Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

दोन फुल-एक हाफ
ढोलकीची कडकडीत थाप पडली. बाजाच्या पेटीनं सूर धरला आणि गुलबकावलीनं पदन्यास सुरू करून घुंगरांचा छमछम आवाज करताच पिटातून शिट्टय़ा पडल्या. शेले, पटके हवेत फेकले गेले. गुलबकावलीच्या डाव्या अंगाला लोडाला रेलून मोठे पाटील बसले होते मिशांना पीळ भरत.. आणि उजव्या अंगाला बिना मिशीचे धाकटे पाटील डोक्यांवरील केसांमधून ऐटदार बोटे फिरवीत बसले होते. पदन्यास थांबवून गुलबकावलीनं डावी-उजवीकडे वाकून लवून मुजरा केला आणि म्हणाली, ‘‘आता करू का सुरू?’’ तर नाच्या मध्येच पचकला, ‘‘आगं, कितीदा इचारशील, करू का सुरू, करू का सुरू? त्येंची कामं खोळंबली हैती. तू कर सुरू!’’ मग गुलबकावलीनं पुन्हा एकदा ढोलकीच्या कडकडीत तुकडय़ावर नजाकतीनं कंबर हलवली, अन् सुरू केलं-
 

नाकामंधी नथ घातली
बिलोर भरले हाती
तुमच्यावरल्या इष्कानं ही
भरून आली छाती
वाट पाहुनि समई निजली
जळून गेल्या वाती
जवळ घ्या ना, कुरवाळा ना
हात हातामधी घ्या ना
आन् राया मला
मराठी मते आणुनि द्या ना
सख्या मला
मराठी मते आणुनि द्या ना
दिलवरा मला
मराठी मते आणुनि द्या ना
मोठं पाटील मला
मराठी मते आणुनि द्या ना
धाकलं पाटील मला
मराठी मते आणुनि द्या ना..
सख्या (कोरस)- आवं मोठं पाटील, धाकटं पाटील
हिचं मनावरी घ्या ना.
आवं पाटील हिला
मराठी मते आणुनि द्या ना.
मोठे पाटील- आगं गुलबकावले, उशीर केलास जरासा तू. अशी आंघुळ घातली असती तुला मराठी मतांनी. कालपत्तूर माझ्या घरात पोत्यांनी व्हती मराठी मतं; पर चोरी झाली माझ्या घरात आन् लुटून नेली गंऽऽऽ. घात केला माझ्याच मान्सांनी!
धाकटे पाटील- गुलबकावले, मराठी मतं म्हंजी तुला काय झाडावरच्या चिंचा वाटल्या की काय? हाणला दगूड आन् पाडली मतं! त्येच्यासाठी कष्ट करावे लागतात. घरचा माल घरी शाबूत ऱ्हावा म्हणून ध्यान ठेवावं लागतं.. तू बोल पुढं..

गुलबकावली- तुमच्यासाठी शिनगार सारा
(तुमच्यासाठी! मोठं पाटील, तुमच्यासाठी!
आन् धाकटं पाटील तुमच्याबी साठी!)
तुमच्यासाठी शिनगार सारा
या देहाचा सुगंधी वारा
आभाळ भरलंय, पडतील गारा
लुटुनि घ्या हो, मुद्देमाल सारा
गार हाताला लागत न्हाई
जशी निसटते, अवखळ बाई
आन् गारांसाठी दोगे मिळुनि
एक भलामोठा फ्रीज घ्या ना..
राया मला
मराठी मते आणुनि द्या ना..
पाटील मला
मराठी मते आणुनि द्या ना..
सख्या- आवं पाटील हिला..
धाकटे पाटील- गुलबकावले, मला शानपणा शिकवू नगं! या गावचा सरपंच कोण, ते आता मी ठरवणार! या गावात कोण ऱ्हाणार आन् कोण न्हाय, ते मी ठरवणार! आन् तू मला सांगतेस दोगांनी मिळून फ्रीज घ्या? तुला नाचाया सांगितलं तर गुमान नाच!
मोठे पाटील- बंद कर तुझी ही बकबक आन् बंद कर तुझी ही पकपक! आगं गुलबकावले, तुला म्हणतोय मी- तुला! आन् गारांसाठी फ्रीज घ्याया कुणाला सांगतेस? मला काय गारा घालून पाणी पिण्याचा नाद न्हाय. ज्येंना हाय त्येंना सांग!
(तेवढय़ात एकच गलका, आरडाओरड सुरू होते. मुख्य पाटील काठी टेकत फडात येतात.)
नाच्या- धाकलं पाटील, मोठं पाटील, तुम्ही गप ऱ्हावा आन् पुढं गाणं ऐका आता बाईचं.. बाई कर सुरू!

(बाईनं खुर्चीत बसलेल्या मुख्य पाटलांना नमस्कार केला अन् सुरू केलं..)
सांगून सांगून बाई मी शिणले
ऐकून ऐकून बाई मी दमले
एकावरती एक हो इमले
आन् शब्दांचे हो पोकळ बंगले
भिंतींना ह्य़ा देण्या गिलावा
एकजुटीचं सिमिट आणा
आन् पाटील मला
मराठी मते आणूनि द्याना..
मुख्य पाटील- आता तूच राहिली व्हतीस सांगायची.. चाळीस र्वस मी सिमिटच थापतोय. लावलं की पडतं, लावलं की पडतं.. कायतरी पाण्यातच खराबी हाय.. झालं का नाचून? चल जा आता!