Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

गोष्ट - व्यवस्था
१ नोव्हेंबर २००८

कराचीच्या रीजंट हॉटेलबाहेर त्यावेळी फारशी वर्दळ नव्हती. ‘झुहर’च्या नमाजाहून लोकअजून परत आले नव्हते. याकूब दरबानाला जवळजवळ ढकलतच हॉटेलच्या मुख्य दरवाजातून आत शिरला आणि लिफ्टच्या दरवाजाकडे धावला. लॉबीत उभा असलेला हॉटेलचा जनसंपर्क अधिकारी पाठमोऱ्या याकूबच्या मागे ‘एक्स्यूज मी, जनाब..’ म्हणत लगबगीने पुढे झाला. लिफ्टमध्ये शिरता शिरता याकूबने मागे तोंड फिरवून त्याच्याकडे पाहिले. याकूबचा चेहरा पाहताच तो जनसंपर्क अधिकारी गारठल्यासारखा जागीच खिळला. लिफ्टला सहाव्या मजल्यावर पूर्ण थांबू न देताच घाईघाईने याकूबने लिफ्टचे दार उघडले. तीरासारखा तो एक्झिक्युटिव्ह सूटमध्ये शिरला. बैठकीच्या खोलीत आय. एस. आय.चे दोन अधिकारी बसलेले होते. त्यांनी रोखण्यापूर्वीच याकूब आतल्या खोलीत दाखल झाला.
आतल्या खोलीत आय. एस. आय.चा एक उच्च अधिकारी बसला होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत याकूब खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या व्यक्तीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला व हळू आवाजात म्हणाला, ‘‘भाई, एक बुरी खबर!’’ खिडकीपासून
 

दूर होत त्या व्यक्तीने डोळ्यावरचा काळा चष्मा काढीत याकूबकडे पाहत म्हटले, ‘‘बको.’’ याकूब फक्त त्या व्यक्तीला ऐकू येईल असे पुटपुटला, ‘‘भाई, बॉम्बे पुलीसने कासिम फिल्मीको उडा दिया.’’ क्षणभर.. फक्त क्षणभरच- खिन्नतेचे भाव त्या व्यक्तीच्या तोंडावर पसरले असावेत असे याकूबला वाटले. याकूबने ते भाव नीट वाचण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीची तीक्ष्ण नजर याकूबच्या डोळ्यांतून काळजापर्यंत गेली आणि याकूबने आपली नजर पटकन् खाली वळवली.
फिल्मी कासिम हा भाईचा अत्यंत आवडता व विश्वासू सहकारी. एक सिनेमा सोडल्यास कासिमला कोणतेही व्यसन नव्हते. भाईने जेव्हा मुंबईच्या अंडरवर्ल्डचा ताबा मिळविला, त्याच सुमारास कासिम भाईचा विश्वासू आणि हरकाम्या म्हणून अंडरवर्ल्डच्या आतल्या वर्तुळात ओळखला जाऊ लागला. मितभाषी असल्याने मुंबईतील सर्वसामान्य गुंड व पोलीस यांना जरी तो विशेष परिचित नसला, तरी अंडरवर्ल्डच्या खास वर्तुळात लोक त्याचे स्थान ओळखून होते. सिनेमाच्या नादामुळे आणि भाईच्या विश्वासाच्या माणसाची नजर धंद्यावर असावी म्हणून भाईने मुंबई सोडल्यावर कासिम मुंबईतच राहिला.
याकूबला थांबण्यास सांगून भाई आय. एस. आय.च्या उच्च अधिकाऱ्याला म्हणाला, ‘‘इस बडे कामको कब अंजाम देना है?’’
तो अधिकारी म्हणाला, ‘‘अगले महिने जनाब!’’
‘‘ठीक है, खुदा हाफिज!’’ इतके बोलून भाईने त्याचा निरोप घेतला.
