Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

कलंदर बालसाहित्यिक
बालसाहित्यिक भा. रा. भागवत यांची जन्मशताब्दी आजपासून सुरू होत आहे. मूल होऊन बालविश्वात सहजगत्या रमणारे भागवत हे एक कलंदर व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या साहित्य-संसाराचा हा आठवणीवजा प्रवास-
थोर बालसाहित्यकार भा. रा. भागवत यांची ‘जन्मशताब्दी’ हा शब्द ऐकून एकदम धक्का बसला. त्यांचं वय असं कधी जाणवलच नव्हतं. ३१ मे २००९ या दिवशी ते असते तर ९९ वर्षांचे झाले असते आणि त्यांनी शंभरी गाठली असती! आत्ता आत्ता तर ते होते असंही वाटून गेलं. मुलं आणि पुस्तकं या दोन गोष्टींवर या माणसानं आयुष्यभर प्रेम केलं, सतत साठ वर्ष ते लिहित होते. लिहिण्याचा कधी त्यांना कंटाळा नसे. लीलाताईंना त्यांच्या पत्नींना त्यांच्यातलं हे लेखकपण जपलं पाहिजे याची जाणही होती आणि मनाचा मोठेपणाही. त्या दादांचं वर्णन करतात- कलंदर, प्रेमळ, हळुवार या शब्दांनी. ते मनस्वी होते त्यामुळे कुठल्याच नोकरीच्या
 

बंधनात अडकायचे नाहीत. मग लीलाताई त्यांना नोकरीचा आग्रह करायच्या नाहीत आणि स्वत: तीन तीन नोकऱ्या करत संसार सांभाळायची कसरत करायच्या.
विसरभोळे दादा खोबरं कोथिंबीर आणायला बाहेर पडायचे ते तास दीड तासानं जुने एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे २४ जाडजूड खंड घेऊन परतायचे. घर कायम पुस्तकांनी भरलेलं असायचं, छोटय़ा रविला घेऊन जायचे आणि त्याला कधी छापखान्यात, कधी पुस्तकांच्या दुकानात विसरून परत यायचे. गावाला जाताना भरपूर कपडे बॅगेत घेऊन निघायचं आणि ती रिक्षात विसरायची हेही नेहमीचंच.
ही भागवत मंडळी आपली तत्त्व आणि विचार प्रत्यक्ष वागणुकीत आणणारी पण मतं दुसऱ्यांवर न लादणारी होती. दादांचे आजोबा राजारामशास्त्री प्रसिद्ध समाजसुधारक. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे, तत्त्वनिष्ठ आणि आग्रही होते. १८९६ सालची गोष्ट. त्यांनी दादांच्या वडलांसाठी साडेअकरा वर्षांची मुलगी पाहून पसंत केली आणि सांगितलं, की हिला चांगलं मराठी, कामचलाऊ इंग्रजी आणि लग्नाचे विधी समजण्याइतकं संस्कृत शिकवा. मगच लग्न होईल. ते मधेमधे जाऊन भावी सुनेची चाचणी परीक्षा घेत. तिच्यासाठी त्यांनी ‘रेवतीचे पहिले संस्कृत पुस्तक’ स्वत: लिहून छापून दिलं आणि ठरल्यानंतर अडीच वर्षांनी हे लग्न झालं. ज्याचं लग्न व्हायचं त्याला हे माहीतच नाही. त्याला पत्र पाठवलं की ‘‘२३ मे रोजी तुझा साताऱ्यास विवाह आहे. त्यासाठी ये’’ कर्ते सुधारक म्हणावेत असे हे लोक. देवपूजा करणार नाहीत पण माणुसकी विसरणार नाहीत.
वडील इंग्रजांच्या काळात सरकारी शाळेचे मुख्याध्यापक. घरी अनेक इंग्रजी नियतकालिकं येत. ती वाचत असताना सहावीत दादांनी एका कादंबरीचा अनुवाद केला होता.
