Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

‘श्रीलंकेने भारताचे युद्धच एकप्रकारे तडीस नेले’
कोलम्बो, २९ मे/वृत्तसंस्था

 

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’ (एलटीटीई) ंविरोधातील आमची कारवाई हा दक्षिण आशियातील दहशतवादविरोधातील लढाच असून आम्ही एकप्रकारे भारताचेच युद्ध आमच्या शिरावर घेऊन ते तडीस नेले, असे उद्गार श्रीलंकेच अध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांनी ‘द वीक’ या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत काढले. श्रीलंकेतील तामिळींचा प्रश्न आम्ही आमच्या चौकटीत व आमच्याच पद्धतीने सोडवू, असेही त्यांनी या मुलाखतीत ठामपणे नमूद केले आहे.
श्रीलंकेच्या विकासासाठी आणि फेरउभारणीसाठी भारतीय उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शांततेला आमचा अग्रक्रम आहे. त्यामुळे देशात शांतता आणि स्थैर्य कायम रहावे यासाठी काय करता येईल, याचा व्यापक उहापोह आम्ही करणार आहोत, असे ते म्हणाले. ‘एलटीटीई’ने १८ वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली होती. त्यामुळे एकप्रकारे भारताचे या संघटनेविरोधातील युद्ध आम्ही तडीस नेले आहे, असे ते म्हणाले.
दहशतवाद्यांच्या पूर्ण निपातानंतर देशाच्या उत्तर भागातील मदत आणि पुनर्वसन कार्याला सेनादलांचा अग्रक्रम राहील, असे ते म्हणाले. युद्ध सुरू असतानाही आमचे सैनिक रस्तेबांधणी करीत होते आणि विस्थापितांना सर्व प्रकारे साह्य करीत होते, असे त्यांनी नमूद केले.
आमच्या कारवाईला भारताचा नैतिक पाठिंबा होता आणि तो आमच्या दृष्टीने मोलाचा आहे. इतर कुणाला काय वाटते यापेक्षा मला भारताला काय वाटते, याचे महत्त्व अधिक वाटते, असेही त्यांनी स्पष्ट केले. अतिरेक्यांविरोधातील कारवाईत श्रीलंकेला यश लाभले त्याच सुमारास भारतातील निवडणुकीत काँग्रेसला व विशेषत: सोनिया गांधी यांच्या कर्तृत्वाला यश मिळाले, हा विलक्षण योगायोग आहे. या विजयाबद्दल मी सोनियाजींचे अभिनंदन करणारे पत्रही लिहिले आहे, असे त्यांनी सांगितले. तामिळनाडूतील नेत्यांशी संबंध प्रस्थापित करण्याचा आपला विचार आहे काय, असे विचारता राजपक्षे म्हणाले की, एलटीटीईविरोधातील कारवाईतील यशानंतर तामिळनाडूतील अनेक नेत्यांनी माझे अभिनंदन केले आहे. इतकेच नव्हे तर जे नेते अतिरेक्यांची बाजू घेत होते त्यांना तामिळनाडूतील जनतेने लोकसभा निवडणुकीत पराभूत केले आहे.
आपल्याला भारताशीच नव्हे तर पाकिस्तानशीही मैत्रीचे संबंध हवे आहेत, असे ते म्हणाले. श्रीलंका लष्करावर मानवी हक्क संघटनांनी केलेल्या टीकेबाबत छेडता उसळून राजपक्षे म्हणाले, तामिळ अतिरेक्यांनी अवघ्या श्रीलंकेला जणू ओलीस ठेवले होते तेव्हा हे मानवी हक्कवाले कुठे होते?