Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

ग्रंथविश्व

ग्लोबलायझेशन आणि हिंसा..

जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षांचा इतिहास आहे, असे दीडशे वर्षांपूर्वी मार्क्‍स व एंगेल्सने कम्युनिस्ट जाहीरनाम्यात म्हटले होते. आता तर हे विधान हास्यास्पद म्हणायला हरकत नाही. कसला वर्गसंघर्ष? कोण करतो आहे तो? सोव्हिएत युनियन पडल्यावर मार्क्‍सवाद बाद झाला. चीन हे काय आता कम्युनिस्ट राष्ट्र आहे काय, त्यांचा लाल रंग तर कोकाकोलाचा लाल रंग आहे.. आणि भारतात गरिबी आहे थोडीफार, पण त्या गरिबांनाही संसदीय लोकशाहीचे आणि त्यातील विकासनीतीचे महत्त्व इतके समजले आहे की त्यांनी, ध्यानीमनी नसताना सोनिया आणि राहुल या मायलेकांची २०६ खासदारांनी तुला केली. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचे शेवटचे थडगे बांधले गेले. ‘येथे मार्क्‍सवाद चिरनिद्रा घेत आहे’ हे वाक्य त्यावर ममता बॅनर्जीनी कोरले आहे.. वगैरे वगैरे आशयाचे विश्लेषण सध्या भारतातील अनेक थोर बुद्धिवंत करत असतानाच ‘टाइम मॅगझिन’ या

 

