Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

संग्रहचित्र - तिसरं जग
वेगवेगळय़ा संस्कृती जन्माला येतात, रुजतात, फुलतात आणि काळाच्या ओघात नामशेषही होतात. शतकानुशतकांच्या या प्रवासात बुडालेल्या संस्कृतींचे अवशेषही गाडले जाऊन त्यावर नवे थर जमा होतात. पुन्हा कधीतरी शेकडो वर्षांनंतर एखादा अवशेष-संदर्भ हाती लागतो, सर्वेक्षण होते आणि मग उत्खननातून एक नवे जगच या दुनियेपुढे येते. कधीकाळी अंतर्धान पावलेली ही संस्कृती वर्तमानासाठी ‘तिसरे जग’ असते. कोल्हापूरजवळ ब्रह्मपुरी येथे १९४५ साली झालेल्या उत्खननात असेच एक नवे जग प्रकाशात आले आणि या संस्कृतीच्या धाग्यादोऱ्यांवरच निर्मिती झाली ती कोल्हापूरच्या टाऊन हॉलमधील संग्रहालयाची!
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली टाऊन हॉल ही इमारतच मुळी एक आकर्षक वास्तुरचना आहे. ‘नियोगथिक’ शैलीतील ही भव्य इमारत १८७२ ते ७६ या काळात प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुरचनाकार मेजर चार्ल्स मॅन्ट यांनी निर्माण केली. या
 

देखण्या वास्तूतच १९४९ पासून कोल्हापूरचे हे संग्रहालय पर्यटक, अभ्यासकांच्या दर्शनार्थ उभे आहे. खरे तर या संग्रहालयाची स्थापना ३० जानेवारी १९४६ची! सुरुवातीला शहरातील शनिवार पेठेत एका छोटय़ा इमारतीत असलेला हा उत्खननातील संसार पुढे जागा अपुरी पडू लागली, तसा ‘टाऊन हॉल’ उर्फ नगरमंदिरात स्थलांतरित झाला.
संग्रहालयाच्या दाराशीच युरोपियन बनावटीच्या दोन तोफा आहेत. यातील एका तोफेवर १६०९ हा सालदर्शक अंक आणि ग्रीकांची युद्धदेवता कोरलेली आहे. या तोफांची सलामी घ्यायची आणि आत शिरायचे.
सात दालनांचे हे संग्रहालय! बहुतांश पुरातत्त्व विषयावरची, प्राचीन कोल्हापूरचे दर्शन घडवणारी, पण या इतिहासालाच आता कलानगरी कोल्हापूरच्या चित्रकलेच्या दोन दालनांची जोड देण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहिमान, रावबहादूर धुरंधर, बाबूराव सडवेलकर, बाबूराव पेंटर, बाबा गजबर, रवींद्र मेस्त्री, माधव सातवळेकर आदी विभूतींच्या कलाकृतींमधून कोल्हापूरच उलगडत जाते. मध्ययुगीन-अर्वाचीन इतिहासाची दोन दालनेही इथे आहेत. एकामध्ये शस्त्रास्त्रांचा तळपता इतिहास आहे, तर अन्य एकात ऐतिहासिक कलाकुसरीच्या वस्तू आहेत. शस्त्रास्त्र विभागात ढाल-तलवारींपासून ते अगदी पहिल्या महायुद्धात वापरलेल्या मशिनगन्सपर्यंत अनेक प्रकारची हत्यारे समोर येतात. तर कलावस्तूंमध्ये मातीच्या भांडय़ांपासून ते हस्तिदंती शोभेच्या वस्तूंपर्यंत अनंत ‘गोष्टीवेल्हाळ’ आश्चर्ये पुढे येतात. पण या सर्व वस्तू अन्य संग्रहालयात दिसणाऱ्या. कोल्हापूरच्या या संग्रहालयाचा खरा जीव, चेहरा, ओळख ती मातीखालून वर आलेल्या या ‘तिसऱ्या जगा’तील वस्तूंमध्ये! ही सर्व दालने कधीकाळी हरवलेली संस्कृती-इतिहास सांगणाऱ्या खापरांपासून ते कोरीव शिल्पांपर्यंतच्या अनंत आकर्षणांनी भरलेली आणि भारलेली आहेत.