बाहेर येताच भाईने नजरेनेच याकूबला आपल्याबरोबर येण्यास खुणावले. लिफ्टमधून सहाव्या मजल्याहून खाली येत असताना दोघेही काही बोलले नाहीत. गाडीत बसताच याकूब भाईच्या कानाशी लागला, ‘‘भाई, पोलिसांनी कासिमला टॉकिजमध्ये इंटरव्हलला उडवला. कासिमच्या घरी खबर पोचवू? कुछ पैसा भेजना है क्या?’’
‘‘खबर भेज दो. पण पैसे किंवा मदत पाठवण्याचा प्रयत्न करू नकोस. कासिमच्या घरी कोणीही नाही.’’
‘‘कासिमच्या अम्मीला कासिमचे या धंद्यात येणे मान्य नव्हते म्हणून ती आणि कासिमचा भाऊ माहीमला वेगळे राहतात. ती पैसेही घेणार नाही,’’ भाई म्हणाला. याकूब म्हणाला, ‘‘कासिमच्या भावाला आपल्याबरोबर घेऊ या?’’
‘‘नको.’’ घाईघाईने भाई म्हणाला.. ‘‘कासिमच्या अम्मीला ते आवडणार नाही. शिवाय रशीद- कासिमचा भाऊ- एकदम बेवकूफ आहे. उसको थोडासा भी भेजा नहीं है.’’ त्यानंतर रस्ताभर तो विचारांत गुंग होता. याकूबला काही सुचवायचे होते, परंतु तो भाईची तंद्री भंग करू धजला नाही.
गाडीतून उतरण्यापूर्वी भाई म्हणाला, ‘‘कासिमचा भाऊ रशीद परेलला एका छोटय़ाशा कारखान्यात काम करतो. तू एक काम कर. आपली धारावीला मोठी शेड आहे. त्या शेडमध्ये मेणबत्त्या बनवण्याचा एक मोठा कारखाना सुरू झाला पाहिजे. तू उद्याच मुंबईसाठी निघ. पंधरा दिवसांच्या आत हा कारखाना सुरू झालाच पाहिजे. सबसे अच्छी मशीने खरीदो. आजूबाजूच्या बेकारांना कामावर लाव. वाटेल ती मजुरी दे. लाखो मेणबत्त्या दिवसाला तयार झाल्या पाहिजेत. कारखाना सुरू झाल्यावर चालवायला कासिमच्या भावाच्या ताब्यात दे.’’
‘‘पण भाई, या लाखो मेणबत्त्या तो कसा काय खपवणार? पंधरा दिवसांच्या आत हा कारखाना सुरू करायचा म्हणजे आपले खूप पैसे खर्च होणार. आणि आपणच म्हणालात की, रशीद..’’
‘‘हो, मीच म्हणतोय- तो एकदम बेवकूफ आहे. पण तो मेहनती व प्रामाणिक आहे. त्याला मार्केटिंग करायची गरजच नाही. माझा अंदाज आहे की, इन्शाल्लाह! लाखो मेणबत्त्या अपने आप खपतील.’’

२१ नोव्हेंबर २००८
मुंबईहून रात्री दहा वाजता कराचीला मोबाईलवर फोन जोडला जातो. ‘‘हुजूर, मी याकूब बोलतोय. काम पूर्ण झालं. काल पहिल्याच दिवसात पंचेचाळीस हजार मेणबत्त्या तयार झाल्या. दोन दिवसांत इन्शाल्लाह, दुपटीने माल तयार होऊ लागेल.’’
‘‘कारखाना आता रशीदच्या ताब्यात दे. त्यालाच पूर्ण व्यवहार बघू दे.’’
‘‘जी हुजूर. खुदा हाफिज.’’ भाईच्या समोर उभे असताना त्याला ‘भाई’ संबोधणारे फोनवर हमखास ‘हुजूर’ म्हणत.

