Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

क्रीडा

टीम निघाली लंडनला!
मुंबई, २९ मे / क्री. प्र.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘ट्वेण्टी-२०’ क्रिकेटचे विश्वविजेतेपद राखण्यासाठीच्या मोहिमेवर भारतीय क्रिकेट संघ आज रवाना झाला. आयपीएल स्पर्धा खेळून दक्षिण आफ्रिकेहून नुकत्याच परतलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा उत्साहाचे उसने अवसान घेतले होते. जायबंदी झहीर खान स्पर्धेआधी तंदुरुस्त होणार या आशेने मात्र या संघात उत्साहाचे वारे संचारले होते. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरच एका हॉटेलात भारतीय संघाने काल परवापासून तळ ठोकला होता. धोनी, सेहवाग, युवराजसिंग, हरभजन या बिनीच्या मोहऱ्यांनी या अवधीतही आपल्या जाहिरातदारांना नाराज केले नाही. सरावाच्या वेळेत आपापली जाहिरातींची कामे संपवून, संघ विश्वचषक विजेतेपद राखण्यासाठी लंडनकडे रवाना झाला.

भारतीय संघ संतुलित - धोनी
‘आमचा संघ संतुलित आहे, आमची फलंदाजीची बाजू भक्कम आहे. पण याचा अर्थ आम्ही गोलंदाजीत कुठेतरी कमी आहोत, असा अजिबात नाही. आमच्याकडे त्या विभागतही उत्कृष्ट खेळाडू आहेत,’ अशा शब्दांत भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी लंडनला रवाना होण्यापूर्वी आपल्या संघाबद्दल विश्वास प्रकट केला. वन-डे क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या भारतीय संघाने गेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावून खळबळ उडवून दिली होती. हे विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान आता या संघापुढे आहे.

राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेबद्दल प्रेक्षकांत उत्सुकता
पनवेल, २९ मे / क्री. प्र.

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे उद्यापासून येथे सुरू होत असलेल्या राजीव गांधी सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेच्या पूर्वतयारीवर आज यजमानांनी अखेरचा हात फिरविला. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत प्रत्येकी १७-१७ संघ सहभागी होत असून त्यातील बिहार व हरियाणा यांचे महिला संघ आजच येथे येऊन दाखल झाले. अन्य संघ उद्या दुपापर्यंत येतील.
खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर मैदानावर सुसज्ज अशी एकंदर सहा क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत.

ओझा चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक
कोलकाता, २९ मे/ वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक आहे, असे मनोगत युवा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा याने व्यक्त केले आहे. नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत प्रज्ञान ओझा याने चमकदार कामगिरी केली. डेक्कन चार्जर्सने मिळविलेल्या या स्पर्धेच्या विजेतेपदात प्रज्ञान ओझाच्या कामगिरीचा मोठा वाटा होता. अंतिम सामन्यात ओझा याने बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाचे तीन खेळाडू बाद केले होते.

भारतच विजेतेपदाचा प्रमुख दावेदार - चॅपेल
नवी दिल्ली, २९ मे / वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत धोनीचे नेतृत्व आणि युवराजसारखा आक्रमक फलंदाज याच्या जोरावर भारतच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरतो, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून दोन वर्षे काम पाहिलेले चॅपेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दुसऱ्या ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत कोण विजेता ठरेल याचे भाकित वर्तविणे अत्यंत अवघड आहे. परंतु माझ्या मते विजेतेपदासाठी भारत हाच प्रबळ दावेदार आहे. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया संघही विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. पाकिस्तान संघात धक्कादायक निकाल नोंदविण्याची क्षमता आहे.

भारतीय संघाच्या मानसिक ताजेपणाबद्दल वेंगसरकर साशंक
नवी दिल्ली, २९ मे / वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ मानसिकदृष्टय़ा कितपत ताजातवाना असेल याबद्दल शंकाच आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर याने व्यक्त केले आहे. वेंगसरकर यांनी क्रिकइन्फो या संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, ट्वेन्टी- २० क्रिकेटच्या एकापाठोपाठ एक स्पर्धा खेळणे हे अत्यंत कठीण असते. कारण ट्वेन्टी- २० क्रिकेटमध्ये खेळाडूला आत्यंतिक दडपणाचा सामना करावा लागत असतो.

व्हीनस पराभूत; नदाल, जोकोविच, इव्हानोविच विजयी
पॅरिस, २९ मे / एपी

अमेरिकेची स्टार टेनिसपटू व फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची विजेतेपदाची एक दावेदार असलेल्या व्हीनस विल्यम्सला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तिसऱ्या फेरीत तिला हा २९वे मानांकन असलेल्या अ‍ॅग्नेस झॅवेने ६-०, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. सलग तिसऱ्या वर्षी व्हीनसला फ्रेंच ओपनमध्ये असा पराभव स्वीकारावा लागला आहे. विजेतेपदाचा दावेदार राफेल नदालने ऑस्ट्रेलियाच्या लेटन ह्युइटला ६-१, ६-३, ६-१ असे सहज पराभूत केले. सातवेळा ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपद पटकाविणाऱ्या व्हीनसला या स्पर्धेत सुरुवातीपासूनच सूर सापडलेला नाही. दुसऱ्या फेरीत तिला पहिला सेट गमवावा लागला होता.

सानियाचा साखरपुडा
नवी दिल्ली, २९ मे / पीटीआय

भारताची आघाडीची टेनिस स्टार सानिया मिर्झाला ज्यांनी हृदयात स्थान दिले आहे, त्यांना आता निराश व्हावे लागणार आहे. हैदराबादस्थित उद्योगपती मोहम्मद सोहराब मिर्झा याच्याशी सानियाचा साखरपुडा झाला आहे. पण हे दोघेही लवकर विवाहबद्ध होणार नाहीत तसेच सानियाही टेनिसमधून निवृत्त होणार नाही, असे तिच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी सांगितले की, सानिया यानंतरही टेनिस खेळत राहील तसेच दोघांचा विवाह कधी होईल हे अद्याप ठरलेले नाही. त्याला काही काळ लागेल. सानिया टेनिसमधून निवृत्त होईल, या वृत्ताचाही मिर्झा यांनी इन्कार केला. दोन्ही कुटुंबीय परस्परांना गेली अनेक वर्षे ओळखत असून त्यातूनच त्यांनी ही ओळख नात्यात रूपांतरित करण्याचे ठरविले आहे.

संदीप सिंगचे रौप्य निश्चित; इतर गटात भारताला तीन कांस्य
विश्व ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा
नवी दिल्ली, २९ मे / पीटीआय

अर्मेनिया येथे सुरू असलेल्या विश्व ज्युनियर बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संदीप सिंगने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जाणारा तो एकमेव भारतीय खेळाडू होता. त्यामुळे भारताचे रौप्यपदक निश्चित झाले. भारताच्या तीन खेळाडूंना मात्र उपान्त्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.संदीप सिंगने ४६ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या जॅवलोनबेक इशामॅटोव्हला ८-४ अशा फरकाने पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या नमित बहादूर (५० किलो), विकास खत्री (५४ किलो) व शिवा थापा (५२ किलो) यांच्या पदरी मात्र निराशा पडली. त्यांना उपान्त्य फेरीत पराभव सहन करावा लागला.