Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

ठाणे पालिका बरखास्त करा
राष्ट्रवादीची मागणी
टक्केवारीचे अर्थकारण
सॅटिस रखडला
जेएनआरयूएम मध्ये १०० कोटींचा गैरव्यवहार
नालेसफाई रखडली
ठाणे, प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पालिकेतील सत्तारूढ शिवसेना-भाजपा युतीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाणे महापालिकेत टक्केवारीचे राजकारण चालते, मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होतो, असा आरोप करीत ठाणे महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र शासन, तसेच मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

आयुक्तांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
धोकादायक इमारती रिकाम्या न झाल्यास घरी बसा

ठाणे/प्रतिनिधी

पावसाळ्यात शहरात कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून सतर्क राहण्याचे आदेश देतानाच, येत्या ३१ मेपूर्वी सर्व ४६ अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करा अन्यथा कायमचे घरी बसा, असा सज्जड इशारा पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. आयुक्तांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

राखीव जंगले वाचविण्यासाठी राखीव पोलीस!
’ कर्मचाऱ्यांना देणार अत्याधुनिक हत्यारे ’
राजीव कुळकर्णी

ठाणे जिल्ह्यातील चारही वनक्षेत्रांमध्ये जंगलमाफियांनी घातलेल्या धुमाकुळामुळे प्रचंड प्रमाणावर वनसंपदा नष्ट झाली असून, अवैध वृक्षतोडीला आळा घालून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी आता एसआरपीची कंपनी तैनात करणे, वनकर्मचाऱ्यांना हत्यारे पुरविणे अशा उपाययोजना आता करण्यात येत आहेत.

डोंबिवलीत फलकबाजीतून
मनसे-शिवसेना आमने-सामने

डोंबिवली/प्रतिनिधी - वडिलांनी गेल्या १२ वर्षांपूर्वी पाहिलेली कल्याण-डोंबिवली शहर विकासाची स्वप्ने त्यांची पोरं १२ वर्षांनंतरही पूर्ण करू शकत नसतील, तर ते करदात्या नागरिकांची नागरी विकासाची स्वप्ने काय पूर्ण करणार, असा प्रश्न उपस्थित करून मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश प्रभुदेसाई यांनी कल्याण- डोंबिवलीतील शिवसैनिकांना टोमणा मारला आहे.

चिंता निकालाची अन् प्रवेशाची
प्रतिनिधी

आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाचे दहावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दोन्ही बोर्डातील विद्यार्थ्यांनी घसघशीत गुण मिळविल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. सीबीएसई-आयसीएसईमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण ५००च्या आसपास असू शकेल, असा प्राथामिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अकरावीसाठी मोठय़ा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी हे विद्यार्थी एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहेत.

कल्याण ‘सॅटिस’च्या कामात असंख्य अडचणी
कल्याण/वार्ताहर : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्टेशन परिसरात सुरू असलेल्या सॅटिस प्रकल्पाचे काम अनुभव नसलेल्या ठेकेदाराला दिले आहे. महापालिका प्रशासन व सत्ताधारी नगरसेवक करदात्या नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची धक्कादायक माहिती एका नगरसेवकानेच दिली.

पाणीटंचाईने त्रासला शहापूर तालुका ७३ पाडे व ३१ गावांना १५ टँकरने पाणीपुरवठा
शहापूर/वार्ताहर: धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील आदिवासी दुर्गम परिसरातील पाडय़ा व गावांमध्ये पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले असून, कष्टकरी आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्रंदिवस वणवण भटकावे लागत आहे.

विधानसभेतील उमेदवारीसाठी इच्छुकांची अस्तित्वाची लढाई
डोंबिवली/प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने शहरातील शिवसेना-भाजपमधील काही इच्छुक मंडळींनी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर जोरदार सुंदोपसुंदी सुरू असून त्याचे प्रत्यंतर नुकतेच डोंबिवली पश्चिमेत खासदार आनंद परांजपे यांच्या विजयी मिरवणुकीच्या माध्यमातून कार्यकर्ते, नागरिकांनी पाहिले.

न्यू हायस्कूल जोशीबागचा सोमवारी वर्धापन दिन
कल्याण/वार्ताहर
जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट या मुंबईतील नामवंत शैक्षणिक संस्थेच्या येथील न्यू हायस्कूल जोशीबाग या शाळेचा ६९ वा वर्धापन दिन १ जून रोजी शाळेच्या सभागृहात सकाळी १० वाजता साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते अनंत तरे, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर, पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी १९४१ ते २००९ या कालावधीतील माजी विद्यार्थी/ माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक-शिक्षकेतर यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे संस्थेचे मुख्याध्यापक एस. बी. खैरे यांनी सांगितले. माजी विद्यार्थी व निवृत्त शिक्षकांनी आपला पत्ता व दूरध्वनी क्रमांक तात्काळ शाळेस कळवावा.
संपर्क- ९८१९२२१९७३.

‘नगर परिषदांना वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे’
बदलापूर/वार्ताहर : अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे शासनाने नगर परिषदांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारावर १०० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी अंबरनाथच्या नगराध्यक्षा संपदा गडकरी यांनी नगर परिषद महासंघाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्याकडे केली आहे. राज्यातील नगराध्यक्षांचे अलीकडेच शिरूर येथे राज्यस्तरीय अधिवेशन झाले होते. या अधिवेशनामध्ये उपरोक्त मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना वेतनावर शासन ज्याप्रमाणे १०० टक्के अनुदान देते, तसेच अनुदान नगर परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेला दिल्यास नगर परिषदांकडे असलेल्या निधीमधून नागरी सोयी-सुविधांची विकासकामे अधिक प्रमाणात राबवू शकेल, असा विश्वास महासंघाचे अध्यक्ष मोदी यांना दिलेल्या निवेदनात गडकरी यांनी व्यक्त केला. राज्याच्या विविध नगर परिषदांचे सुमारे ८५ नगराध्यक्ष या अधिवेशनाला उपस्थित होते.

पालिकेतील आगीने पिकली खसखस
कल्याण/प्रतिनिधी
आग लागल्यानंतर माणूस घाबराघुबरा होतो, सैरावैरा पळू लागतो, पण शुक्रवारी दुपारी अचानक पालिकेतील बहुचर्चित जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांच्या केबिनमध्ये आग लागल्याची बातमी शहरात काही क्षणात पसरली. यावेळी ही आग अचानक लागली की मुद्दाम लावली गेली, अशी चर्चा पालिकेच्या आवारात आणि शहरात हसून प्रत्येक नगरसेवक, नागरिक करीत होता. ठाणे ‘वृत्तान्त’ने पालिकेतील ११३ कोटींचा घपला बाहेर काढल्याने ही आग लागली की काय, अशीही चर्चा नगरसेवक हसून करताना दिसत होते. प्रत्यक्षात कोलते यांच्या केबिनमधील एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने किरकोळ आग लागली होती. ती तात्काळ विझविण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्राने दिली.