२६ नोव्हेंबर २००८
दहा-बारा मुस्लीम अतिरेक्यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध ताजमहाल हॉटेल, ओबेराय हॉटेल व दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी हल्ले करून मुंबईत नव्हे, भारतात नव्हे, तर संपूर्ण जगात खळबळ माजवली होती.

२७ नोव्हेंबर २००८
सकाळपासून याकूब कराचीला फोन लावावा की नाही, या विचाराने परेशान झाला होता. शेवटी न राहवून त्याने मोबाईलवरून कराचीला तो नंबर फिरवला. दोन वेळा रिंग वाजली व फोन कट झाला. पुन्हा प्रयत्न करावा की नाही, या विचाराने याकूबच्या मनाची घालमेल होऊ लागली. त्याने पुन्हा तो मोबाईल रिडायल न करता, त्या मोबाईल नंबरचा एक-एक अंक दाबण्यास सुरुवात केली. सहा आकडे दाबून होताच त्याने स्वत:च तो मोबाईल नंबर कॅन्सल केला. ती जरी मुंबईतली संध्याकाळ होती व बाहेर सूर्यास्त झाला असला, आणि तो उभा असलेला कमरा पूर्णत: वातानुकूलित असल्याने थंडगार होता, तरीही तो घामाने चिंब भिजला होता. मनाचा हिय्या करून त्याने पुन्हा एकदा मोबाईल उचलला. पुन्हा एकदा तो नंबर दाबणार, इतक्यात अचानक मोबाईल वाजू लागला. भीतीच्या धक्क्याने त्याची गाळण उडाली. हातातला विंचू झटकून टाकावा तसा फोन हातातून उडाला. भानावर येताच त्याने सोफ्यावर पडलेल्या मोबाईलवर नजर टाकली. मोबाईल वाजत होता व त्यावर एक अनोळखी नंबर दिसत होता. हिरवे बटन दाबून त्याने फोन कानाला लावला. ‘याकूब!’ भाईचा आवाज कानावर येताच त्याच्या जिवात जीव आला. ‘तू आता कुठे आहेस?’
‘‘हुजूर, मी कारखान्यातच आहे.’’ याकूब अतिशय उत्तेजित होऊन बोलू लागला, ‘‘आपल्या दहा-पंधरा पोरांनी सगळ्या मुंबई पोलिसांची हालत पातळ केली आहे. त्यांच्या एटीसमधल्या अहेम लोकांना खल्लास केलं. इतनाही नहीं, इंडियाच्या नेव्ही, एनएसजी, कमांडो सगळ्यांची..’’
‘‘खामोष, चूप.. बिल्कूल चूप. मी सर्व टीव्हीवर पाहतोच आहे.’’
‘‘हुजूर, मेणबत्त्यांचा स्टॉक खूप झालाय. लाखो मेणबत्त्या जमा झाल्यात. अभीतक कोई ऑर्डर नहीं. आता माल स्टॉक करायलाही जागा नाही.’’
‘‘कोई बात नहीं. प्रॉडक्शन वाढवा. तू एक काम कर- काही बकवास करणाऱ्या सोशल वर्करना पैसे देऊन हिंदू लीडरच्या समोर बकवास करायला सांग.’’
‘‘बकवास म्हणजे नक्की काय?’’
‘‘बकवास म्हणजे हेच की.. आपल्या भारतीय लोकांमध्ये काही दम नाही. नेत्यांमध्ये दम नाही. या आक्रमणाचा बदला घ्यायची ताकद नाही. हाय सोसायटीचे लोक फक्त शोकसभा घेतात. मोर्चा काढतात.. ऐसाही कुछ बोलने दो. जाताना प्रेसलाही घेऊन जायला सांग.’’
‘‘पण भाई, या मेणबत्त्यांच्या स्टॉकचं काय?’’
