Leading International Marathi News Daily

शनिवार, ३० मे २००९

विविध

‘श्रीलंकेने भारताचे युद्धच एकप्रकारे तडीस नेले’
कोलम्बो, २९ मे/वृत्तसंस्था

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’ (एलटीटीई) ंविरोधातील आमची कारवाई हा दक्षिण आशियातील दहशतवादविरोधातील लढाच असून आम्ही एकप्रकारे भारताचेच युद्ध आमच्या शिरावर घेऊन ते तडीस नेले, असे उद्गार श्रीलंकेच अध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांनी ‘द वीक’ या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत काढले. श्रीलंकेतील तामिळींचा प्रश्न आम्ही आमच्या चौकटीत व आमच्याच पद्धतीने सोडवू, असेही त्यांनी या मुलाखतीत ठामपणे नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांबाबत भारताला चिंता
मेलबर्न, २९ मे/वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून असे हल्ले होऊ नयेत यासाठी स्थानिक यंत्रणेने कठोर योजना आखावी, असे आवाहन केले आहे. भारताच्या ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त सुजाता सिंग यांनी व्हिक्टोरिया प्रांताचे प्रमुख जॉन ब्रम्बी तसेच ज्येष्ठ पोलीस व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारताची चिंता मांडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सिंग म्हणाल्या की, या हल्ल्यांमागील कारणे कोणतीही असोत भारतीय विद्यार्थी त्यांचे लक्ष्य आहे आणि ही गंभीर बाब आहे.

पाकिस्तानच्या वाढत्या आण्विक क्षमतेवर जागतिक दबाव हवा : लष्करप्रमुख कपूर
नवी दिल्ली, २९ मे / पी.टी.आय.

पाकिस्तान आपल्या आण्विक क्षमतेत वाढ करीत असल्याच्या वृत्तामुळे भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून जागतिक स्तरावरून पाकिस्तानला यापासून रोखण्यासाठी दबाव टाकला गेला पाहिजे, अशा शब्दात तीव्र चिंता भारताचे लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी व्यक्त केली आहे.पाकिस्तानची आण्विक क्षमतेची वृद्धी ही त्यांच्या आवश्यकतेपेक्षा अधिक असून भारतही त्यादृष्टीने आपल्या सुरक्षा गरजांची दक्षता घेण्यास समर्थ आहे, असे जनरल कपूर यांनी स्पष्ट केले.शेजारी राष्ट्रांमधील या घडामोडींबाबत आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. ही बाब चिंताजनक असून पाकिस्तानकडे ६० अणुबॉम्ब आहेत व अण्वस्त्रक्षमता आणखी वाढविण्याचे प्रयत्न होत असल्याची बाब निश्चितच चिंताजनक आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी बंगळूरु येथे काल बोलताना स्पष्ट केले होते. अमेरिकेच्या अहवालात पाकिस्तानकडे असणारी अण्वस्त्रे व त्यात भवितव्यात वाढ करण्याच्यादृष्टीने होणारे प्रयत्न चालू असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्या अनुषंगाने परराष्ट्रमंत्री कृष्णा यांनी हे उद्गार काढले होते. त्यांच्या विधानाच्यासंदर्भात जनरल कपूर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

देशातील दरडोई उत्पन्न तीन हजार रुपये
नवी दिल्ली, २९ मे/वृत्तसंस्था
सर्वसामान्य सरासरी भारतीय व्यक्तीचे उत्पन्न आर्थिक सुधारणांमुळे तीन हजार रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे आढळून आले असल्याचे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनने म्हटले आहे. देशाच्या इतिहासात सरासरी मासिक उत्पन्न अशा प्रकारे प्रथमच वाढले असून २००५-०६ या आर्थिक वर्षांपासून नऊ टक्क्यांपेक्षा अधिक विकास दर साध्य झाला आहे.

शीख धर्मगुरू हल्ला : सहाजण अटकेत
व्हिएन्ना, २९ मे/वृत्तसंस्था

येथील गुरुद्वारात रविवारी शीख धर्मगुरुवर हल्ला चढविलेल्या सहाही आरोपींना अटक झाली आहे. हे सहाहीजण भारतातूनच ऑस्ट्रीयात बेकायदा वास्तव्यास आले आहेत. यातील एक आरोपी गोळीबारात डोक्यात गोळी घुसल्याने कोमात असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशचा एस. चरणजीत (वय २४), एस. हरदीप (३३), हरयाणाचा एस. सुखविंदर (२८), एस. जयपाल (३४), एस. सतविंदर (२८) आणि एस. तरसुम (४५) अशी या सहा आरोपींची नावे आहेत. कौटुंबिक वादंग अथवा धार्मिक असुरक्षिततेचे कारण देत या सहाजणांनी येथे आश्रय घेतला होता. २००१ ते २००८ या कालावधीत हे सहाजण ऑस्ट्रीयात आले होते.