Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

पुस्तकाचे पान
गोष्टींविषयी ‘सबकुछ’ सांगणारं पुस्तक

‘गोष्ट सांगणे’ या विषयावर दोनशे पानांचे पुस्तक म्हटल्यावर गोष्ट सांगण्याविषयी एवढं काय सांगण्यासारखं आहे? असा प्रश्न पडेल. पण रेणू गावस्करांचं ‘गोष्टी जन्मांतरीच्या’ या पुस्तकाने हलक्याफुलक्या गोष्टीकडं ज्या गंभीरतेने आणि संवेदनशीलतेनं बघितलंय ते वाचल्यावर ‘गोष्ट’ या माध्यमाकडे आपण आजवर किती उथळपणे बघितलंय याची जाणीव होते आणि आपण पालक म्हणून आपल्या मुलाचं भावनिक कुपोषण केलं याची खंत पालक म्हणून वाटत राहते.. रेणू गावस्करांनी रिमांड होम, वेश्यावस्ती येथील एकाकी मुलांना २० पेक्षा जास्त वर्षे गोष्टी सांगितल्या आहेत. गोष्टी सांगताना त्यांनी मुलांशी संवाद साधलाय. मुलांचं भावविश्व उलगडून बघितलंय. विश्लेषण
 

केलंय. यातूनच हे पुस्तक सिद्ध झालंय. त्यामुळे या पुस्तकातील सर्व गोष्टींना वास्तवाची डूब आहे आणि अनुभूतीची किनार आहे. रेणूताईंनी बालपणापासून ऐकलेल्या गोष्टींनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी जगभरच्या विविध भाषांतील ज्या गोष्टी वाचल्या आहेत, त्या सर्व गोष्टींविषयी त्यांनी या पुस्तकात भाष्य केलं आहे. ‘गोष्ट म्हणजे आंघोळीसाठी तापवलेलं कढत पाणी..’ अशीच पुस्तकाची सुरुवात करून गोष्ट एखाद्याचं आयुष्य कसं बदलून टाकते या संदर्भात इसापची कहाणी सांगितली आहे. इसापचा उदय आणि जीवनांत गोष्टीनेच कसा घडवला याचे हृद्य वर्णन रेणूताई करतात.
त्यानंतर लहानपणी त्यांना त्यांच्या आजीनं सांगितलेल्या गोष्टींविषयी त्या बोलतात. ‘आजीच्या तोंडून त्या काळातल्या या गोष्टी ऐकताना मी वयानं मोठी होत होते. बालविवाह, अकाली वैधव्य, कमालीचं दारिद्रय़, त्यातून येणारी हलाखी हे सारं माझ्यापुढं उभं केलं जात होतं’, असं त्या सांगतात. गोष्ट सांगितल्यावर मुलांना विचारमंथनासाठी वेळ देणं आवश्यक असतं पण तेवढा धीर मोठय़ांना निघत नाही, असं नोंदवून गोष्ट सांगण्यापूर्वी मुलांचं निरीक्षण करणं महत्त्वाचं असतं हे अनुभवातून सांगतात व त्या आधारेच गोष्ट निवडावी, असा सल्ला देतात.
कुटुंबातील वारशातून आलेल्या ‘एकाकी राजकन्या’ व ‘जय तिलक’ या कथा त्या सांगतात. माता-पिता गमावलेल्या राजकन्येचा जीवनप्रवास आणि अंगावरील ठिपके मोजणाऱ्या चित्त्याचे भावविश्व यात मुले गुंगून जातात.
अद्भूत आणि वास्तवाचं जग गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतात. वास्तवाशी सामना करताना मुलाचं मूलपण अबाधित राहावं, असं वाटत असेल तर कथा- कहाण्यांतून जीवनाची अद्भूतता त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी, असं त्या ठामपणे सांगतात. ‘सुरंगनीची गोष्ट’ ही अत्यंत लोकप्रिय गोष्ट त्या गोष्टीतील अद्भूततेसह उलगडून दाखवतात. गालिच्यात गुप्त होणारी राजकन्या, तिचं गोष्ट ऐकून बाहेर येणं, गालिच्यातच संसार करणं हे सारं अद्भूत असतं. त्याच वेळी गालिच्याचं वर्णन करताना रेणूताई सारी प्रतिभा पणाला लावतात. गालिच्याची दुसरी ‘विंड कार्पेट’ ही कथा त्या सांगतात. आई गमावलेली मुलगी, मृत आईसाठी गालिचा आणायला निघालेले वडील, चित्रपटातील सौंदर्याच्या जागा हे सारच हलवून टाकणारं असतं.
