Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

टिकलीएवढे देश - अणुचाचण्यांचा देश
प्रत्येक देशाचं म्हणून जसं एक वैशिष्टय़ असतं, प्रत्येक देशाला जसा एक जागतिक संदर्भ असतो, तशीच प्रत्येक देशाची म्हणून एक खासियत असते. मग तो देश छोटा असो वा मोठा.. आकार हाच त्याच्या मोठेपणाचा एकमेव निकष नसतो, ऐतिहासिकता हेच त्याचं मूल्य नसतं, लष्करी बळ हेच त्याचं एकमेव सामथ्र्य नसतं, आणि भौगोलिक रचना हेच त्याच्या मोठेपणाला एकमेव कारणही नसतं. याला अपवाद अर्थातच कुणाचाही नसतो. अगदी मालदीव, मालावी, बहरीन किंवा सॅन मरिनोचासुद्धा. मग पश्चिम पॅसिफिक महासागरातील मायक्रोनेशियाचे द्वीपसमूह तरी त्याला अपवाद कसे असणार? मार्शल आयलंड्स हा अशा चार द्वीपसमूहांपैकी अगदी पूर्वेला असलेला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अधिपत्याखालचा जवळजवळ १२२५ प्रवाळी बेटांचा समूह.
हा द्वीपसमूह १३०० किलोमीटर लांबीच्या दोन समांतर रांगांमध्ये वसलेला आहे. होनोलुलूपासूनचं अंतर २,२०० मैल, तर टोकियोपासून २,६०० मैल. होनोलुलूहून विमानानं प्रवास केला तरी हे अंतर पाच तासांचं. या दोन्ही रांगा एकमेकांपासून २४०
 

किलोमीटर अंतरावर आहेत. तरीही सर्व बेटांचं मिळून बनणारं क्षेत्रफळ आहे जेमतेम १८१ चौरस किलोमीटर इतकंच. पण हे क्षेत्रफळ समुद्रसपाटीवरचं. समुद्रातलं त्यांचं विस्तार क्षेत्रफळ तब्बल साडेसात लाख चौरस मैलांचं. माजुरो ही त्याची राजधानी. साऱ्या देशाची मिळून लोकसंख्या जेमतेम साठ हजार. माजुरो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि क्वाजालेन विमानतळावर सेवा कॉन्टिनेन्टल मायक्रोनेशियाची. बाकीच्या २६ बेटांवर स्थानिक हवाईसेवा आहेतच. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे १२ वर्षे वयावरच्या प्रत्येकाला मार्शली बेटं सोडताना १५ डॉलरचा वास्तव्यकर द्यावाच लागतो. बेटा-बेटांवर फिरण्यासाठी बसेस, टॅक्सी आणि भाडय़ाच्या मोटारी मिळतात. या बेटावरून त्या बेटावर जाण्यासाठी १९ आसनी डॉर्निअर विमानंही मिळू शकतात.

मार्शल आयलंड्स हा तसा अगदी अलीकडे १९८६ साली स्वतंत्र झालेला देश. या देशाला प्राचीन इतिहास नाही. १५२९ मध्ये व्हान दे सालाझार आणि आल्व्हारो दे साआव्हेद्रा या स्पॅनिश दर्यावर्दीनी सर्वप्रथम शोधून काढलेली ही बेटं. त्यानंतरचा या बेटांविषयीचा महत्त्वाचा उल्लेख सापडतो तो एकदम १७८८ सालातला. गिल्बर्ट आणि मार्शल या ब्रिटिश नाविकांनी समन्वेषण करून या बेटांना नावे दिली त्याचा. त्यानंतरचे उल्लेख १८०३, १८१५, १८२३ सालचे.. क्रूझेन्श्टेर्न आणि ऑटो फोन कोटसेब् या रशियनांनी ही बेटं जागतिक नकाशावर आणल्याचा. १८८६ मध्ये स्पेनने या बेटांवर हक्क सांगितला आणि तो मान्यही झाला. १८९८ मध्ये स्पॅनिश-अमेरिकन युद्ध छेडलं गेलं. या युद्धानंतर स्पेननं ही बेटं जर्मनीला विकली. १९१४ च्या पहिल्या विश्वयुद्धात जपाननं ही बेटं जिंकली. १९१९-२० च्या राष्ट्रसंघाच्या महादेशानं त्याला मान्यताही मिळाली. पण दुसरं महायुद्ध पेटताच क्वाजालेन, एनिवेटॉक या बेटांवर घनघोर लढाई झाली. त्याची तितकीच तीव्र प्रतिक्रियाही उमटली. १९४७ मध्ये ही बेटं संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून अमेरिकेच्या ताब्याखाली आली. पण १९७८ मध्ये मार्शली लोकांनी अमेरिकेशी मुक्त आर्थिक संबंध ठेवणाऱ्या मायक्रोनेशियन संघराज्याचा सभासद होण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. १९८० साली या तणावपूर्ण संबंधांमध्ये थोडं शैथिल्य आलं. सैनिकी हक्क, संरक्षण व सुरक्षा याबाबतचा अमेरिकेचा हक्क मान्य करीत मार्शलींनी मेअरिअॅना द्वीपसमूहातील सायपान येथील आयोगाची प्रशासनसूत्रं स्वीकारली; पण तीही जेमतेम पाच-सहा र्वषच टिकली. २१ ऑक्टोबर १९८६ ला विश्वस्त प्रदेश म्हणून अमेरिकेचा दावा मान्य करीत मार्शलींनी संपूर्ण सार्वभौम स्वातंत्र्य पत्करलं. मार्शल बेटं प्रजासत्ताक बनली. संसदीय-अध्यक्षीय अशी मिश्र राज्यव्यवस्था मार्शलींनी स्वीकारली. द्विसदनी सभागृह अस्तित्वात आलं. ‘नितिजेला’ हे खालच्या सभागृहाचं नाव, तर ‘कौन्सिल ऑफ आयरॉइज’ हे वरच्या सभागृहाचं नाव.
मार्शली बेटं विभागली गेली आहेत २४ जिल्ह्यांमध्ये. हे २४ जिल्हे म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून मानवी वस्ती असलेली २४ महत्त्वाची बेटंच आहेत. या २४ बेटांमधून एकूण ३३ संसद सदस्य निवडले जातात, जे अंतिमत: राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. माजुरो आणि एबेयी बेटांवर अत्याधुनिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प आहेत. त्यातून ११० व्होल्ट्सची वीजनिर्मिती होते. बाकीच्या बेटांवर मात्र सोलर पॅनेल्स आणि लघुजन्नित्रांच्या साहाय्याने वीजनिर्मिती केली जाते. पर्यटनाच्या उद्देशानं मार्शली बेटांना भेट देऊ इच्छिणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की, वैध पासपोर्ट जवळ असेल तर तुम्ही ९० दिवस अगदी आरामात इथे राहू शकता. तिथं जाण्याआधी लसीकरण करून घेण्याची गरज नसतेच. पण तरीही जाणाऱ्यांनी बंद बाटल्यांमधलं मिनरल पाणी प्यावं, हे उत्तम. माजुरो आणि एबेये या बेटांवर तर ते सर्वत्र उपलब्ध असतंच.

अमेरिकेनं तिथे शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण मार्शली लोकांना मुळातच अमेरिकेचा कारभार पसंत नव्हता. अमेरिकेचा अमल सुरू होताच १९४६ मध्ये अमेरिकेनं बिकिनी आणि एनिवेटॉक बेटांवरील लोकांचं जबरदस्तीनं स्थलांतर घडवून आणण्याचा सपाटा लावला. नागासाकी-हिरोशिमा नुकतंच घडून गेलं होतं. जगाच्या पाठीवर लष्करी ताकद म्हणून उभं राहायचं असेल तर अण्वस्त्र चाचण्या केल्या पाहिजेत, रशियाचं अंतराळ संशोधन आपल्या स्वातंत्र्यावर घाला घालणारं ठरणार असेल तर आपणही अंतराळ संशोधन सुरू केलं पाहिजे, असं अमेरिकेला वाटू लागल्यामुळे अमेरिकेने जे अनेक उपक्रम हाती घेतले, त्यातलाच एक होता अणुचाचण्यांचा. बिकिनी आणि एनिवेटॉक बेटांवर अणुचाचण्या सुरू झाल्या. लोक बिथरले. त्यांनी अमेरिकेवर आर्थिक दुर्लक्षाचा, मानवी संहाराचा आरोप केला. अमेरिकेने पाच लक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई देऊन नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. क्वाजालेन बेटांवरील अणुचाचण्या तशाच सुरू राहिल्या.
