Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

राज्य

रिलायन्स प्रकल्पासाठी ‘सॅटेलाइट मॅपिंग’ने जमीन निश्चिती!
जयंत धुळप
अलिबाग, २९ मे

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांत होऊ घातलेल्या टाटा-रिलायन्सच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना आपल्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा असलेला तीव्र विरोध डावलण्यासाठी, आता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष जागेवर न जाता ‘सॅटेलाइट मॅपिंग’ तंत्रज्ञानाने शेतजमिनींची आकार निश्चिती करून भूमी संपादन कायदा कलम ९(२)च्या नोटिसा शेतकऱ्यांना बजावण्याकरिता जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतजमिनींच्या संपादनासाठी अशा प्रकारे सॅटेलाइट मॅपिंग करण्याचा हा देशातील पहिलाच प्रसंग ठरणार आह़े

नाशिक पालिकेच्या अनास्थेमुळे कोटय़वधींचे अनुदान हुकले
जयप्रकाश पवार
नाशिक, २९ मे

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेर्तगत समाविष्ट शहरांतील बस सेवा सक्षम करण्याच्या उदात्त हेतुने केंद्र सरकारनेदेशातील प्रमुख शहरांना पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० बसेससाठी कोटय़वधीेंचे अनुदान मंजूर झाले असले तरी सदरच्या प्रक्रियेत नाशिक महापालिकेकरवी या संबंधींचा प्रस्तावच दाखल होवू शकला नाही. उपरोक्त योजनेच्या निमित्ताने ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या वृत्तीचा अंगीकार पालिकेकडून होणे अपेक्षित असताना केवळ कारभाऱ्यांच्या अनास्थेमुळे कोटय़वधींच्या अनुदानाला पालिका पर्यायाने शहरवासीय मुकले आहेत.

दुर्घटनेनंतरही ‘सर्चर’ची टेहळणी सुरूच राहणार
अनिकेत साठे
नाशिक २९ मे

प्रशिक्षणादरम्यान कोसळलेल्या ‘सर्चर मार्क-१’ या वैमानिकरहित विमानाच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी लष्कराच्या उच्चस्तरीय अधिकारी व तज्ज्ञांचे पथक उद्या, शनिवारी तोफखाना स्कूलमध्ये दाखल होत आहे. इस्त्रायली बनावटीचे हे विमान ज्या कंपनीचे आहे, त्या कंपनीच्या तज्ज्ञांनाही पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर, वैमानिकरहित विमानांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले असले तरी लष्कराच्या ताफ्यात असणाऱ्या ‘सर्चर मार्क १’ंच्या वापरावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जळगावात बारा बलुतेदारांच्या एकतेची गुढी ; आंदोलनाचा निर्धार
जळगाव, २९ मे / वार्ताहर

बारा बलुतेदार समाजाच्या व्यथा आजवर कोण्या राजकारण्यांनी मनावर घेतल्या नाहीत आणि या लहान जाती सुद्धा एकत्र येत नसल्याने राजकारणी लोकांनी त्याचा फायदा घेतला, असा सूर व्यक्त करतानाच येथे आयोजित मेळाव्यात बारा बलुतेदारांच्या एकतेची गुढी उभारण्यात आली. त्याचप्रमाणे आपल्या हक्कांसाठी जनआंदोलनाचा निर्धार व्यक्त करून ही संघटना कोणाच्याही दबावाखाली काम करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

धबधबा पाहण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
सावंतवाडी, २९ मे/वार्ताहर
वैभववाडी तालुक्यातील नापणे शेर्पे धबधब्यात आनंद लुटण्यासाठी गेलेले अबिंद अमीर बोंबडे (२२) व इरफान अकबर बोंबडे (२६) हे बुडाले. उंबर्डे मेहबुबनगर येथील या तरुणांसह त्यांचे कुटुंब व कोल्हापूर येथील मित्र असे १२-१३ जण धबधबा पाहण्यासाठी गेले होते. धबधब्याखाली एक कोंड (खोल भाग) होती. तेथे ते उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण बुडत होता. या बुडणाऱ्या तरुणाला वाचविण्यासाठी दुसरा आत गेला. नंतर ते दोघेही तरुण बाहेर आलेच नाही. त्यांना शोधण्याचा प्रयत्न झाला. मात्र गुरुवारी रात्रीपर्यंत ते सापडले नव्हते. या दोन्ही तरुणांचे मृतदेह आज आढळून आले.

मोटारसायकल अपघातात जि. प. शिक्षिका ठार
सावंतवाडी, २९ मे/वार्ताहर
माणगाव- साळगाव रस्त्यावरील मोरीजवळ खचलेल्या रस्त्यावर मोटारसायकलने जम्प घेतल्याने शिक्षिका गीता गोपाळ येडवे (५५) ही खाली कोसळून ठार झाली. नंतर जिल्हा परिषदेने तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. दत्त दर्शनासाठी आपल्या पतीसमवेत माणगाव येथे गीता गोपाळ येडवे जात होत्या. मोरीजवळ पडलेला खड्डा मोटारसायकलस्वार गोपाळ येडवे यांच्या लक्षात आला नाही. या खड्डय़ात मोटारसायकल जाताच पाठीमागे बसलेल्या गीता येडवे खाली कोसळल्या. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्या ठार झाल्या. जिल्हा परिषदेत त्या शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हा खड्डा एकाचा मृत्यू झाल्यावर तातडीने बुजविला. तत्पूर्वी सांगूनही दुर्लक्ष केले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे एकाला मृत्यूस सामोरे जावे लागले. तिचा पतीही जखमी झाला.

नवऱ्याने पेटवल्याने पत्नी व मुलगी गंभीर
धुळे, २९ मे / वार्ताहर

साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे एकाने पत्नी व दहा वर्षे वयाच्या मुलीवर मध्यरात्रीच्या सुमारास रॉकेल टाकून पेटविले. यात दोघी मायलेकी गंभीररित्या भाजल्या असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २९ मे रोजी पहाटेच्या सुमारास कैलास मारोती गुंजाळ याने त्याची पत्नी सुरेखा (३५) व मुलगी आशा यांच्यावर रॉकेल टाकून पेटविल्याचा आरोप आहे. यात दोघी मायलेकी ९७ टक्के भाजल्या आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी नोंद जिल्हा रूग्णालयात झाली आहे. या घटनेमागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.