१९४० या वर्षी दादांचं आणि लीलाताईचं लग्न झालं. ते ठरलं तेव्हाची हकीगतही गमतीशीरच. बाळमामा लीलाताईंच्या नात्यातले. त्यांनी स्थळ सुचवलं आणि मुलाशी ओळख करून घ्यायला ये, असं सांगितलं. लीलाताईंना दाखवून घेणं मान्य नव्हतं. त्या त्यांच्याकडे गेल्या तेव्हा मुलगा दिसेना. बाळमामा म्हणाले वर जा आणि त्याच्याशी ओळख करून घे. त्या वर गेल्या तर मुलगा पेपर वाचत बसलेला. बराच वेळ गेला. पेपर काही बाजूला होईना मग त्या म्हणाल्या, ‘‘अहो, मी..’’ तेव्हा त्यांनी पाहिलं मग स्वत:ची ओळख करून दिली आणि लग्न ठरलं. लग्न ठरलं तेही मुलाकडून अशा अटीवर की देणं, घेणं काही नाही. अवास्तव खर्च, बडेजाव करायचा नाही.
लग्न झालं साधेपणानी. गंमत अशी झाली की लहान मुलांची पंगत आधी उठली. नवरा नवरींना पुढच्या पंगतीला वाढायचं तर नवरदेवांचा पत्ताच नाही. शोधाशोध सुरू झाली तेव्हा कळलं की नवरदेव मुलांच्याच पगंतीला जेवले आणि आता घरी जाऊन झोपतो, असं एका मुलाला सांगून घरी गेलेसुद्धा. मुलांबरोबर जेवण्याच्या नादात आपण नवरदेव आहोत हे विसरून गेले.
लग्न झाल्यावर नोकरीची शोधाशोध करताना दिल्लीला त्यांना मराठी वृत्तनिवेदक म्हणून आकाशवाणीवर नोकरी मिळाली. वर्ष -दीड वर्ष गेलं आणि १९४२ च्या चळवळीचे वारे जोरदार वाहू लागले. अनेक ठिकाणी सभा, मग अश्रुधूर, लाठीमार, गोळीबार अशी तीव्रता वाढत होती. ‘करेंगे या मरेंगे’ हा विद्रोहाचा नारा घुमू लागला. दादांचं नोकरीत लक्ष लागेना. एक दिवस रजेचा अर्ज देऊन ते परस्पर मुंबईला निघून गेले. मुंबईला जाऊन त्यांनी तडकाफडकी नोकरीचा राजीनामाच दिला आणि राजीनाम्याचं कारण ‘स्वातंत्र्यलढय़ात भाग घेण्यासाठी’ असं लिहिलं. त्यामुळे ते राजद्रोही ठरले. इकडे लीलाताईंना कळेना काय झालं ते. राजीनामा ऑफिसला पोचला आणि लगेच पोलिसांनी लीलाताईंना घराबाहेर काढलं. मित्रमंडळींच्या मदतीनी त्या कशाबशा बुरखा पांघरून रेल्वेनी मुंबईला आल्या. तिथून पुण्याला.
त्यानंतर रविचा जन्म झाला. सर्वाना आनंद झाला पण ही बातमी कळली नाही फक्त दादांना कारण ते तेव्हा भूमिगत होते. नंतर त्यांना अटक झाल्याचं कळलं आणि अशीही बातमी कळली की सर्व कैद्यांना विसापूरच्या तुरुंगात नेताना गाडी पुणे स्टेशनवर अर्धा तास थांबणार आहे.
रविचा जन्म होऊन १८ दिवस झाले होते. लीलाताई स्टेशनवर गेल्या. दादांना शोधून काढलं. त्यांना मुलगा झाल्याची बातमी सांगितली. ते सुखरूप आहेत हे पाहिलं. एवढं त्यांना पुरेसं होतं. स्थानबद्धतेची मुदत वाढत गेली आणि शेवटी २२ महिन्यांनी सुटका झाली.
