Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

वीज बिल न भरल्यामुळे नवघरचे आरोग्य केंद्र अंधारात
नालासोपारा, २९ मे/वार्ताहर

 

नवघर-माणिकपूर नगरपालिका क्षेत्रातील नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या अंधारात आहे. सुमारे ७५ हजार रुपये वीज बिल न भरल्यामुळे वीज मंडळाने वीज कापून टाकली आहे. वसई पंचायत समितीच्या अंतर्गत आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे येतात. त्यातील वसई स्टेशनलगत असलेले नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्व सुविधांनी युक्त आहे. नवघर-माणिकपूर नगरपालिकेने येथे शीतगृहही उभारले आहे, त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात शहरी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांची वर्दळ असते. पोलिओ तसेच इतर डोस व औषधांची आवश्यकतेनुसार येथे साठवणही केली जाते. त्यामुळे येथे वीजप्रवाह २४ तास असणे गरजेचे असते. मात्र गेल्या एक वर्षांचे ७५ हजार रुपये वीज बिल न भरल्यामुळे दोन-तीन दिवसांपूर्वी वीज मंडळाने वीज कापून टाकली आणि नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारात बुडाले ते आजतागायत. याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अप्रे यांच्याशी संपर्क साधला असता (निधीबाबत) त्यांनी मी मिटिंगमध्ये आहे, असे सांगत उत्तर देण्याचे टाळले. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा खर्च भागविण्यासाठी मागणीनुसार पंचायत समितीकडे निधी येतो. त्यामुळे नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज कापली जाण्यास तेथील वैद्यकीय अधिकारी जबाबदार आहेत की, निधी न पुरविणारी पंचायत समिती, याचे स्पष्ट उत्तर मिळू शकले नाही.