‘‘मी सांगतो तसं कर. आणि हो, उद्यापासून मेणबत्त्यांचा स्टॉक उठवण्यासाठी सगळ्या मुंबईतील एजंटस्ना बोलव. तू आता सोशल वर्करना बरोबर घेऊन जा व त्यांना नेत्यांना चिथवायला सांगायचं. बरोबर प्रेसलाही घेऊन जा. शिवाय मराठी छोडकर बाकीच्या प्रेसला त्या काफीर राज ठाकरेची आठवण करून दे. आता कुठे आहे राज ठाकरे, असे विचारायला सांग.’’
या सगळ्याचा नक्की उपयोग काय, हे याकूबला उमगेना. पण भाईचा हुकूम बजावायचा, हे त्याचं काम होतं. ते प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी तो कामाला जुंपला.

३० नोव्हेंबर २००८
दोन दिवसांच्या अविश्रांत कामानंतर याकूबने भाईच्या आज्ञेनुसार एमिरात एअरवेजचे दुबईसाठीचे रात्रीचे विमान गाठले. उद्या सकाळी त्याला दुबईहून पाकिस्तानसाठीचे पहिले विमान पकडावयाचे होते. त्याने जराशी पाठ टेकली. पाकिस्तानात दिवसभर भाईची चमचेगिरी करायची व आलिशान गाडय़ांतून फिरायचे, इतकेच काम होते. त्यामुळे दोन दिवसांच्या सततच्या कामाने त्याला अतिशय दमायला झाले होते. त्याला भाईच्या विचारशक्तीचे अमाप कौतुक वाटत होते. फक्त ३६ तासांत पन्नास लाखांपेक्षा जास्त मेणबत्त्या विकल्या गेल्या होत्या. प्रॉडक्शन आता दुप्पट केले होते. हे सगळे होत असताना भाईने आपल्याला परत का बोलावले, याचे त्याला प्रचंड आश्चर्य वाटत होते. २१ नोव्हेंबरपासून मेणबत्त्यांचे प्रॉडक्शन सुरू केले होते. चार दिवसांत २५ नोव्हेंबपर्यंत मेणबत्त्यांचा प्रचंड साठा झाला होता. इतक्या मेणबत्त्या कशा विकायच्या, याचे त्याला टेन्शन होते. तशातच २६ नोव्हेंबरला रात्री त्याला ‘ताज’ व ‘ओबेराय’वरील हल्ल्याचे कळले. अशावेळी मुंबईतील त्याच्या उपस्थितीबद्दल त्यालाच एक प्रकारचे भय वाटत होते. २६ व २७ या दोन्हीही दिवशी आपणास कराचीस परत बोलवण्यात येईल असे त्याला वाटत होते. तसे न झाल्याने तो भयग्रस्त होता. त्यात मेणबत्त्यांचा प्रचंड साठा असताना २७ ला संध्याकाळी भाईने मेणबत्त्यांचे प्रॉडक्शन वाढविण्यास सांगितले होते. परंतु पुढील दोन दिवस कामात कसे गेले, तेच कळले नाही.
२८ व २९ नोव्हेंबर या दोन दिवसांत मेणबत्त्यांचा संपूर्ण साठा संपला. प्रॉडक्शन दुप्पट करूनही एजंटांची मागणी पुरविता येत नव्हती. सर्व साठा दुप्पट दरात विकला गेला होता. त्याला मुंबईतील लोकांची व भाईच्या सुज्ञपणाची कमाल वाटत होती. भाईला मुंबईतील लोकांची नस बरोबर सापडली होती. त्याच्या सूचनेनुसार याकूबने सोशल वर्करना हिंदू लीडरच्या समोर बकवास करायला, चिथवायला पाठविले होते आणि भाईला पाहिजे तसेच झाले. एका हिंदू संघटनेच्या मुस्लीम नेत्याने चिथावल्या गेल्यानंतर टीव्हीवाल्यांसमोर हाय सोसायटीच्या लोकांची टिंगल करताना हाय सोसायटीच्या बायकांबद्दल म्हटले की, ‘असा काही दुर्दैवी प्रकार देशात घडला की या बायका लिपस्टिक लावून मेणबत्त्या जाळतात.’ त्या नेत्याच्या या टिप्पणीचा टीव्ही चॅनेलवाल्यांनी यथेच्छ समाचार घेतला व त्याची हुर्यो उडवीत मेणबत्त्यांची मागणी दुप्पट करण्यास मदत केली.