बक्षीस आणि शिक्षा हे शिक्षणप्रक्रियेतील परवलीचे शब्द आहेत. अनेक शिक्षणतज्ज्ञ बक्षीस आणि शिक्षेच्या पलीकडं शिक्षणप्रक्रिया पाहिजे, असा सातत्याने आग्रह धरतात पण समाज व्यवस्थेतील मूल्ये शिक्षणात प्रतिबिंबित झाल्यामुळे बक्षीस आणि शिक्षेला प्रतिष्ठा असते. रेणूताई या विषयावर भाष्य करण्यासाठी त्या कथा सांगतात. त्यात अपंग मुलाला वरदान आणि शिक्षा करणाऱ्या पऱ्यांची गोष्ट त्या सांगतात. केवळ सुरेल गाणं म्हणता येत नाही, म्हणून एका मुलाला अपंगत्व देणाऱ्या पऱ्यांवर रेणूताई संतापतात. ‘गाणं न म्हणता येणं हा गुन्हा आहे का?’ असं कळवळून विचारतात.
‘चिल्ड्रेन फ्रॉम हेवन’ ही कथा हेलावून टाकते. बहिणीचे बूट हरवल्यावर एकच बुटाचा जोड वापरणारा भाऊ; तिला बूट मिळावेत म्हणून बूट बक्षीस असणाऱ्या स्पर्धेत भाग घेणारा भाऊ. हे सारं रेणूताई अतिशय उत्कटतेनं मांडतात.
परीकथा हा गोष्टींच्या विश्वातला महत्त्वाचा भाग आहे. परीकथा फक्त पुस्तकातच वाचायच्या पण आपल्या आजूबाजूलाही पऱ्या असतात. त्या पऱ्यांचे अस्तित्व जाणवत नसेल तर तो दोष त्या पऱ्यांचा नाही तर आपल्या संवेदनशीलतेचा आहे, असं सांगून त्या हेलन केलर आणि तिची गुरू अॅना यांच्या संबंधाविषयी लिहितात. सकीना या अंध मुलीचं भावविश्व उलगडून दाखवतात. परीकथेइतकीच मैत्री या संकल्पनेवरही त्या भाष्य करतात. मैत्री नेमकी कशाला म्हणायची? हे स्पष्ट करताना विविध कथांचे त्या दाखले देतात.
सत्य माणसाच्या गळी उतरावं म्हणून परीकथेला आपला अंगरखा सत्यला बहाल करावा लागला हे विसरता येत नाही, असं सांगून त्या स्टीफन स्वाइंगची ‘इनव्हिजिबल कलेक्शन’ ही कथा सांगतात. मन:स्वास्थ्य टिकवण्यासाठी खोटेपणा हाच कसा योग्य मार्ग त्या कथेत असतो हे अतिशय कलात्मकतेने मांडले गेले आहे.
देशोदेशीच्या लोककथा हा प्रत्येक देशातील एक समृद्ध वारसा आहे. या लोककथा मौखिक परंपरेने पोहोचत आल्या आहेत. या कथा त्या देशाच्या परंपरेचा परिचय करून देतात. रेणूताईंनी पुस्तकात ‘लोककथांचं जग’ असा एक स्वतंत्र विभागच केला आहे.
जपानी, चिनी, फ्रेंच, ब्रिटिश आणि जर्मनीतील लोककथांवर आधारित लेख आणि प्रत्यक्षातील त्या कथा वाचणं हे स्वत:ला समृद्ध करणं आहे. या लोककथांचा अर्थ कसा लावायला हवा? मुलांची गोष्टींचा अर्थ लावणारी प्रतिभा आणि त्याचे वास्तव जीवन यातील सहसंबंधही त्या स्पष्ट करतात. स्वप्न पाहणाऱ्या मुलांची गोष्ट सांगताना मुलांची कोणती स्वप्न आहेत याचा शोध घेताना दुसरं लग्न करून परदेशात गेलेल्या आईच्या मुलाला पायलट व्हावंसं वाटतं. यामागची त्या मुलाची आईला बघण्याची उत्कट इच्छा वाचकाला हेलावून टाकते.
