर्व गटसचिव लेखणी बंद आंदोलनात सामील झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह शेतकऱ्यांसमोर पेच प्रसंग निर्माण झाला आहे.
गटसचिव हा जिल्हा बँक व विकास सोसायटीमधील शेतकऱ्यांचा समन्वयक असतो. तोच चाव्या घेऊन संपात सहभागी झाल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.