Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

क्रिकेटका है ये जलवा
‘थँक यू फॉर ऑल दी एन्टरटेनमेंट’.. इंडियन प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा ललित मोदी यांनी समारोप करताना उच्चारलेले हे वाक्य ट्वेन्टी-२० क्रिकेटचे मनोरंजनमूल्य अधोरेखित करणारे ठरले. क्रिकेटच्या मैदानात व्यवसायाची बॅटिंग करण्यात ‘आयपीएल’ दुसऱ्या वर्षीही यशस्वी ठरली. खेळ आणि मनोरंजन व्यवसायाच्या मिश्रणाचा हा जलवा क्रिकेटविश्व उजळवून टाकणार की त्याचा भस्मासूर होणार, याचे तारतम्य मोदी आणि पर्यायाने क्रिकेट नियामक मंडळाला ठेवावे लागेल. खेळ मोठा की पैसा, याचे प्रामाणिक उत्तरही कधी ना कधी तरी देण्याचे धाडस ‘आयपीएल’च्या निमित्ताने दाखवावे लागणार आहे. क्रिकेट हा अनिश्चितता आणि संधींचा खेळ आहे, असे म्हणतात. त्यात तो २० षटकांचा अतिझटपट स्वरूपाचा असेल, तर मग विचारायचीच सोय नाही. पहिल्या चेंडूपासून रोमांच हे उभे राहणारच. इंडियन प्रीमियर लीगच्या
 

(आयपीएल) दुसऱ्या अध्यायाची नांदी झाली आणि अशाच अनिश्चिततेच्या हिंदोळ्यांवर आणि संधीसाधूपणाच्या खेळपट्टीवर ट्वेन्टी-२० चे चेंडू उसळी मारू लागले. यंदाच्या स्पर्धेची घोषणा होताच प्रथम वाईड बॉल पडला तो लोकसभा निवडणुकांचा! देश, लोकशाहीचे हित महत्त्वाचे की क्रिकेटची एखादी गल्लाभरू स्पर्धा, अशा राष्ट्रीय वादाचे फटके मारले गेले. त्याला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांचा ‘साईट स्क्रीन’ होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मुद्दय़ावरून यथेच्छ राजकारणही खेळले गेले. अखेर, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी सामनावीराचा बहुमान पटकाविला! ‘९० टक्के क्रिकेट हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरूनच पाहिले जाते. त्यामुळे सामने भारतात भरविण्यात आले आहेत, की परदेशी हा मुद्दाच गौण ठरतो, ‘आयपीएल’च्या निमित्ताने जे काही चालले आहे, ते क्रिकेट नक्कीच नाही,’ अशा शब्दांत त्यांनी हाणलेले सणसणीत षटकार सर्वाचीच बोलती बंद करून गेले.
दुसरीकडे क्रिकेटच्या या सर्कसचे रिंगमास्टरही स्वस्थ बसणारे नव्हते. ‘तू नहीं तो और सही’ असे म्हणत त्यांनी सीमोल्लंघन करण्याचे ठरविले. इंग्लंडपेक्षा दक्षिण आफ्रिकेचा पर्याय किफायतशीर ठरला. मात्र, अगदी सचिन तेंडुलकरपासून युवराजसिंगपर्यंतच्या आघाडीच्या खेळाडूंनी ‘भारताबाहेर आयपीएल’ ही कल्पनाच सहन होत नसल्याचे म्हटले. ही स्पर्धा भारताबाहेर खेळविण्यात येणार, मग तिच्या ‘इंडियन’पणाला काय अर्थ, असे सवालही उपस्थित करण्यात आले. परंतु, लाखो डॉलरच्या बोलींपुढे असे भावनिक-नैतिक मुद्दे कवडीमोलाचे ठरले आणि आयपीएल सफारीला प्रारंभ झाला. ‘फॅशन का है ये जलवा’प्रमाणे ‘क्रिकेट का है ये जलवा’ असे ‘थीमसाँग’ही वाजू लागले!