भाईने गुन्हेगारी जगताला नवीन वळण देत त्याची व्यापारी कंपनी केली, हे सगळ्या जगाला माहीत होते. पण इतक्या दूर बसून तो मुंबईत एखाद्या वस्तूची केवळ निर्मिती व विक्री करतो, इतकेच नाही, तर त्या वस्तूला बेसुमार मागणी वाढावी म्हणून एक छोटीशी खेळीही अत्यंत सहज व यशस्वीपणे खेळू शकतो. पण तरीही अचानक झालेल्या या मेणबत्त्यांच्या व्यवहाराचे कोडे याकूबला सुटले नाही.

२ डिसेंबर २००८
पाकिस्तानात परतल्यानंतर पूर्ण एका दिवसाच्या विश्रांतीनंतर याकूब भाईला भेटत होता. ‘‘सलाम वालेकुम, भाईजान.’’
‘‘वालेकुम सलाम, याकूब. क्यो मियॉं, डर गये थे क्या?’’ भाईच्या एकंदर बोलण्यावरून स्वारी एकदम खुशीत असावी.
याकूबच्या मनावरचे दडपण कमी झाले व तो अघळपघळ बोलत म्हणाला, ‘‘क्या भाई, तुम्हाला हे सगळे होणार, हे माहीत होते. मला मात्र टेन्शन दिले.’’
‘‘अरे, तुझ्या समोरच सगळे ठरले होते. तुला आठवतं, तुझ्यासमोरच रिजंट हॉटेलमध्ये महिन्यापूर्वी.. बडा काम.. आठवलं?’’
‘‘ओहो! आता कळलं. पण मेणबत्त्यांचा व्यापार.. हे कसं काय सुचलं?’’
‘‘हे बघ याकूब, मी जरी अंडरवर्ल्डमध्ये आलो, तरी दादागिरीपेक्षा स्वत:साठी पैसा कमावणं हा माझा मुख्य व प्रथम उद्देश होता व आहे. पैशासाठी मी अंडरवर्ल्डची ‘डी’ कंपनी केली. एक तुला प्रामाणिकपणे सांगतो- पैसा कमावण्यासाठी मी काहीही करेन. जेव्हा मुंबईवरील हल्ल्याचं ठरत होतं, नेमक्या त्याचवेळी तू कासिमची दु:खद बातमी घेऊन आलास. आणि थोडय़ा विचारांती कासिमच्या कुटुंबासाठी पैसा मिळवायचा मार्ग मला सापडला.’’
‘‘पण हा मेणबत्त्यांचा व्यापार..?’’
