Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

बल्लारपूरजवळ दोन बसेसची धडक; १७ जखमी
बल्लारपूर, २९ मे/ प्रतिनिधी

येथील दादाभाई पॉटरीज संकुलासमोर शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दोन एस.टी. बसेसची धडक होऊन झालेल्या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले. अहेरी आगाराची अहेरी-नागपूर बस (एम.एच.३१-डब्ल्यू-९५३६) व वर्धा-सिरोंचा बसची (एम.एच.४०-८१११) दादाभाई पॉटरीज संकुलासमोर धडक झाली. अहेरी-नागपूर बसचे टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात १७ प्रवासी जखमी झाले आहे.

जनतेबद्दल तळमळ असणारा लोकप्रतिनिधी
राखी चव्हाण

स्वत:च्या मतदार संघाचाच विचार न करता संपूर्ण विदर्भाच्या समस्यांना हात घालणारा, जनसंपर्काच्या भरवशावर राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करणारा, समस्या सोडविताना माहितीच्या अधिकारापासून, सांसदीय आयुधांचा वापर करणाऱ्या आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आता नव्या मतदारसंघाचे आव्हान असले तरी ही नवीन जबाबदारीसुद्धा तेवढय़ाच समर्थपणे पेलण्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांना आहे. विद्यार्थी दशेतच राजकारणात सक्रिय झालेल्या आमदार देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या प्रयत्नात नागपूरच्या महापौरपदाची धुरा यशस्वीपणे पेलली. कमी वयात महापौरपद भूषवणारे ते नागपुरातील पहिले महापौर ठरले.

निष्ठेपेक्षा उपद्रवमूल्याला महत्त्व अधिक
काँग्रेसमध्ये मोठय़ा प्रमाणात गटबाजी दिसून येते. गटबाजी नसली की पक्ष मृतप्राय झाल्यासारखा वाटतो. गटबाजीने पक्षात चैतन्य राहते. नेतेही विधाने करीत असतात आणि पक्ष जिवंत असल्याचा भास सर्वाना होत राहतो, असे वर्णन अनेकदा गंमतीने केले जाते. ते खरेही आहे. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. त्यात गटबाजीचे भरपूर दर्शन घडले. येथील परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या दोन गटांना प्रचाराच्या दरम्यान जे करायचे होते तेच केले. पक्षाच्या उमेदवाराला फटाके लावण्यात कुणी कसर सोडली नाही.

भंडाराजवळील दोन अपघातात अभियंत्यासह ५ ठार, १८ जखमी
भंडारा, २९ मे / वार्ताहर

भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या दोन अपघातात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह ५ ठार तर १८ गंभीर जखमी झाले. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय कडू (५०) आणि त्यांचे सहकारी अनुरेखक शरद गभणे (४१) कार्यालयातील कामे आटोपून मोटारसायकलने (एम.एच.३१ ए.डब्ल्यू. ९४५५) नागपूरकडे निघाले होते.

मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -अडसूळ
दर्यापूर, २९ मे / वार्ताहर

उमेदवार असताना आश्वासने दिली जातात. मी आता मतदारांच्या आशीर्वादाने विजयी झालो आहे. अमरावती जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास करण्याकरिता कटिबद्ध असून तालुक्याबरोबरच जिल्ह्य़ाच्या विविध समस्या सोडवण्याकरिता प्रयत्न करणार आहे. विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केले.

कोहळी समाजातील अडीचशे जोडप्यांचा विवाह
साकोली, २९ मे / वार्ताहर

कोहळी समाजाने साकोली, अर्जुनी/मोरगाव (जि. गोंदिया) महागाव, बोंडगावदेवी, विर्सी, कोसमतोंडी (चिचटोला) या गावांमध्ये सामूहिक विवाह सोहोळे आयोजित केले. यात २५० पेक्षा अधिक जोडप्यांचे शुभमंगल पार पाडल्यामुळे कोटय़वधी रुपयाची बचत झाली आहे.

‘कोळसा खाण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळावा’
चंद्रपूर, २९ मे / प्रतिनिधी

राज्याप्रमाणेच केंद्र शासनानेसुद्धा नक्षलवादग्रस्त भागातील कोळसा खाण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करावा, अशी मागणी सरदार काटकर यांनी केली आहे. आदिवासी भागात कठीण परिस्थितीत कोळसा उत्पादनाचे काम करीत असताना येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करावा, नक्षलवाद्यांच्या कारवायामुळे कोळसा खाण कर्मचाऱ्यांना भीती वाटते व त्यांचे धर्य खचून जाते, म्हणून त्यांना प्रोत्साहन व शासनाच्या मदतीचा हात देणे अत्यंत गरजेचे आहे. राज्याप्रमाणेच केंद्र सरकारने कोळसा खाण कामगारांना नक्षलवादग्रस्त भत्ता लागू करावा, अशी मागणी काटकर यांनी केली.