पुराण किंवा धार्मिक वाङ्मयातील कथा या धार्मिक म्हणून दुर्लक्षिल्या जातात पण त्या कथांमधून त्या काळातल्या माणसांनी निसर्गाचा अर्थ लावण्याचा कसा प्रयत्न केला हे सूत्र त्या स्पष्ट करतात. ‘ग्रहण’ या वैज्ञानिक घटनेवरील लोककथा त्या सादर करतात.
भूताच्या कथा हा लहान मुलांसाठी एकाच वेळी घाबरवणारा आणि आकर्षण ठरणारा विषय. पण भूतकथांमधील ऑस्कर वाइल्डची कथा मुलांना भूताशी मैत्री करायला लावते. भूतालासुद्धा मुक्ती हवी असेल तर प्रेमाची गरज आहे, विशुद्ध हृदयाची गरज आहे आणि त्या हृदयातून निघणाऱ्या क्षमेच्या आश्वासनाची गरज आहे, असं त्या सांगतात.
कथाकथनाच्या व कथालेखनाच्या क्षेत्रात हॅन्री अॅण्डरसन हे महत्त्वाचे नाव. रेणूताई अॅण्डरसनच्या जीवनकथेपासून सुरुवात करून त्याची गाजलेली ‘मॅच-गर्ल’ ही कथा सांगतात. ‘मी छोटय़ा लोकांना गोष्ट सांगतो खरी, पण ती सांगताना त्या छोटय़ांचे आई-बाबा ती गोष्ट ऐकताहेत आणि आपण त्यांनीही विचार करायला काही द्यायला हवं याचा कधीच विसर पडत नाही’ हे अॅण्डरसनचं त्या मागचं सूत्र स्पष्ट करतात.
काही महत्त्वाचे मुद्दे व ते मुद्दे स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे म्हणून गोष्टी अशी पुस्तकाची रचना असल्याने हे केवळ काही गोष्टींचे संकलन झाले नाही. तर हे पुस्तक एकाच वेळी कथाविश्वाचे अंतरंग उलगडून दाखवणारे; त्यामागील भूमिका मांडणारे व तत्त्वज्ञान स्पष्ट करणारे झाले आहे.
गोष्टीमागील तत्त्वज्ञान व भूमिका कोणतीही तत्त्वज्ञानाची पोझ न घेता त्या सांगतात. गोष्टीचं वैशिष्टय़ असं की, श्रवणातून/ वाचनातून नेमकं काय रुजलं हे सांगता येणं कठीण असतं. परंतु गोष्ट एखाद्या बीजासारखीच सावकाशीनं पण निश्चितपणे रुजते. त्याचं कधी रोपटं होतं तर कधी वृक्ष! हे सांगून रवींद्रनाथ टागोरांचं बालपण, त्या बालपणात गोष्टींनी निभावलेली महत्त्वाची भूमिका, गोष्टींनी समृद्ध केलेलं त्यांचं जगणं आणि त्यातून घडलेला कलावंत हे सारं तपशीलवार सांगतात. त्यातून आपल्याला गोष्टीचं महत्त्व समजतं. टागोरांप्रमाणेच त्या सानेगुरुजींच्याही या क्षेत्रातील योगदानाविषयी लिहितात. ‘आर्या मोरोपंतांची’ या उक्तीप्रमाणे ‘गोष्ट साने गुरुजींची’ असं म्हणायला हवं असं गुरुजींचं योगदान त्या अधोरेखित करतात.
गोष्टी पूर्वी वैद्यकीय इलाज म्हणून वापरल्या जायच्या. गोष्ट ऐकणारा नुसतीच गोष्ट ऐकत नसतो, तर तो ती स्वत:ला सांगतो. इतरांना सांगतो. त्यावर विचार करतो. तर कधी कधी त्यातून एखादी नवीन गोष्ट निर्माण करतो. चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही मुलांना सांगायला हव्यात कारण बऱ्या वाईटाचे निकष कथांना लावण्याइतकं सक्षम करणं महत्त्वाचं असल्याचं त्या लक्षात आणून देतात.