‘रेनबो कन्ट्री’ म्हणून लौकिक असलेली दक्षिण आफ्रिका आयपीएलच्या सप्तरंगी उधळणीत न्हाऊन निघण्यात उत्सुक होतीच. क्रिकेटवर आधारित राजनीती, म्हणजेच ‘क्रिकेट डिप्लोमसी’ ही काय फक्त भारताचीच मक्तेदारी आहे काय! राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा यांच्या नुकत्याच निवडून आलेल्या सरकारला आफ्रिकेतही काहीतरी करिष्मा करून दाखवायचा होता. त्यातच निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्याप्रमाणेच तिथेही वाद-गैरव्यवहारांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. ‘भले-बुरे ते घडून गेले,विसरून जाऊ सारे क्षणभर’ असे म्हणत देशात ‘फीलगुड’ आणण्यासाठी जुमा सरकारही उत्सुक होते. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद यशस्वी करून दाखविण्याची रंगीत तालीम त्यांना पार पाडायची होती. नेल्सन मंडेला यांच्या कारकिर्दीनंतरही दक्षिण आफ्रिका आपल्या कर्तृत्त्वाने जगाची वाहवा मिळवितो, याची प्रचिती त्यांना द्यायची होती. त्यामुळेच की काय, अवघ्या काही आठवडय़ांच्या कालावधीत आफ्रिका आयपीएलसाठी सज्ज करण्यात आला!
आयपीएलच्या मैदानावर काय घडले, कसे घडले, गेल्या वर्षी शेवटून पहिल्या आलेल्या डेक्कन चार्जर्सने यंदा अव्वलस्थानाचा चार्ज कसा घेतला, याचे कोटय़वधी क्रिकेटप्रेमींनी दूरदर्शन घेतले. प्रत्यक्ष मैदानावर प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळेल, अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. परंतु, स्टेडियममधील उपस्थितीचे सर्व विक्रम यंदाच्या आयपीएलने मोडीत काढले, असा दावा मोदी व कंपनीने केला. अर्थात, त्यात मोदी-आदींचे फारसे कर्तृत्त्व नाही! दक्षिण आफ्रिकेत ‘प्रो-२०’ या नावाने कित्येक वर्षांपासून ट्वेन्टी-२० ची स्पर्धा भरविली जाते. ती प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच त्याचाच आणखी एक आविष्कार, तोही आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या साक्षीने पाहण्यासाठी आफ्रिकी क्रिकेटप्रेमी उत्सुक होता. तवा गरम होताच, मोदींनी पोळी भाजून घेतली! अर्थात, पोळी लाटण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ते पीठ मळण्याचे त्यांचे कौशल्य मात्र नाकारून चालणार नाही.
एकदिवसीय स्वरूपाच्या खेळाने सभ्य गृहस्थांच्या कासवछाप क्रिकेटला रंगीबेरंगी पोषाख, विद्युत प्रकाशझोत आणि रोमांचकारक वेगवान सामन्यांची देणगी दिली. ट्वेन्टी-२० मुळे क्रिकेटचा २१ व्या शतकातील जेट युगाला साजेसा आविष्कार घडतो आहे. क्रिकेटच्या पुस्तकांमध्ये फलंदाजीच्या नवीन फटक्यांची भर पडली. त्याचप्रमाणे नवीन संकल्पनांची देणगीही मिळाली. फ्री-हिट्, टाय-ब्रेकरच्या पाठोपाठ आता सुपर ओव्हरच्या थराराची भर पडली. कोलकाता नाईट रायडर्स आणि रायस्थान रॉयल्सच्या सामन्यादरम्यान ती आपण अनुभविली. अर्थात, हे सर्व बदल खेळाशी निगडित असल्याने ते खेळाच्या सीमारेषेमध्ये चपखलपणे बसले देखील! इथेच तर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. ‘स्ट्रॅटिजी ब्रेक’ नावाचा बदल मात्र सर्वच स्तरांवर नाकारला गेला. कारण, त्याच्या मागे खेळापेक्षा होते व्यवहाराचे गणित. मैदानातील धावांपेक्षा जाहिरातींमधील धावफलक वाढविण्याचा स्वार्थ!
व्यवसायाचा धंदा कधी होतो, ते कळत नाही. आयपीएल-२ च्या निमित्ताने मोदी आणि कंपनी अशीच वाहावत गेली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचीदेखील त्यामध्ये फरफट झाली. कारण होते मोदींनी जाहीर केलेल्या ‘एसएमएस गेम’चे. पुढील षटकामधील प्रत्येक चेंडूवर किती धावा होतील, याचा अंदाज बांधून तसा एसएमएस करायचा अशी ही स्पर्धा होती. स्पर्धा कसली, तो तर सट्टाच होता! त्यामुळेच की काय, त्याला जोरदार विरोध झाला. उशिरा का होईना मोदींच्या अतिउत्साहाला वेसण घालण्यात आली. ही स्पर्धा मागे घेण्यात आली. इंटरनेटवरही आयपीएलची धूम होती. त्याचाच गैरफायदा उठवित फेक आयपीएल प्लेयर, म्हणजेच ‘एफआयपी’ या नावाचा उपद्व्याप वादाच्या भोवऱ्यात सापडला. या कथित सूत्राने (जो एका संघातीलच खेळाडू होता, असे भासविण्यात आले!) आयपीएलच्या ‘ड्रेसिंग रूम’ची दारे सताड उघडल्याचा दावा केला. अर्थात, तो फार काही यशस्वी झाला नाही.