पुन्हा दोघांनी मुंबईत यायचं ठरवलं कारण दादांना नॅशनल इन्फर्मेशन अँड पब्लिकेशन या संस्थेत नोकरी मिळाली होती. तीदेखील सहा महिने टिकली नंतर ती कंपनीच बंद झाली. दादांनी खेळगडी मासिकाचं काम सुरू केलं पण इतरांच्या मनाप्रमाणे त्यांना संपादन करावं लागे त्यानं समाधान होईना. तीही नोकरी सोडली आणि मग लीलाताईंनी आणि दादांनी मिळून बालमित्र हे मुलांचं मासिक सुरू केलं. २६ जानेवारी १९५१ ला पहिला अंक छापून आला. बँकेत फक्त साडेतीनशे रुपये होते पण मोठं धाडस केलं होतं. वेळ आली तर दागिने मोडू पण हे दादांच्या आवडीचं काम चालू रहायला हवं असा लीलाताईंनी निर्धार केला. पहिला अंक आल्यावर दादांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला त्यांनी सगळं भरून पावलं.
तो काळ असा होता की मुलांची मासिकं फार नव्हती. वा. गो. आपटे यांचा ‘आनंद’ टिकून होता. मुलांसाठी मासिक विकत घेण्याची पालकांची मानसिकता नव्हती. मात्र मुलांची वाचनाची भूक किती मोठी आहे याचा प्रत्यय येत होता. ‘बालमित्र’ खरंच मुलांचा मित्र बनला. दादांच्या घरासमोरच दीनानाथ दलालांचा स्टुडिओ होता दादा तिथे पोचले. दलालांनी बालमित्रच्या मुखपृष्ठाची जबाबदारी घेतली. द. ग. गोडसे मोठे चित्रकार. त्यांना विचारायलाही संकोच वाटत होता पण तेही आनंदानं चित्रं काढून द्यायला तयार झाले. त्यांनी सुंदर चित्रं दिली. अनेक नामवंत लेखकांनी बालमित्रासाठी लेखन केलं मालतीबाई दांडेकर, देवदत्त टिळक, वि. स. खांडेकर, पिरोज आनंदकर, गो. नी. दांडेकर अशी कितीतरी नावं. मुलांचं मासिक कसं असावं याचा आदर्श म्हणजे बालमित्र.
‘बालमित्र’चे दिवस या कुटुंबाचे मंतरलेले दिवस होते. अंक होत आला की आजूबाजूची मुलं खेपा घालायला लागत आला का अंक? असं विचारत. अंकाचे गठ्ठे झाले की मी वेष्टणं गुंडाळणार, मी २५ तिकिटं चिकटवणार, मी घडय़ा घालणार अशी चढाओढ असायची. मुलं स्वत:चं साहित्य घेऊन येत. आता वाचा म्हणून काकांच्या मागे लागत. हा सगळा आनंदाचा सुवर्णकाळ होता. पण साडेसहा वर्षांनी मासिक बंद करावं लागलं कारण पैशांचं सोंग आणणं कठीण असतं. सगळीकडून मिळालेले पैसे घातले तरी नुकसानीचा आकडा वाढतच गेला. मुलांनाही वाईट वाटलं. ‘‘आता आम्ही वाचायचं काय?’’ असं ती विचारत होती.
बालमित्र बंद झाला तरी या दांपत्याचं लेखन मात्र चालूच राहिलं. लीलाताई गमतीनं म्हणत, ‘‘यांनी लग्न होईपर्यंत प्रेमकथा लिहिल्या. लग्नानंतर युद्धकथा लिहिल्या आणि शेवटी बालकथा.’’
खूप पूर्वी दादांनी विनोदी कथा प्रौढांसाठी लिहिल्या होत्या. राम कोलारकरांच्या विनोदी कथांच्या संग्रहात त्यांच्या वीस कथा आहेत. नंतर मात्र त्यांनी बालसाहित्याचं बोट धरलं. मराठी बालवाङ्मयाची त्यांनी निष्ठापूर्वक आणि योजनापूर्वक निर्मिती केली त्यात ते गढून गेले. बालासाहित्याबद्दल ते तन्मयतेने भान हरपून बोलत. लहान मुलांबद्दल त्याना विलक्षण आंतरिक जिव्हाळा होता.
