Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी
रत्नागिरी, २९ मे/खास प्रतिनिधी

 

रत्नागिरीच्या दौऱ्यावर उद्या (३० मे) प्रथमच येत असलेले मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे जोरदार तयारी सुरू असून, उद्योगमंत्री नारायण राणे त्यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार व राणे यांचे चिरंजीव नीलेश यांचा सत्कार मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उद्या (३० मे) सकाळी दहा वाजता होणार आहे. त्यासाठी येथील विवेक हॉटेलमागील मराठा मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे झेंडे व स्वागताचे बॅनर, होर्डिग्ज लावण्यात आले आहेत. या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी उद्योगमंत्री राणे आजपासूनच येथे तळ ठोकून आहेत. सत्काराचा कार्यक्रम दुपारी एक वाजेपर्यंत चालणार असून, त्यानंतर चार वाजेपर्यंत मुख्यमंत्री चव्हाण रत्नागिरीमध्येच आहेत. त्यामुळे काही महत्त्वाच्या बैठका होतील, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना येथे आणून जिल्हा काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा राणे यांचा प्रयत्न या दौऱ्याच्या निमित्ताने राहणार हे उघड आहे. मुक्कामातील दुपारच्या सत्रामध्ये मुख्यमंत्री चव्हाण कोणत्या स्वरूपाच्या बैठका, गाठीभेटी घेतात. यावर या दौऱ्याचे फलित अवलंबून राहणार आहे.