Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

मुंबईचे भाग्यविधाते
मुंबईच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या मृत्यूस आज (३१ मे रोजी) १३५ वर्षे होत आहेत. तर ८ जूनला त्यांची १८५ वी जन्मतिथी येत आहे. यानिमित्ताने त्या डॉ. भाऊ दाजींच्या जीवनकार्याचा हा परिचय..
मुंबईच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारे आधुनिक धन्वंतरी डॉ. भाऊ दाजी लाड हे मुंबईच्या सार्वजनिक जीवनातील सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे तसेच आयुर्वेदाचा आधुनिक पद्धतीने अभ्यास करून कुष्ठरोगावर नवे औषध शोधून काढणारे १९ व्या शतकातील मुंबईतील एक प्रभावी नेते होते. ८ जून १८२४ रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील पारसे या गावी एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या भाऊंचे मूळ नाव रामकृष्ण होते. त्यांचे वडील विठ्ठल (दाजी) गरिबीमुळे शेतीबरोबर मातीचित्रे तयार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. मुंबईतील सेंट्रल मराठी स्कूल, एलफिन्स्टन हायस्कूल आणि पुढे एलफिन्स्टन कॉलेजात शिक्षण घेत असताना भाऊंनी अनेक पदके मिळवली. १८४३ ते १८४५ पर्यंत एलफिन्स्टन इन्स्टिटय़ूटमध्ये सहशिक्षक असताना भाऊ बाळशास्त्री जांभेकरांकडून खाजगीरीत्या संस्कृत शिकले. ५ फेब्रुवारी १८४४
 

रोजी जिऑग्राफिकल सोसायटीत वाचून दाखविलेल्या मालवण आणि भोवतालच्या प्रदेशातील लोहखनिजांवरील शोधनिबंधासाठी भाऊंनी जांभेकरांना माहिती पुरविली होती. मानवतेला काळिमा लावणारी स्त्री-बालहत्येची चाल हिंदू धर्माविरुद्ध असल्याचे अनेक धर्मग्रंथांचे दाखले देऊन पटविणाऱ्या भाऊंच्या निबंधास १८४७ मध्ये सरकारने आयोजित केलेल्या स्पर्धेत ६०० रु.चे बक्षीस मिळाले.
ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना झाल्यावर पहिल्या वर्षी दाखल झालेल्या तीन हिंदू विद्यार्थ्यांपैकी भाऊ एक होते. १८५१ मध्ये G.G.M.C. झाल्यावर असिस्टंट सर्जन म्हणून काही काळ नोकरी करून, नंतर भाऊंनी खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. लिथोटोमीसारख्या अवघड शस्त्रक्रिया करणाऱ्या भाऊ दाजींनी अल्पावधीत वैद्यकीय व्यवसायात मिळवलेले यश व वैभव त्या वेळच्या कोणाही इंग्रज डॉक्टरला कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षांत मिळणे दुरापास्त असल्याचे १८५५ साली ‘लॅन्डसेट’ने नमूद केले आहे. ग्रँट मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय संशोधनासाठी स्थापन केलेल्या ग्रँट कॉलेज मेडिकल सोसायटीचे ९ जानेवारी १८५५ रोजी निवडून आलेले भाऊ हे पहिले हिंदी अध्यक्ष होते. १८५२ ते १८५७ या काळात पश्चिम भारतीयांच्या आहाराचे वैद्यकीय मूल्यमापन, मूतखडय़ाची शस्त्रक्रिया, अफूची विषबाधा, कॉलरा इत्यादी विषयांवर भाऊंनी ग्रँट कॉलेज मेडिकल सोसायटीत अभ्यासपूर्ण शोधनिबंध वाचले. सर्पदंशावरील शोधनिबंधात भाऊंनी पारंपरिक भारतीय उपचारांचे वर्णन करून त्यास आवश्यक असलेल्या वनस्पतींची लागवड करण्याचे आवाहन केले.