अगदी सुरुवातीला येतात ती खापरांची भांडी! त्यांचे रूपावशेष सांगू लागतात. सुरई, मोठे भांडे, तोटीचा तो जार, कुठे मद्याचे पेले आणि गोलाकार वाटय़ा! साधीच भाजलेल्या मातीची पण कोल्हापूरचा बावीसशे वर्षे जुना सातवाहनांचा इतिहास ही भांडी बोलू लागतात. काहींवर नक्षी, तर काहींवर चित्रकामदेखील केलेले!
कधीकाळच्या या नगरीच्या उत्खननात तत्कालीन घरांच्या भाजलेल्या मोठय़ा विटाही मिळाल्या. या घरांमध्ये वापरायची दगडी भांडीही मिळाली. शिवलिंग, मानवी आकृत्या, नाण्यांचे ठसे, एवढेच काय, चक्क अखंड दगडातून कोरलेली साखळीदेखील मिळाली. अद्भुतता हा वस्तुसंग्रहालयातील वस्तूंचा मूलभाव, तो अशा वस्तू पाहिल्या की जास्त जाणवतो.
या उत्खननात बाणांची टोके, विळा, खुरपे, कोयता, कुळवाचा फाळ आदी लोखंडी हत्यारेही मिळाली. त्यांचाही काळ असाच दोन हजार वर्षांपूर्वीचा! ‘कुठल्या काळात कुठली वस्तू’ या एकाच दिशेने संग्रहालयांचा अभ्यास करू लागलो तर अनेक विषय उलगडू लागतात.
या हत्यारांच्या बरोबरीनेच सातवाहनांपासून ते ब्रिटिशांपर्यंतच्या चलनांचा प्रवास सांगणारी अनंत नाणीही या वेगवेगळय़ा थरांत सापडली. या साऱ्याच वस्तू आज इथल्या दर्शनींमधून ‘दुर्मिळ’ होत डोकावत आहेत.
पुढच्या पंचरसी धातूच्या दालनातील वस्तू तर आणखी थक्क करणाऱ्या! अगदी मोठाली कढई, पातेली, घमेली, हंडय़ांपासून ते या धातूतून कधीकाळी शेकडो वर्षांपूर्वी ओतलेल्या मूर्तीपर्यंत! रथ, सिंह, हत्तीवरील स्वार, गरुडस्तंभ ही सातवाहनाकालीन प्राचीन शिल्पे, निरनिराळी भांडी, ताम्रपट अशी ही एकेक कलाकृती थक्क करत पुढे येऊ लागते. त्यांची मांडणीही आगळय़ा पद्धतीने केली आहे. साध्या भांडय़ांसाठी खास कृत्रिम प्रकाशयोजनेतून चुलीची निर्मिती करत त्यावर ती मांडली आहेत. महालक्ष्मी मंदिरात मिळालेली पितळेची महालक्ष्मी आणि भोवतीच्या चवरी वाहकसेविकांच्या सुघड मूर्तीही अशाच नव्या देवघरात सजलेल्या!
पण याहीपेक्षा या दालनाचे खरे महत्त्व ते इथे ठेवलेल्या ग्रीक-रोमन धातूशिल्पांमध्ये! ब्रह्मगिरीच्या या उत्खननात रोमनांचा तो जगप्रसिद्ध समुद्रदेव पोसिडॉनचा धातुपुतळा मिळाला. रोमनांची पदके, भांडी, ग्रीक शैलीतील शिल्पे मिळाली. या साऱ्या पुराव्यांनी कोल्हापूरच्या इतिहासाला शेकडो वर्षांची खोलीच नाही, तर रोम, ग्रीसपर्यंतची व्याप्तीही बहाल झाली. आधुनिकता, प्रगती ही चढत्या काळाशीच निगडीत असते हा आपला उगचच गैरसमज! तो खोटा ठरविणारा हा आणखीएक पुरावा. कधीकाळी बावीसशे वर्षांपूर्वीच करवीरवासियांचे त्या रोमन, ग्रीकांशी संबंध होते, हे सांगणाऱ्याच या वस्तू!