बालकांची खामगाव ते शेगाव पदयात्रा
बुलढाणा, २९ मे / प्रतिनिधी

साहसीवृत्ती जोपासणे आणि सुसंस्कार बालपणीच जीवनात रुजवण्याच्या दृष्टीने लहान मुलांची पदयात्रा खामगाव ते शेगाव संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी २६ मे रोजी आयोजित करण्यात आली. संत हे सत्कृत्याचे प्रेरक आहेत. त्यांची माहिती बालवयातच मुलांना दिली जावी, या उद्देशाने खामगाव येथील राजाभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा, लातूर, औरंगाबाद, खामगाव येथील ८ ते १८ वर्षांमधील २०-२२ मुलामुलींनी २१ कि.मी. झालेल्या या पदयात्रेत ‘गणगण गणात बोते’च्या गजरात सहभाग घेतला. खामगाव-शेगाव मार्गावर जागोजागी उभारलेल्या गजानन विजय ग्रंथातील ओव्यांच्या फलकाचे स्पष्टीकरण राजाभाऊ शेटे यांनी समजावून सांगितले. मीना बरडे, रवी वाघमारे, संदीप शेटे, संजय निलंगे, अमृता मापारी, अर्चना, आशा, मधुरा, संजय वाघमारे यांनी छोटय़ांचा उत्साह वाढवला. त्यामुळे त्यांनी पदयात्रेत मनमुराद आनंद लुटला.

नागझिरा अभयारण्यात पाणीटंचाई
साकोली, २९ मे / वार्ताहर

नागझिरा अभयारण्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून वनखात्याने तयार केलेल्या पाणवठय़ांवर येऊन प्राणी तहान भागवत आहेत. पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन होत आहे.
नागझिरा अभयारण्यातील प्राणी तहान भागवण्यासाठी एकाच पाणवठय़ावर येत आहेत. वाघ, बिबटय़ा, अस्वल, माकड, चितळ, नीलगाय, हरीण, सांबर, गवे आदी वन्यप्राणी वनखात्याने तयार केलेल्या पाणवठय़ांवर पाणी पिण्यासाठी येतात. अभयारण्याच्या परिसरात एकूण १५ पाणवठे असून त्यात वनमजूर हातपंपाचे पाणी टाकून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पाणवठय़ावर वेगवेगळे प्राणी येताना पाहता येते परंतु, पाण्याची टंचाई असल्याने पर्यटकांना स्वत:साठी पाण्याची सोय करावी लागत आहे.

अवैध बिअरसह मारुती व्हॅन जप्त
कारंजा (घाडगे), २९ मे / वार्ताहर

अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मारुती व्हॅनसह १५ पेटय़ा विदेशी दारू बिअर जप्त करून व्हॅन चालकास अटक करण्यात आले. येथील पथकर नाक्यावर एम.एच. ३१ सी.पी. ६१०१ क्रमांकाची मारुती व्हॅन थांबली. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना संशय आला असता त्यांनी चौकशी केली. व्हॅनमधून अवैधरीत्या विदेशी दारू नेली जात असल्याचे कळताच पोलिसांनी सरळ गाडी कारंजा पोलीस ठाण्यात आणली. झडतीमध्ये १५ पेटय़ा बिअरच्या बाटल्यासह २ लाखाची व्हॅन जप्त करण्यात आली. या प्रकरणी व्हॅनचालक अशोक चेर याला कारंजा पोलिसांनी अटक केली. आज पुढील कारवाईसाठी अशोकला न्यायालयात सादर करण्यात आले. दारूबंदी असलेल्या कारंजा तालुक्यातही मोठय़ा प्रमाणात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू
आहे.
३० हजाराच्या विद्युत तारेची चोरी
सारवाडी शिवारातून ३० हजार रुपये किमतीची अ‍ॅल्युमिनीअमची विद्युत वाहक तार चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना १९ ते २० मेच्या मध्यरात्री घडली. सोबतच ६ हजाराच्या इतर साहित्याचे नुकसानही चोरटय़ांनी केले. कर्मचारी श्रीवास्तव यांनी कारंजा पोलिसात गुन्हा दाखल केला.