Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांबाबत भारताला चिंता
मेलबर्न, २९ मे/वृत्तसंस्था

 

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून असे हल्ले होऊ नयेत यासाठी स्थानिक यंत्रणेने कठोर योजना आखावी, असे आवाहन केले आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त सुजाता सिंग यांनी व्हिक्टोरिया प्रांताचे प्रमुख जॉन ब्रम्बी तसेच ज्येष्ठ पोलीस व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारताची चिंता मांडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सिंग म्हणाल्या की, या हल्ल्यांमागील कारणे कोणतीही असोत भारतीय विद्यार्थी त्यांचे लक्ष्य आहे आणि ही गंभीर बाब आहे. असे हल्ले रोखलेच पाहिजेत, अशी जोरदार मागणी आम्ही केली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारनेही या हल्ल्यांना आळा घालण्याची हमी दिली असून पोलिसांनी रेल्वे स्थानकांलगत गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात हे हल्ले वांशिक द्वेषातून होत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन पोलिसांनी फेटाळला आहे.
काल सिडनीमध्ये आणखी एका विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला असून, राजेश कुमार असे हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्रांनी हल्ल्यानंतर तात्काळ या विद्यार्थ्यांला ‘ब्लँकेट’मध्ये गुंडाळल्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला. कुमार आपल्या निवासस्थानातील पुढील भागात बसला असताना अज्ञात व्यक्तिने त्याच्या खोलीच्या खिडकीमधून ‘पेट्रोल बॉम्ब’ फेकला. या बॉम्बच्या स्फोटाने घरामध्ये लागलेल्या आगीमध्ये कुमार ३० टक्क्यांहून अधिक भाजला. त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी ‘ब्लँकेट’ पांघरून या विद्यार्थ्यांला आगीतून बाहेर काढले, असे ‘साऊथ एशिया टाइम्स’मधील वृत्तात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हल्ल्यांप्रकरणी पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली असून, त्यातील एकावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रवण कुमार याच्यावर ‘स्क्रू ड्रायव्हर’ने हल्ला करणाऱ्या १७ वर्षीय तरुणावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून मेलबर्न रेल्वेमध्ये सौरभ शर्मा या विद्यार्थ्यांवर झालेल्या आणखी एका हल्ल्याप्रकरणी चार अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर बालन्यायालयात खटला चालविण्यात येणार असून नियमाप्रमाणे अल्पवयीन असल्यामुळे त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.