Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

सन्स ऑफ इंडिया
त्या दोघांमधला एक होता आधुनिक भारताचा शिल्पकार, तर दुसरा होता आधुनिक हिंदी सिनेमाचा प्रणेता! स्वातंत्र्य चळवळीतला अग्रणी नेता आणि स्वातंत्र्यानंतर देशाची धुरा समर्थपणे हाताळणारा सर्वमान्य नेता ही जवाहरलाल नेहरूंची प्रतिमा, तर व्यावसायिक चौकटीत भव्यदिव्य तरीही मूल्यप्रधान चित्रपट बनवणारा निर्माता-दिग्दर्शक ही मेहबूब खानची ओळख! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साऱ्या देशानंच जणू कात टाकली, त्याला हिंदी सिनेमा तरी कसा अपवाद असणार? १९४९ सालच्या ‘अंदाज’मधून मेहबूब खाननं हिंदी चित्रपटाला एक आधुनिक बाज दिला. ही आधुनिकता केवळ नायक-नायिकेच्या वेशभूषेपुरती नव्हती, तर एकूण चित्रचौकटीच्या मांडणीची होती. हिंदी सिनेमाचा साठ वर्षांपूर्वीचा काळ आठवला म्हणजे मेहबूबनं त्या काळी दिलेली दिशा केवढी प्रागतिक होती हे लक्षात येतं.
 

गुजरातच्या बिलिमोरा या गावात जन्मलेल्या मेहबूब खान रमजान खान याला बनायचं होतं फिल्मस्टार. पण ‘खुदा’ला ते ‘मंजूर’ नसावं. काही फुटकळ भूमिका केल्यानंतर तो झाला दिग्दर्शक. पुढे बनला निर्माता आणि नंतर झाला एका मोठय़ा स्टुडिओचा मालक! (त्याच्या चित्रपटाची सुरुवात व्हायची ती ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरे खुदा होता है’ या धीरगंभीर आवाजातल्या वाक्यानं!) ‘मनमोहन’, ‘जागिरदार’, ‘एक ही रास्ता’, ‘औरत’, ‘रोटी’, ‘अनमोल घडी’, ‘अनोखी अदा’ अशी त्याच्या यशाची चढती कमान राहिली. त्यानंतरच्या ‘अंदाज’नं त्याला पैशाबरोबर प्रतिष्ठाही दिली. ‘आन’, ‘अमर’ या चित्रांनी त्याचा दबदबा आणखी वाढला आणि ‘मदर इंडिया’नं तर त्या साऱ्यावर कळस चढवला.
एकेकाळी कम्युनिस्टांशी जवळीक असलेल्या मेहबूब खानची नेहरूंवर एवढी श्रद्धा बसली, की नेहरूंवर विखारी टीका करणाऱ्या कम्युनिस्टांशी त्यानं संबंध तोडले. (मेहबूब प्रॉडक्शनच्या बोधचिन्हातला ‘विळा हातोडा’ मात्र त्यानं कायम ठेवला.) त्या काळात नेहरू हे अनेकांचे श्रद्धास्थान होते. मेहबूबही त्याला अपवाद नव्हता. सोबतच्या छायाचित्रात दिसणारा, या दोघांना एकत्र आणणारा हा प्रसंग होता, १९६२ च्या अखेरीस नेहरूंसाठी आयोजित केलेल्या ‘सन ऑफ इंडिया’च्या खास खेळाचा!
‘मदर इंडिया’च्या अमाप यशानंतर मेहबूबचं लक्ष खरं तर ‘ताजमहल’ या भव्यदिव्य निर्मितीकडे लागलं होतं. तांत्रिक जुळवाजुळव व्हायला बराच काळ लागणार असल्यानं मधल्या काळात एक झटपट निर्मिती (क्विकी) म्हणून त्यानं ‘सन ऑफ इंडिया’ हाती घेतला. ‘मदर इंडिया’मध्ये भाव खाऊन गेलेल्या साजिद या बालनटावर निपुत्रिक मेहबूबचं एवढं प्रेम जडलं, की त्यानं त्याला दत्तक घेतलं. याच साजिदला केंद्रस्थानी ठेवून ‘सन ऑफ इंडिया’ची कथा बेतण्यात आली. सिनेमास्कोप व टेक्निकलर चित्रणामुळे बघता बघता चित्रपट बिग बजेट झाला. मात्र, कमालीचं ढिसाळ लेखन, दिग्दर्शकानं वेळोवेळी घुसडलेले अनावश्यक प्रसंग आणि फाजील आत्मविश्वास यातून हा चित्रपट फसला.
१९५९ साली फिल्म प्रोडय़ुसर्स गिल्डचा अध्यक्ष बनल्यानंतर मेहबूबनं सैनिक कल्याण निधीला भरपूर देणग्या मिळवून दिल्या. एवढंच काय, ‘सन ऑफ इंडिया’चे ठिकठिकाणी प्रीमिअर शो आयोजित करून त्याद्वारे मिळालेलं सर्व उत्पन्न त्यानं सैनिक कल्याण निधीला दिलं. याच चित्रपटाचा एक खास खेळ त्यानं पंडित नेहरूंसाठी दिल्लीमध्ये आयोजित केला होता. नेहरूंनी पूर्ण वेळ थांबून हा चित्रपट बघितला. पंडितजींच्या उपस्थितीनं मेहबूब केवढा भारावून गेला होता हे दाखवायला या फोटोतले त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुरेसे ठरावेत.
नेहरूंच्या निधनानंतर काही तासांतच मेहबूबनंही जगाचा निरोप घेतला हे आता एखाद्या फिल्मी योगायोगासारखं वाटू शकेल. पण तसं घडलं! २७ मे १९६४ रोजी नेहरू गेले. आधीच प्रकृतीच्या कुरबुरींनी खंगलेल्या मेहबूबनं हताशपणे ‘हम यतीम हो गये’ असे उद्गार काढले. दुसऱ्याच दिवशी (२८ मे १९६४) त्यानं मृत्यूला कवटाळलं. मेहबूबचं वय तेव्हा होतं फक्त ५७ र्वष! अखेर, वही होता है जो मंजुरे खुदा होता है!
सुनील देशपांडे
sunildeshpa@yahoo.co.in