Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

वाद-चर्चा

त्यासाठी ज्योतिषांची गरज काय?
‘लोकरंग’मध्ये (३ मे)‘कुंडलीतील राजयोग’ या अंतर्गत राजकीय भविष्य वर्तविणारे लेख वाचून गंमत वाटली. आपणही हे लेख गंमत म्हणून छापल्याचे लिहिले आहे. खरे तर नियमितपणे वृत्तपत्रे वाचणारी आणि राजकारणाचे थोडेबहुत ज्ञान असणारी कुठलीही व्यक्ती असे आडाखे बांधू शकते. त्यासाठी कुंडली मांडण्याची काहीच गरज नाही. निकालानंतर या भविष्याची गणिते १०० टक्के कशी चुकली आणि फजिती झाली तेही सर्वानी पाहिलेच.
- सुधाकर डोईफोडे, नांदेड.

‘तें’ ना उचित श्रद्धांजली
सचिन कुंडलकर यांचा ‘मोनोलॉग’ (१७ मे) वाचला . हा लेख वाचताना ‘च्युसडेस विथ मॉरी’ या पुस्तकाची आठवण झाली. एका प्रतिभावंत साहित्यिकाच्या आयुष्याच्या संध्याकाळचे अतिशय भावगर्भ आणि अस्वस्थ करणारे, तरीही आत्मिक समाधान देणारे दर्शन घडविल्याबद्दल सचीन कुंडलकर यांचे मन:पूर्वक आभार! मराठी साहित्यात अशा प्रकारचे लेखन विरळाच. त्यांनी या विषयावर अवश्य पुस्तक लिहावे. साहित्यातच नव्हे, तर एकूण समाज जीवनात अप्रामाणिकपणा वाढीस लागला आहे. अशा वेळी उमदा व आश्वासक तरुण लेखक आपल्या अवडत्या साहित्यिकाच्या जीवनाच्या शेवटच्या

 

आणि दु:खद काळात भक्तीने आणि निष्ठेने त्यांना साथ देतो, हे पाहून माणसावरील श्रद्धा वाढीस लागते. मनात प्रश्न पडतो, ‘हा चांगुलपणा येतो कुठून?’ कुंडलकरांच्या पितृभक्तीला सलाम.
‘तें’ विषयी नेहमीच मनात एक विचार चमकून जातो. त्यांनी इंग्रजी लेखन केलं असतं, तर त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असते ही गोष्ट निराळी आहे; परंतु एका मराठी प्रतिभावंताचे जगाला दर्शन झाले असते. हा लेख प्रसिद्ध करून ‘तें’ ना उचित श्रद्धांजली वाहिली आहे.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, वसई.

स्विस बॅंकेची सुरस कथा
लोकरंगमधील (१२ एप्रिल) ‘स्विस बॅंकेची भाकडकथा’ हा अरविंद गोखले यांचा माहितीपूर्ण लेख खूप आवडला. लेखाची सुरूवातही मनोरंजक आहे. या लेखातील माहिती वाचून ती एका सुरस कथेप्रमाणेच भासली. सामान्य वाचकांना स्विस बॅंकेबद्दल माहिती दिल्याबद्दल लेखकाचे आभार!
- मधुकर भिडे, पुणे.

ठाले-पाटलांची भूमिका खोटारडेपणाची!
महाबळेश्वर साहित्य संमेलनासंदर्भातील (१० मे) म. द. हातकणंगलेकर, सुनील मेहता आणि प्रवीण दवणे यांचे लेख वाचले. ठाले पाटलांनी ३ मेच्या अंकात स्वत:चेच ‘कौतिक’ केले आहे. त्यावर या तिघांचे लेख समर्पक वाटले.
अध्यक्षाविना संमेलन हे अमंगल, अभद्र वगैरे ठरावे, असे प्रवीण दवणेंना वाटते. त्यातील अतिशयोक्ती जरी बाजूला ठेवली तरी वस्तुस्थिती पाहण्यासारखीच आहे. ‘नवे अध्यक्ष नसतील तर महामंडळाचे अध्यक्ष हे अध्यक्ष होतात, असा नियम आहे का?’ हा हातकणंगलेकरांचा सवाल बिनतोड आहे. नवीन अध्यक्ष नसेल तर जुन्या अध्यक्षानेच पदभार सांभाळायला हवा, ही त्यांची अप्रत्यक्ष सूचना रास्तच वाटते. माजी साहित्य संमेलनाध्यक्षांचा फोटो साहित्य परिषदेकडे असावा, ही सुनील मेहता यांची सूचनाही महत्त्वाची आहे.
आनंद रणदिवे, नवी मुंबई.