सामनानिश्चितीचे झालेले आरोप, प्रशिक्षक जॉन बुकानन आणि वर्णद्वेषाने ग्रासलेला कोलकात्याचा संघ.. सॉरी फ्रँचाईझी, असे अनेक वाद झडले. अरे हो! आयपीएलशी संबंधित आणखी एक गोष्ट सांगायचीच राहिली. आयपीएलमधील संघांना कधीही टीम किंवा क्लब असे संबोधिण्यात आलेले नाही. त्यांना अगदी पहिल्या दिवसापासून ‘फ्रँचाईझी’ असेच लेबल लावण्यात आले आहे. आयपीएल नावाच्या मोठय़ा मॉलमधील आठ संघ म्हणजे आठ दुकाने. त्यामध्ये क्रिकेटपटू नावाच्या कच्चा माल. आणि अंतिमत: सामना नावाच्या पॅकेजमध्ये गुंडाळण्यात आलेले क्रिकेट नावाचे उत्पादन! क्रिकेटच्या या उत्पादनीकरणाचा एवढा बेमालूम कारखाना यापूर्वी निघाला नसेल! ऑस्ट्रेलियातील पॅकर क्रिकेट सीरिज क्रिकेटविश्वामध्ये वादग्रस्त ठरली होती. परंतु, त्याला क्रिकेटच्या व्यावसायिकरणापेक्षा बंडखोरांची स्पर्धा (‘आयसीएल’प्रमाणे) असेच स्वरूप अधिक प्राप्त झाल होते.
ब्रिटिश मंडळी फ्रेंचांनंतर कुणाचा दुस्वास करीत असतील, तर तो भारतीयांचा. त्यांनीच उभारलेल्या पायाभूत सुविधांच्या जोरावर आज आपण त्यांच्याच पुढे पाऊल टाकत आहोत. त्याचप्रमाणे साहेबाच्या खेळाचा वापर करून पैसा मात्र आपण कमवित आहोत! म्हणूनच, साहेबाचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या क्रिकेट मंडळाशी हुज्जत घालत आहेत. वास्तविक, ट्वेन्टी-२० ची संकल्पना दक्षिण आफ्रिकेतील. त्याला कौन्टी स्पर्धेच्या माध्यमातून संघटित स्वरूप दिले ते इंग्लंडने. आणि आता त्यावर गडगंज होत आहे ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ! त्यातच इंग्लंडचा पर्याय नाकारून आफ्रिकन सफारीवर जाण्याचा निर्णय आयपीएलच्या दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने घेतला गेला. का नाही इंग्लिश मंडळ आपल्याला पाण्यात पाहणार!!
दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता आयपीएलचे आयोजन करण्यासाठी क्रिकेट खेळणारे इतर देशही मागणी घालू लागले आहेत. हे म्हणजे एखाद्या बँकेत वा विमा कंपनीत नोकरीला असलेल्या उपवर मुलीच्या स्थळाप्रमाणे झाले! त्या मुलीपेक्षा तिच्या नोकरीचेच गुण अधिक जुळविले जातात!! आयपीएलला मागणी घालणाऱ्यांचेही असेच आहे. त्यांना सचिन, जयसूर्या, युवराज, हेडनच्या फटकेबाजीपेक्षा क्रिकेटची सर्कस भरवून गल्ला गोळा करण्यातच अधिक रस आहे. (आणि का नसावा? खपणाऱ्या मालाची एजन्सी घेण्यास सारेच उत्सुक असतात ना!)