अमेरिकास्थित साप्ताहिकाचे आफ्रिकेतील ब्यूरो चीफ आणि त्याआधी साऊथ एशियातील प्रमुख वार्ताहर असलेले अ‍ॅलेक्स पेरी यांचे ‘फॉलिंग ऑफ द एज, ग्लोबलायझेशन, वर्ल्ड पीस अँड अदर लाइज’ हे पुस्तक वाचावयाला घेतले तर ती व्यक्ती संभ्रमावस्थेत जाऊ शकते.
पुस्तकाची सुरुवात अंदमान बेटावरील जारवा या आदिवासी जमातीपासून पेरी करतात. एका जारवा तरुणाचे एका जारवा तरुणीवर प्रेम. मात्र तो तरुण जारवांमधील कमी प्रतीच्या जमातीतील. त्यामुळे तरुणीचा बाप त्याला मरेस्तोवर मारतो. तो मेला आहे, असे समजून त्याला जंगलात टाकून देण्यात येते. जखमी जारवा रांगत रांगत कसाबसा भारतीय छावणीपर्यंत पोहोचतो आणि पहिल्यांदाच भारतीयांना जारवा आणि जारवा तरुणाला शहरी सभ्यता पाहण्याचा योग येतो. ही कथा इसवी सनापूर्वीची नाही, तर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाची ही गोष्ट आहे. तो तरुण भारतात उपचार घेतो. शहर, गाडय़ा, तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार पहिल्यांदाच पाहणारा तो पहिला जारवा. मात्र काही दिवसांमध्येच तो कंटाळतो, शहरी सभ्यतेने आणि तंत्रज्ञानांच्या जादुई आविष्कारांनी गुदमरतो. या सगळ्यात त्याचा जीव घुसमटू लागतो व तो भारत सरकारला विनंती करतो की, मला माझ्या गावात परत जाऊ द्या.. वगैरे.
पेरी जगभरातील अविकसित, विकसनशील देशांच्या परिस्थितीबाबत वार्ताहराच्या शैलीत लिहितात. मात्र डोळे आणि अंतर्मन उघडे ठेवून. जगभरातील विकसनशील देशांमधील प्रश्न हे विकसित देशांच्या धोरणांमुळेच कसे तयार झाले आहेत, या धोरणांना ग्लोबलायझेशनचे गोंडस नाव देऊन जगभरातील ओपिनियन मेकर्सना या धोरणांच्या बाजूने कसे तयार करण्यात येते आणि मुख्य म्हणजे या सगळ्या धोरणांमुळे जगभरातील विविध देशांमध्ये हिंसाचार कसा उसळला आहे, तालिबान असो, की लिट्टे आणि आफ्रिकेतील तेल चोरणाऱ्या टोळ्या असोत, की आखाती देशातील धार्मिक अतिरेकी, या सगळ्यांच्या माध्यमातून उसळणाऱ्या हिंसाचारामागे कारणे आहेत व ती आर्थिकच आहेत, असे पेरी सुचवतात. जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षांचा इतिहास आहे, असे ते स्पष्ट म्हणत नसले तरी लिखाणाचा अन्वयार्थ हाच आहे.
ज्या मुंबई शहराचे आपण गोडवे गात असतो आणि ज्या शहराच्या जिवावर इथे उपऱ्यांवर दादागिरी करत असतो, त्याचे भयानक वास्तवही पेरींच्या या लेखनामुळे आपल्यासमोर येते. या शहरात १,३०० लोकांकरिता एक बस आहे. १० लाख लोकांकरिता केवळ १७ संडास आहेत आणि एक हजार खासगी मोटार गाडय़ांसाठी पार्किंगच्या केवळ दोन जागा उपलब्ध आहेत! २०२० साली जगातील महासत्ता बनण्याच्या वल्गना करणाऱ्या आपल्या देशातील ९० कोटी जनता दिवसाला दोन डॉलरपेक्षाही कमी उत्पन्न कमावते (अर्जुन सेनगुप्ता समितीने ८४ कोटी जनता दिवसाला २० रुपयांपेक्षा कमी खर्च करू शकते, असा निष्कर्ष काढला होता). पेरी यांनी विजय मल्ल्यांच्या एका पार्टीलाही हजेरी लावली. त्यांच्या कॅलेंडरमधील युवतींचे पाश्चिमात्य संगीतावरचे चित्कार, मल्ल्यांची दोन हेलिकॉप्टर्स, चार जेट विमाने, पेंट हाऊस आणि प्रचंड संपत्तीने पेरींचे डोळे दिपले. रोज सकाळी रस्त्यांवर शौचास बसणाऱ्या लोकांच्या या देशात मल्ल्याही राहतात, हे पेरींनाच आपल्या बुद्धिवंतांना दाखवावे लागते, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?
शेन्झेन या चीनमधील शहराबाबत सांगताना पेरी म्हणतात की, शेन्झेन हे चीनमधील तथाकथित विकासाचे एक मॉडेल आहे. मात्र या शहरात तथाकथित भांडवली विकासाबरोबरच पायरसी, ड्रग्जच्या टोळ्या आणि यांना जोडून येणाऱ्या माफिया टोळ्या यांची रेलचेल आहे. कारखान्यातील सुरक्षिततेचे निकष अत्यंत निकृष्ट असल्याने लाखो कामगारांना त्यांचे हात गमवावे लागले आहेत. त्यामुळे येथे येता-जाता अनेक अपंग व्यक्ती दिसतात.
आपल्याकडे गाडय़ा चोरण्याचा जसा धंदा आहे, तसा सिंगापूरमध्ये जहाजेच्या जहाजेच पळविण्याचा धंदा आहे. चाचे जहाजे पळवतात आणि नंतर रंगरंगोटी करून ती विकतात. हे चाचे दुसरे तिसरे कुणी नसून जागतिकीकरणाच्या परिणामामुळे बेकार झालेल्या तरुणांचीच फौज आहे, असे पेरी यांचे म्हणणे आहे. जीव धोक्यात घालणाऱ्या या धंद्यात येण्यास पोटातील आगच त्यांना प्रवृत्त करते.
पेरी दक्षिण अफ्रिकेतील शहरी हिंसाचारापासून नेपाळमधील माओवाद्यांच्या हिंसाचाराबाबत त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधित संघटना, त्यांचे नेते, कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधून रिपोर्ताज आपल्यासमोर ठेवतात. हिंसेला तात्कालीन कारण काहीही असले तरी मूळ प्रश्न हा आर्थिक विषमतेचा आहे आणि हा हिंसाचाराचा आगडोंब एके दिवशी संपूर्ण जगाला बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीतही ते करतात.
जागतिकीकरणामुळे गरीब, सामान्य जनता पुढे जात आहे, तिथेच राहते की आहे त्यापेक्षाही अधिक दुरवस्थेत जाते, असा संभ्रम हे पुस्तक वाचल्यावर पडू शकतो. कारण आपल्याकडील यच्चयावत् बुद्धिवंत जागतिकीकरणाच्या फायद्याची बडबडगीते दररोज पाठ केल्यासारखी गात असताना पेरी यांच्यासारखा, ‘टाइम मॅगझिन’चा इतका मोठा पत्रकार जागतिकीकरणाची भीती दाखवतो ती का बरे? हे नक्की काय गौडबंगाल आहे बुवा, असा संभ्रम या पुस्तकाने पडतो!
समर खडस
फॉलिंग ऑफ द एज :
ग्लोबलायझेशन, वर्ल्ड पीस अँड अदर लाइज
लेखक- अ‍ॅलेक्स पेरी; प्रकाशक- मॅकमिलन;
पृष्ठे- ३४२; किंमत- ५५० रुपये