उत्खनन आणि सर्वेक्षणातून प्रकाशात आलेल्या या जगाचे, या संग्रहालयाचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्राचीन दुर्मिळ शैलशिल्पे! संग्रहालयाचा मध्यभाग हा या साऱ्या शैलकृतींनीच भरून गेला आहे. शिव, पार्वती, विष्णू, लक्ष्मी, गणेश, महिषासुरमर्दिनी, महाकाली या शिल्पांबरोबरच नटराज, नृसिंह, राम, श्रीकृष्ण, स्कंद, चंडिका, गजान्तलक्ष्मी, नारद, सूर्य आणि चक्क चंद्रमूर्तीचेही यामध्ये दर्शन घडते. बाराव्या शतकातील या शिल्पकृती कोल्हापूरच्या आसपासच मिळाल्या. चंद्रमूर्तीत गोलाकार चंद्रबिंबात या चंद्रदेवतेचे मुख कोरले आहे. भोवतीने त्याच्या त्या १६ कला कोरल्या असून, पायाशी पळणारे हरिण वाहन दाखवले आहे. मदनदेवतेची मूर्तीही अशीच वेगळी! मस्तकावर करंडमुकुट, तर शरीरावर हार, बंध, उत्तरीय, कंकण, कटिसूत्र हे अलंकार! डाव्या खांद्यावर नाजूक वेलींचा तो धनुष्य, तर दोन्ही हातांनी हळुवारपणे धरलेला बाण! श्रीयंत्र असलेले शिवलिंग, सूर्यदेवता, व्याल, नारद, जैन र्तीथकर, यक्ष-यक्षिणी याही सहसा अन्यत्र न दिसणाऱ्या या मूर्ती! या दालनातच सूरसुंदरीची अनंत रूपे पाहणाऱ्याला मोह पाडतात. नृत्यांगना, मृदुंगधारिणी, मुरलीवाली, झांजधारिणी अशा या सूरसुंदरी त्यांच्यातील सौंदर्याने ओसंडून वाहात असतात. कोल्हापूर जिल्हय़ातील बीड गावी मिळालेल्या एका शिल्पात तर स्त्रीचा फक्त एक डावा हातच दाखवला आहे. कुठलेसे तंतुवाद्य वाजवणाऱ्या हाताची बोटे आणि त्या नाजूक हातातून स्त्रीच्या सौंदर्याचे सारेच आविष्कार प्रगट होत असतात. हे सारे शिल्पवैभव कुठल्याशामंदिरासाठी निर्माण केलेले किंवा ते मंदिरच कालौघात नष्ट झालेले. विखुरलेले अवशेषांच्या संग्रहातूनच इथे हे शिल्पमंदिर तयार झाले आहे. या मंदिराच्या दाराशी दोन रेखीव गजशिल्पे विसावलीत. वसईतील मराठय़ांचा पराक्रम मिरवणारी एक पोर्तुगीज घंटाही इथे मिरवत आहे.
खापरांपासून ते या शैलशिल्पांपर्यंतचा हा प्रवास कोल्हापूरच्या ‘तिसऱ्या जगा’चेच दर्शन घडवते. कधीकाळी कुठल्या तरी दैनंदिन गरजेतून, राजाश्रयातून आणि सर्जनशील कलाकारांच्या हातातून निर्माण झालेली ही प्रत्येक वस्तू तिच्यातील उपयुक्तता, सौंदर्यकलेबरोबर त्या काळा-वेळाची संस्कृतीही सांगत असते. अनादी काळापासून आमच्याकडे या अशा संस्कृतीच्याही अनेक पिढय़ा नांदल्या. काळाच्या ओघात पुढे त्या नष्ट झाल्या. मातीच्या, पांढरीच्या टेकडय़ांमध्ये अंतर्धान पावल्या. इतिहास, पुरातत्त्व नावाची शास्त्रे या अशा बुडालेल्या ‘तिसऱ्या जगा’चा शोध घेत राहतात आणि त्यातूनच मग कोल्हापूरसारखी वस्तुसंग्रहालये दर्शनीय होतात.
(कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, टाऊन हॉल, कोल्हापूर. हे संग्रहालय सोमवार सोडून कार्यालयीन वेळेत अल्पदरात सर्वासाठी खुले आहे. संपर्क- अमृत पाटील, दूरध्वनी ०२३१-२५४०४८१).
अभिजित बेल्हेकर
abhibelhekar@gmail.com