या मागणीमुळेच की काय, मोदी आणि कंपनी ग्लोबलायझेशनची भाषा करीत आहे. त्याचप्रमाणे मँचेस्टर युनायटेड या जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबपेक्षाही आयपीएलचे संघ अधिक लोकप्रिय ठरले आहेत, अशा वल्गना करीत आहेत. पण, आजही क्रिकेट खेळले जाते ते अवघ्या १२-१५ देशांमध्ये. फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळतात दोनशेहून अधिक देश आणि मुख्य स्पर्धेसाठी त्यामधून निवडले जातात सर्वोत्तम ३२ देशांचे संघ. क्रिकेट आणि आयपीएलसुद्धा जेमतेम १०-१२ देशांच्या डबक्यामध्येच गटांगळ्या खात आहे. परंतु ट्वेन्टी-२० च्या माध्यमातून क्रिकेटच्या ग्लोबल आविष्काराचे मॉडेल हाती लागले आहे, हे निश्चित. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतरच ते स्पष्ट झाले होते. आयपीएलच्या ख-या ग्लोबल आविष्कारासाठी मात्र अजून प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात, अमेरिका ही त्यासाठी सर्वोत्तम भूमी ठरेल. पाच दिवसांचा सामना म्हणजे ‘रिडिक्यूलस, क्रेझी’ प्रकार आहे, असे अमेरिकी क्रीडाप्रेमी म्हणतात. संपूर्ण दिवसभर चालणारा सामना हासुद्धा त्यांना वेळेचा अपव्यय वाटतो. या पाश्र्वभूमीवर ट्वेन्टी-२० हे फास्टफूड संस्कृतीला अगदी शोभेसे आहे. थंडगार पेयाची धुंदी उतरेपर्यंत सामना खल्लास! मग, आनंदात वा दु:खात बुडून जाण्यासाठी पुन्हा मैदान मोकळे!! अमेरिकेप्रमाणे चीन हेसुद्धा आयपीएलचे फेव्हरिट ठरू शकते. २०२० पर्यंत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी चीनने कंबर कसली आहे. सर्वच क्षेत्रात भारताशी स्पर्धा करण्याचे एक प्रकारचे ‘प्रतिष्ठायुद्ध’ चीननेही पुकारले आहे. त्यामुळे आयपीएलला बीजिंगचा लाल सलाम मिळू शकतो! गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकच्या निमित्ताने चीन हासुद्धा कुछ कम नहीं, असे साऱ्या जगानेच म्हटले होते. त्यामुळे आयपीएलचा आविष्कार घडविण्यास त्यांना फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
क्रिकेटचे व्यावसायिकीकरण, धंदेवाईकता यांच्याही पुढे जाऊन क्रिकेटचे एक उत्पादन म्हणून दुकान थाटण्यात आले आहे. त्याचा खप वाढविण्यासाठी मोदी आणि कंपनी आतूर झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही पैशाच्या लोभापायी त्यांना आवर घालणे शक्य झालेले नाही. म्हणूनच की काय, आयपीएल २ चा अंतिम सामना होण्यापूर्वीच मोदींनी चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा ऑक्टोबरमध्ये भारतात भरविली जाईल, अशी घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदही क्रिकेटच्या या तमाशामध्ये सहभागी झाली आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या कॅलेंडरमध्ये चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० ला त्यांनी स्थान दिले आहे, असे समजते. या स्पर्धेच्या निमित्तानेही भारतामधील सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होईल. अर्थात, आता केंद्र सरकारमध्ये ‘जय हो’ गर्जत असल्याने चिदम्बरम यांच्याकडूनच या स्पर्धेचे ‘रेड कार्पेट’ स्वागत केले गेले, तर नवल वाटू नये.
आयपीएलचा हा जलवा संपलाही नाही, तेव्हढय़ातच ट्वेन्टी २० विश्वचषक स्पर्धा भरते आहे. स्वाभाविकच, या दोन्ही स्पर्धाची लगेचच तुलना केली जाणार आहे! खेळ आणि मनोरंजन-व्यवसायाच्या मिश्रणाच्या या जलव्याने क्रिकेटविश्व उजळवून टाकायचे, की त्याचा भस्मासूर करायचा, याचे तारतम्य मोदी आणि पर्यायाने क्रिकेट नियामक मंडळाला यापुढील काळात ठेवावे लागेल. त्याचप्रमाणे, खेळ मोठा की पैसा, याचे प्रामाणिक उत्तर देण्याचे धाडसही कधी ना कधी तरी ‘आयपीएल’शी संबंधित घटकांना दाखवावे लागणार आहे.
चौकार-षटकार.. पैशांचे!
‘आयपीएल’चे अर्थकारण नेमके कसे चालते, प्रत्येक फ्रँचाईझीची गणिते काय आहेत, अशा प्रश्नांबाबत क्रिकेटप्रेमींना फारशी कल्पना नाही. मूलत: आयपीएलचे संपूर्ण मॉडेल हे इंग्लंड, स्पेन, इटली अशा विविध देशांच्या साखळी स्पर्धामध्ये खेळत असलेल्या फुटबॉल क्लबच्या धर्तीवरील आहे. मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद, बार्सिलोना, लिव्हरपूल अशा फुटबॉल क्लबच्या धर्तीवर आयपीएलच्या फ्रँचाईझीचे अर्थकारण आधारित आहे.