‘‘फार वर्षांपूवी मी मुंबईत असताना हप्तावसुलीसाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये जायचो. तेथे एक अतिशय छोटे दुकान, जिन्याखाली होते. एका छोटय़ा हातगाडीएवढे असेल. तो एक गुजराती दुकानदार होता. ऑफिस स्टेशनरी, यू क्लिप्स, रबर, पेन्सिल, पेन इ. विकायचा. आठवडय़ाला सुमारे हजार रुपये इतकी विक्री करायचा. आम्हाला प्रामाणिकपणे ही फिगर सांगायचा आणि हप्ताही द्यायचा. अचानक केव्हातरी त्याची विक्री डबल व्हायला लागली. त्याने एकदा एका युनियन लीडरला सुचवले की, मॅनेजमेंटचा निषेध म्हणून तुम्ही काळ्या फिती का लावत नाही? झाले! तेव्हापासून त्याने रिबिनीच्या काळ्या फिती बनवून विकायला सुरुवात केली. ही गोष्ट आम्हाला सांगताना तो म्हणाला होता, ‘ये बंबई पब्लिक- खास करके ऑफिस जानेवाली, बडे फ्लॅट में रहनेवाली- इतनी डरपोक है, कि अगर प्रोटेस्ट भी करना है तो काली रिबन लगाके चुपचाप काम करेगी. जरा आवाज उठानेको भी इनकी फटती है. ये लोग साले मोर्चा में भी शरमाते शरमाते चलते है. साला.. सिर्फ काली रिबन लगाना या तो कॅन्डल जलाना! साला.. किसीने दारू पिके गाडी चलाके किसी बच्चे को उडाया तो भी कॅन्डल जलायेंगे.’ तिथेच मला माझ्या अंडरवर्ल्डच्या धंद्याची शिक्षा मिळाली आणि मुंबईत पैसे कसकसे कमवायचे, यात मी एक्स्पर्ट झालो. कासिमच्या कुटुंबासाठी थोडेसे पैसे सहजपणे मिळवून द्यावेत, असा विचार केला. मला माहीत होते की, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला की मुंबईचे लोक पाच-दहा लाख रुपयांची कॅन्डल तरी जाळतीलच. आणि त्यातून कासिमच्या भावाला पैसा मिळेल. अपने जेबसे कुछ नहीं जायेगा.’’
‘‘पाच- दस लाख? हुजूर, कासिमच्या भावाला दहा लाख रुपये देऊनही मी साठ लाख परत घेऊन आलोय.’’
‘‘साठ लाख रुपये?’’ भाईच्या डोळ्यांत एक आश्चर्याचा व एका क्षणासाठी हावरटपणाचा भाव चमकला.
‘‘हुजूर, हे तर काहीच नाही. येताना मी धंदा रशीदच्या ताब्यात दिला, पण त्याच दिवशी एक एजंट मला भेटायला आला होता. तो म्हणत होता की, आता २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात मेलेल्या लोकांचा १२ वा दिवस येणार आहे. त्या दिवशी परत लोक लाखो मेणबत्त्या जाळतील. त्यानंतर परत या घटनेला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल लोक लाखो मेणबत्त्या जाळतील. त्याशिवाय त्याच दिवशी ख्रिसमसचा सण आहे. नंतर नव्या वर्षांच्या आगमनाच्या दिवशीही लोक लाखो मेणबत्त्या जाळतील. चलो, अच्छा हुआ भाई, आता कासिमचा भाऊ थोडय़ात दिवसांत करोडपती होणार..’’ याकूब बोलत राहिला.. पण भाई विचारांत हरवलेला दिसला.
‘‘भाई, भाईऽऽ’’ त्याला भानावर आणत याकूब म्हणाला, ‘‘ती नेत्याला चिथवण्याची आयडिया मस्त होती. पण त्या राज ठाकरेंच्या छेडखानीचं काय?’’
‘‘त्यामुळे मुंबईत आतल्या आत दंगे उसळतील असे वाटले होते. एका चॅनेलने ते प्रकरण भडकवलेही होते. परंतु पाहिजे तसा परिणाम झाला नाही. पण एका गोष्टीची खात्री झाली की, काही मूर्ख व उतावळ्या टीव्ही चॅनेलवाल्यांना व नेत्यांना हाताशी धरले तर हिंदुस्थानात काहीही करता येते.’’
‘‘भाई, तुम्हाला काय वाटतं? रशीद एवढा व्याप, एवढा धंदा चालवू शकेल?’’
‘‘चालवेल, चालवेल. तू आता रशीदला नक्की काय सांगितलंस?’’
‘‘तुम्ही जसे सांगितले तसेच सांगितले. कासिम भाईकडे काम करत असताना जमा करत असलेल्या पैशांतून कासिमने हा व्यवसाय सुरू करायचे ठरवले होते. पण हे काम अर्धवट झाले असतानाच तो अल्लाला प्यारा झाला. त्याच्या इच्छेनुसार हा कारखाना आता भाईने तुझ्या हातात सुपूर्द करायला सांगितले आहे. सध्यातरी तू अम्मीला काही सांगू नकोस. कारण तिला ते आवडणार नाही. योग्य वेळ आल्यावर काही दिवसांनी तिला सांग.’’