एकूणच हे पुस्तक गोष्टी सांगणारं असलं तरी निव्वळ गोष्टींचा संग्रह नाही तर गोष्टींचे प्रकार, गोष्टींचे तत्त्वज्ञान, गोष्टींमागील प्रयोजन, भूमिका, गोष्टींचे मानसशास्त्रीय उपयोजन सांगणारं हे पुस्तक आहे. त्यातून विविध देशांमधील गोष्टींचा खजिना आपल्यापुढं उघडतो आणि त्याच वेळी गोष्टी का सांगायच्या? मुलांच्या विकासात गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हेही लक्षात येतं.
रेणूतरईची लेखनशैली हा स्वतंत्र कौतुकाचा विषय आहे. वाचताना जणू त्या आपल्यासमोर बोलत आहेत, असा भास होत राहतो. अनेक वर्षे गोष्टी सांगितल्यामुळे निवेदनातला प्रवाहीपणा, नेमकेपणा लेखनात अधिक जिवंत झालेला आहे.
पालक आणि शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं ते अशासाठी, की मुलांना समृद्ध करणं म्हणजे त्यांच्यावर वस्तूंचा आणि सुखाचा मारा करून त्यांना बोथट करणं नव्हे; तर त्यांचे हातात हात घेऊन मानव जातीच्या या गोष्टीरूप खजिन्यातून फेरफटका मारणं आहे. ‘गोष्टी जन्मांतरीच्या’ हे शीर्षक या अर्थाने समर्पक आहे, की आपण नकळत आपल्या मुलांना मानवतेच्या, वर्षांनुवर्षे चालत आलेल्या वारशाशी जोडत असतो..
वर्षभरात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती येत आहे.
हेरंब कुलकर्णी
गोष्टी जन्मांतरीच्या :
रेणू गावस्कर,
शब्द प्रकाशन, मुंबई
मूल्य - २२० रु.

मागील पान
पुस्तकाच्या मागील पानावर पुस्तकाचा कथाविषय सांगणाऱ्या आशयाचा सारांश मांडणाऱ्या- मोजक्या ओळी असतात निर्मितीच्या प्रक्रियेत ‘मागे’ राहून ‘बोलकी’ आणि मोलाची कामगिरी करणारे हे समर्थ सारांश..
he Woods are lovely dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep
- Robert Frost
आयुष्याच्या प्रवासात आणि जगाच्या सफरीमध्ये कित्येक वेळा आपल्या सर्वाची अवस्था या कवितेत वर्णन केल्याप्रमाणेच होते. नितांत सुंदर ठिकाणं, रमणीय स्थळं, निसर्गाची अद्भुत किमया आपल्याला मोहवून टाकते, इतकी की तिथून हलूच नये असा मोह पडतो. काही काळानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात परततो. मात्र.. पुनश्च प्रवासाच्या ओढीनेच!
प्रवास कोणताही असो, रुळलेली वाट सोडून नवा रस्ता शोधण्याचं धाडस करणाराच त्यात सफल ठरतो.. भले त्याचा प्रवास खडतर असो, शिखरावर तोच पोचतो.
वीणा पाटील या जातिवंत मुशाफिरांच्या वर्गातल्या!
पर्यटनसंस्थेच्या चालक नंतर- आणि पर्यटक आधी, असा प्रकार असणाऱ्या या लेखिकेनं ‘केसरी’मधून हजारो पर्यटकांना जगभरातील रमणीय ठिकाणांची सफर घडवली आहे. एवढंच नाही तर देश- परदेश निरखण्याचा छंदच जडवला आहे.
सतत चालण्याचा, पुढं जाण्याचा मंत्र देणारा- त्यांच्या अनुभवविश्वाच्या रंगतदार सफरीतील हा पुढचा टप्पा!
सिमला- कुलू- मनालीपासून ते इटली- रोम- दुबई- अमेरिकेच्या रस्त्यावरून ‘चलते चलते’ जमविलेल्या विविधरंगी अनुभवांचा व जागविलेल्या आठवणींचा हा टवटवीत गुच्छ..
चलते चलते
वीणा पाटील
अमेय प्रकाशन
पृष्ठे- २०२, मूल्य- २९५ रुपये