आयपीएल सुरू होताना प्रत्येक फ्रँचाईझीचा लिलाव करण्यात आला. ती फ्रँचाईझी विकत घेताना दिलेली रक्कम ही त्या मालकाने तीन वर्षांच्या मुदतीसाठी आयपीएलच्या संयोजकांकडे ठेवली. म्हणजेच, शाहरूख खानने कोलकाता नाईट रायडर्सची मालकी प्राप्त करताना भरलेले सुमारे ३८० कोटी रुपये संयोजकांना तीन वर्षे वापरण्यासाठी मिळाले. या मूलभूत ‘गुंवतणुकी’च्या बदल्यात प्रत्येक फ्रँचाईझीला दूरचित्रवाणी हक्कांद्वारे संयोजकांना मिळणाऱ्या रकमेतील १० टक्के वाटा, प्रायोजकांकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातील काही ठराविक रक्कम, तिकिटविक्री, टी-शर्ट, स्मृतिचिन्हे अशा स्पर्धेच्या अधिकृत उत्पादनांची विक्री अशा अन्य तीन ते चार मार्गानी हमी रक्कम दिली जाते. त्या व्यतिरिक्त प्रत्येक फ्रँचाईझीने आपल्या संघाच्या पुरस्कर्त्यांसाठी बोली लावली होती. पुरस्कर्त्यांना मिळणाऱ्या नफ्यातील करारानुसार ठरलेला वाटा हा फ्रँचाईझीच्या खात्यात जमा होतो.
तुम्ही सामना जिंका अगर पराभूत व्हा. ठराविक रक्कम ही गळाशी लागतेच. आता हेच पाहा ना, गेल्या वर्षीच्या आयपीएलमधील पहिल्या दहा सामन्यांमध्येच बहुतांश संघांनी सुमारे ४०० कोटी रुपयांची ‘वसुली’ केली होतीच. म्हणजेच, त्यापुढील प्रत्येक पैसा हा नफा रकान्यामध्ये जमा होत गेला!
यंदाच्या आयपीएलद्वारे सुमारे १२१ दशलक्ष डॉलर एवढी उलाढाल झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामधील २४ टक्के रक्कम करांच्या स्वरूपात दक्षिण आफ्रिकी सरकारकडे जमा करायची आहे. उर्वरित सर्व रक्कम आयपीएलच्या गंगाजळीत! मंदीचे यॉर्कर पडत असतानाही प्रत्येक संघाला सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे त्या संघांच्या मुख्य पुरस्कर्त्यांना पाच ते २० टक्के नफा होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील पुढील तिमाहीच्या आकडेवारीमध्ये त्याचे प्रत्यंतर येईलच. राजस्थान, दिल्ली, कोलकाता आदी संघांना दूरचित्रवाणी प्रसारणाच्या हक्कांमधून ६७.५ कोटी रुपये मिळाल्याचे वृत्त आहे. पुरस्कर्त्यांकडून १० कोटी रुपये आणि जाहिराती व तिकिटविक्रीमधून सुमारे १५ कोटी रुपयांचा गल्ला प्रत्येक फ्रँचाईझीकडे जमा करण्यात येणार आहे.
प्रत्येक फ्रँचाईझी आपल्या प्रत्येक क्रिकेटपटूला ठरविक रक्कम देऊन करारबद्ध करते. अर्थात, त्यासाठी त्याच्या क्रिकेट कौशल्याबरोबरच मैदानाबाहेरील ‘उत्पन्नमूल्या’चा विचारही असतोच असतो!
या स्पर्धाचे दूरचित्रवाणी हक्क प्राप्त करणाऱ्या वाहिनीने, दिलेल्या रकमेच्या कितीतरी पट अधिक उत्पन्न कमाविले ते जाहिरातींच्या माध्यमातून. ‘वसुधैव कुटुंबकम’ अशा सिम्बायोसिस नातेसंबंधांमधून आयपीएलचे अर्थकारण चालते. ही एक साखळी आहे. त्यामधील एखादा घटक जरी डळमळीत झाला, तरी संपूर्ण अर्थव्यवस्थेचा डोलारा कोलमडून जाऊ शकतो. त्यामुळे एकमेकांचे हितसंबंध जपण्याशिवाय कुणाला पर्यायच नाही!
आपल्याकडे म्हणतात ना.. सहकारातून समृद्धीकडे, तसे!
ashpen6@yahoo.com