दादांच्या अनुवादित आणि स्वतंत्र साहित्यसंपदा फार मोठी आहे. कथा, कादंबऱ्या, जवळजवळ २०० पुस्तकं त्यांनी लिहिली. ते लक्षावधी मुलांच्या लाडक्या फास्टर फेनेचे जनक होते. गेल्या तीन पिढय़ांसाठी त्यांनी त्यांचं साहित्य लिहिलं आहे. ज्यूल व्हर्न मराठीत आणून तर इंग्रजी न वाचणाऱ्यांवर त्यांनी मोठेच उपकार केले. ऑलिस इन वंडरलँडचं त्यांनी जाईची नवलकथा म्हणून सुरेख रुपांतर केलं. बिपिन बुकलवार हा त्यांचा आणखी एक नायक तो बुकलून काढणारा म्हणून नव्हे तर बुकलव्हर म्हणून बुकलवार. दादांना शब्दांचे सुंदर खेळ सुचत. त्यांनी भाषांतराचं इतकं वेड घेतलं होतं की रस्त्यानी जाताना दुकानातल्या पुस्तकांकडे ते पहात तेव्हा याचं भाषांतर करता येईल का असाच विचार करत. अलेक्झांडर ज्यूमा, एच. जी. वेल्स, व्हिक्टर ह्य़ूगो यांनाही त्यांनी मराठीत आणलं. त्यांचं मायापूरचे रंगेल राक्षस, झपाटलेला प्रवासी आठवणी आज साठीतली माणसं काढतात. लहानपणी वाचायच्या चित्रकथा हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी अनेक ‘अमर चित्रकथा’ लिहिल्या. साहस आणि विनोद हे त्यांच्या लेखनाचे स्थायीभाव होते.
दादांनी अक्षर वाङ्मयाचा ध्यास घेतला होता. बाल साहित्याबद्दलचे त्यांचे विचार स्पष्ट होते. ते म्हणायचे अंधश्रद्धेच्या कथा मुलांना सांगू नका. त्यांना विज्ञानाकडे वळवा. त्यांच्यातलं कुतूहल जागं करा. त्यांना साहसी करा.
स्वतंत्र पण दर्जा नसलेल्या पुस्तकापेक्षा उत्कृष्ट अनुवादित पुस्तक मोलाचं असतं. सामान्य मुलांच्या आयुष्यात जे घडू शकतं, जे तर्कसुसंगत असेल तेच मुलांना द्या. त्यांना धाडसी बनवा. भावुक नको.
दादांच्या मधलं मूळ कायम जागं असायचं. त्यामुळेच मुलं काय बोलतात, कोणते प्रश्न विचारतात, कशी बोलतात याचं निरीक्षण करण्यात त्यांना रस होता. त्यातून मुलांचं विश्व उलगडतं असं ते म्हणत. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला.
त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रसन्न होतं. मन ताजं टवटवीत होतं. त्यांचं कुतूहल, जिज्ञासा, विनोदबुद्धी जागी होती. ते खूप मनमोकळे, अतिशय उत्साही, लगबगीनं बोलणारे, मन:पूर्वक हसणारे होते. त्यांचा मिस्किलपणा, खोडकरपणा, निर्मळ निरागसपण, मुलांच्या तोडीचं होतं. मी भाराभर लिहितो असं ते स्वत:च्या नावावर कोटी करून म्हणत ‘भाराभर गवत’ असं त्यांच्या एका कथासंग्रहाचं नाव आहे.
केवळ लेखन करून हे दांपत्य थांबलं नाही. त्यांनी पुण्याला त्यांच्या घरात बालमित्र मध्ये बालवाचनालय चालवलं. मुक्तानंद बालोद्यान मंडळ दहा वर्ष चालवलं. मुलं सतत त्यांच्या अवती भवती किलबिलत होती. त्यांच्या कथा ऐकत होती. खजिन्याचा शोध खेळत होती. त्यांच्या नातवंडांनीही हे सुख भरभरून घेतलं.
बालसाहित्य लिहिणारी खूप मंडळी असतात पण अशी ध्यानी, मनी, स्वप्नी बालमय झालेली किती? दादांचं मोठेपण या एका गोष्टीत आहे.
शोभा भागवत