अणुचाचण्यांचं हे पर्व खऱ्या अर्थानं सुरू झालं ते ३० जून १९४६ रोजी आणि संपलं ते १८ ऑगस्ट १९५८ रोजी. या १२ वर्षांत तब्बल ६७ अणुचाचण्या अमेरिकेनं घडवून आणल्या. त्यातल्या ४३ चाचण्या झाल्या एनेकवेटाक बेटावर, तर उरलेल्या २३ चाचण्या झाल्या त्या बिकिनी बेटावर. अवघी एकच चाचणी एनेकवेटाकपासून ८५ किलोमीटर अंतरावरील बेटावर झाली. पण या ६७ चाचण्यांमधील सर्वात शक्तिमान चाचणी होती, ती एक मार्च १९५४ ची.. बिकिनी बेटावर झालेली ‘ब्राव्हो’ची. त्या एका चाचणीतच १५ मेगाटन क्षमतेच्या स्फोटकांचा स्फोट घडवण्यात आला. एका हिरोशिमानं जेवढी उष्णता बाहेर फेकली, त्याच्या हजारपट इतकी या चाचणीची क्षमता होती. ‘ब्राव्हो’सारख्या आणखी १७ मोठय़ा चाचण्या अमेरिकेनं मार्शली बेटांवर घडवून आणल्या. एकूण ६७ चाचण्यांमधून १०८ मेगाटन क्षमतेची स्फोटकं फोडण्यात आली; ज्याची तीव्रता सात हजार हिरोशिमा बॉम्बएवढी भयानक होती.
फेब्रुवारी १९५४ मध्ये झालेल्या एका चाचणीची तीव्रता इतकी भयावह होती की, त्या स्फोटानं तीन बेटं पूर्णतया नाहीशी झाली आणि परिसरातील ५० हजार चौरस मैल क्षेत्रफळावर रेडिओअॅक्टिव्ह कचरा पसरला गेला. १९५८ नंतरही या चाचण्या सुरूच राहिल्या. पण या चाचण्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणहानी- विरोधातील स्वरांची दखल अमेरिकेला घ्यावीच लागली. १९५८ ते १९८८ या ३० वषार्ंत आणखी ८५० चाचण्या अमेरिकेनं केल्या. त्यातही मिळून आणखी १७४ मेगाटन क्षमतेची स्फोटकं फोडण्यात आली. अमेरिकेनं घडवून आणलेल्या एकूण अणुचाचण्यांपैकी अवघ्या १४ टक्के चाचण्याच मार्शली बेटांवर झाल्या, असं आकडेवारी दाखवत असली तरी झालेल्या पर्यावरणहानीपैकी ८० टक्के हानी एकटय़ा मार्शली बेटांवर झाली, ही वस्तुस्थिती आहे.
जून १९८३ मध्ये अखेरीस अमेरिका आणि मार्शली बेटं या दोन सरकारांमध्ये ‘कॉम्पॅक्ट ऑफ फ्री असोसिएशन’च्या आधारे नुकसानभरपाईसाठी बोलणी झाली. मार्शली बेटांवरील नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या जीवित-वित्तहानीची नोंद घेत अमेरिकेनं १५० दशलक्ष डॉलरची रक्कम मार्शली प्रशासनाला देऊ केली. त्यातून व वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यातून २७० दशलक्ष डॉलरचा एक स्थायी निधी उभा करायचा, ज्यातून पुढली १५ र्वष प्रतिवर्षी १८ दशलक्ष डॉलर व्याजरूपाने मार्शली नागरिकांना व सरकारली मिळत राहतील, अशी तरतूद करण्यात आली. १९८८ साली त्यासाठी ‘मार्शल आयलंड्स न्यूक्लिअर क्लेम्स ट्रायब्यूनल’ स्थापन करण्यात आलं. बिकिनी, एनेवेटाक, रॉँगेलॅप, यूट्रिक द्वीपिकांवरील नागरिकांना त्यातून आजपर्यंत सुमारे पावणेदोनशे दशलक्ष डॉलर्स देऊ करण्यात आले आहेत.