‘‘बरं, पण तो एजंट तुला म्हणाला होता की, एवढी मागणी वाढेल, ते खरं आहे?’’
‘‘भाई, आता ही मागणी आणि ख्रिसमसचा सण एकत्र येत आहेत..’’ याकूब बोलत राहिला. पण भाईचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तो पुन्हा एकदा विचारांत बुडून गेला होता.

५ डिसेंबर २००८
कराचीहून भेंडीबाजारच्या त्या छोटेखानी घरात मोबाईलचा कॉल जोडला गेला. मोबाईल वाजताच तौकिफने हॅण्डसेट उचलून त्यावरचा अनोळखी नंबर पाहून तसाच वाजू दिला. एकदा पूर्ण वाजलेली रिंग दुसऱ्यांदा वाजू लागली. शेवटी खूप वेळ वाजून झाल्यावर तौकिफने बटन दाबून हॅण्डसेट कानाला लावला. ‘‘सलाम वालेकुम.. तौकिफ!’’ खूप दिवसांनी भाईचा आवाज ऐकून तौकिफ धडपडत उठला.
‘‘वालेकुम सऽलाम!’’
एकेकाळी भाई मुंबईत असताना रोज सकाळी भाई त्याला बोलावून घ्यायचा. तौकिफ भाईच्या अतिशय विश्वासातील सहकारी होता. परंतु किडनीच्या आजाराने त्याला प्रदीर्घ काळासाठी नुसतं अंथरुणालाच खिळवलं नाही, तर गुन्हेगारी जगतातूनही बाद केलं होतं. कधीतरी एखादे मोठे काम करून काही काळ स्वस्थ बसायचे, असा त्याचा आयुष्यक्रम होता. गुन्हेगारी जगतात त्याला आता लोक फारसे ओळखत नव्हते.
‘‘तौकिफ, एक महत्त्वाचे काम आहे.’’
‘‘भाई, पण त्यासाठी मीच कशाला?’’ तौकिफने मनातील शंका बोलून दाखवली. असली कामं भाई कराचीत बसूनही मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बेमालूम उरकून टाकू शकतो. गुन्हेगारी जगताशी आता कमी संबंध असला तरी तौकिफला हे खात्रीने माहिती होते.
‘‘काम तसेच आहे. मला माझ्या आताच्या कोणत्याही माणसाला हे कळू द्यायचे नाही.’’
‘‘भाई, काम सांगा.’’
‘‘आपला पूर्वीचा साथीदार कासिम तुला माहीत आहेच. त्याचा रशीद नावाचा एक भाऊ मुंबईत आहे. तो पोलिसांचा खबऱ्या बनला आहे. दोन दिवसांत त्याला उडवायचा. या कानाचे त्या कानाला कळता कामा नये.’’

७ डिसेंबर २००८
याकूब अक्षरश: धापा टाकीत त्या आलिशान दिवाणखान्यात शिरला व पुरेसा श्वास न घेताच म्हणाला, ‘‘भाई, एक बुरी खबर! कासिमचा भाऊ रशीद काल माहीमला रेल्वे फाटक क्रॉस करताना ठार झाला.’’
‘‘कम्बख्त! कभी तो अच्छी खबर लेके आ!’’ एक-दोन मिनिटे मौन राहून भाई म्हणाला, ‘‘कासिमच्या आईला काहीही त्रास होता कामा नये. एखाद्या मौलवीतर्फे दर महिन्याला तिला मदत होईल अशी व्यवस्था कर. आणि हो, तो मेणबत्त्यांचा कारखाना आपल्या ताब्यात घे. प्रॉडक्शन थांबता कामा नये.’’
महेश राव