पण आजवर झालेल्या नुकसानीची भयावहता ध्यानी घेतली, तर देऊ करण्यात आलेली ही रक्कमही कितीतरी अपुरी असल्याचं सहज ध्यानात येतं.

मार्शली बेटांवर पर्यटकांना आकर्षित करू शकणारं असं फारसं काहीही राहिलेलं नाही, याचं मुख्य कारण हेच आहे. पर्यटन हा मार्शली बेटांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत नसला, तरीही आजदेखील इथे येणारे पर्यटक कमी नाहीत. स्फोटांमध्ये उद्ध्वस्त झालेली जहाजं, बोटी, नागरी जीवनातील असंख्य गोष्टी अजूनही सागराच्या तळाशी पडून आहेत. स्कूबा डायव्हिंगमध्ये रस असणारे पर्यटक सागरतळाशी जाऊन ते पाहण्याचा आनंद लुटू शकतात. बिकिनी बेटांवरून त्यासाठीच्या दैनंदिन सहली एप्रिलच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत निघतात. एका वेळी १२ जणांना त्यात सहभागी होता येतं. होनोलुलू ते माजुरो, माजुरो ते बिकिनी आणि वाटेत जॉन्स्टन बेटावर इंधनासाठी थांबा, असं या स्कूबा सहलींचं स्वरूप असतं.
मे ते नोव्हेंबर हा साधारणपणे पावसाळी मोसम. हा पट्टा वादळांचा नाही. त्यामुळे तसा धोका नसलेला हा भूभाग. पण उत्पन्नाची साधनं कमी असल्यानं आणि समुद्रसपाटीपासूनची बेटांची सरासरी उंची कमी असल्यानं जराशा भरतीनंही पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती असते. २१ मार्च २००७ मध्ये एकदा दुष्काळापायी, जुलै २००८ मध्ये ऊर्जाटंचाईमुळे, तर डिसेंबर २००८ मध्ये पुरापायी मार्शली सरकारला आणीबाणी घोषित करावी लागली होती. नारळ, टोमॅटो, कलिंगडं आणि ब्रेडफ्रूट ही पै-पैका देणारी पिकं. उद्योग असे नाहीतच. जे काही आहेत ते लघु. हस्तकला, मासेप्रक्रिया आणि खोबरेनिर्मितीचे. ऊर्जानिर्मिती केली जाते ती थोडय़ाफार प्रमाणात खोबरेल तेलाचा इंधन म्हणून वापर करूनच. शाळा सरकारच चालवतं. एक कॉलेज आणि एक विद्यापीठ मार्शली बेटांवर आहे.
मार्शली लोकांचा मूळ वंश मायक्रोनेशियन. हजारो वर्षांपूर्वी कधीतरी ही मंडळी आशिया खंडातून तिथे आली आणि तिथलीच झाली. बहुतांश मार्शली ख्रिश्चन- त्यातही प्रॉटेस्टंट. दोन-तृतीयांश लोकसंख्या माजुरो आणि एबेयी बेटांवरच राहते. अन्य बेटांवर तशा नोकरीच्या संधी नाहीत. विकासाची प्रक्रियाही फारशी सुरू झालेली नाही. इंग्रजी हीच व्यापक प्रमाणात बोलली जाणारी भाषा; पण सफाई मात्र आढळत नाही. सरकारी स्तरावर मार्शली हीच अधिकृत भाषा. काही भागात जपानीही बोलली जाते. मार्शली हे खरे पाहता उत्तम खलाशी. बोटी बनविण्यातही ते वाकबगार. ही कला त्यांना कुणी शिकवली, त्याचा उलगडा इतिहासात होत नाही, पण विशिष्ट प्रकारच्या काडय़ा वापरून दिशा शोधून काढण्याचं तंत्र त्यांनी अंगीकारलं आहे, हे खरं.
चिंतेचा विषय एकच : मार्शली बेटांवरचं कुष्ठरोगाचं भयावह प्रमाण. जगभरातला सर्वाधिक कुष्ठरुग्ण-दर मार्शली बेटांवर आढळतो, असं जागतिक आरोग्य संघटनाच सांगते. ही लागण व्हायला नेमकं कोण, कसं कारणीभूत झालं, त्याचा ढासळल्या पर्यावरणाशी संबंध आहे का, हे सारे चिंतेचे आणि शोधाचेच विषय.
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com