दोसाभाई फ्रामजी कामा या व्यापाऱ्याच्या आर्थिक मदतीवर आणि बंधू डॉ. नारायण दाजींचे साहाय्य घेऊन भाऊंनी नागदेवीला धर्मादाय दवाखाना सुरू केला. इथे दरवर्षी १०,००० रुग्ण दाखल होत. याखेरीज दररोज सरासरी ११० रुग्णांवर मोफत उपचार केले जात. अमेरिकेतील यादवी युद्धानंतर मुंबईच्या शेअर बाजारात आलेल्या मंदीचा फटका भाऊ आणि कामा या दोघांनाही बसल्याने हा दवाखाना त्यांना बंद करावा लागला. तेव्हाचे मुंबईतील एक नावाजलेले पुढारी आणि ‘नेटिव्ह ओपिनियन’ या द्वैभाषिक वृत्तपत्राचे संपादक वि. ना. मंडलिक यांचे भाऊ घनिष्ठ मित्र होते. अनेक गुजराती व पारशांचे ते कुटुंब-वैद्य होते. पारसी समाजात भाऊ इतके लोकप्रिय होते की त्यांच्यावरील मृत्युलेखात ‘रास्त गोफ्तार’ या गुजराती वृत्तपत्राने म्हटले होते की, ‘पोते हिंदू छतां पारसीओमा ते पारसीच लागतो हतो.’
२० ऑगस्ट १८५२ मध्ये स्थापन झालेल्या ‘बॉम्बे असोसिएशन’ या राजकीय व स्थानिक स्वराज्यविषयक मागण्या करणाऱ्या संस्थेचे भाऊ दीर्घकाळ सभासद व काही काळ अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत बॉम्बे असोसिएशनने सरकारला पाठविलेल्या अर्जात पुढील मागण्या केल्या होत्या : ज्या सरकारी खात्यांतील अधिकाऱ्यांना फारसे काम नाही, ती खाती रद्द करून त्यांची कामे इतर खात्यांशी जोडली जावीत. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल या दोन सत्ताकेंद्रांत सत्तेचे विभाजन होऊन प्रशासनात दिरंगाई होत असल्याने कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे सत्ताकेंद्र नष्ट करावे. इंग्लंडच्या बादशहाच्या ब्रिटिश संसदेस जबाबदार असलेल्या प्रतिनिधीने काही काळ भारतात राहिलेल्या व हिंदुस्थानप्रेमी इंग्रजांनी निवडलेल्या १२ सदस्यांच्या मदतीने हिंदुस्थानच्या राज्यकारभारावर देखरेख ठेवावी. राज्यकारभारात हिंदी लोकांना अधिकाधिक वाटा द्यावा. न्याय व नागरी खात्यात अधिक जाणकार व कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. व्यापार वाढविण्यासाठी दळणवळणाच्या साधनांचा विकास करावा. शिक्षणावरील खर्च वाढवून प्रत्येक इलाख्यात एक विद्यापीठ स्थापावे. (या मागणीस अनुसरून इ. स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास व कलकत्ता विद्यापीठांची स्थापना झाली.)
हे पत्र ब्रिटिश संसदेत वाचून दाखविल्यानंतर ‘लंडन मेल’ने लिहिले, ‘मुंबईतील एतद्देशीयांनी आता राजकीय हक्कांची भीक मागणे सोडून देऊन आर्थिक मदतीच्या जोरावर लिव्हरपूल व मँचेस्टरच्या मध्यमवर्गाला शोभेसे राजकीय आंदोलन सुरू केले आहे.’
गरीबांविषयी भाऊंना असलेल्या कळवळ्याचे एक मोठं उदाहरण म्हणजे १८५४ साली मुंबईत गाजलेला विठोबा मल्हारी खटला! बॉम्बे क्रॉनिकलच्या इंग्रज मालकाच्या सांगण्यावरून त्यांनी ज्याचे पैसे बुडवले होते त्या शिंपी विठोबा मल्हारीलाच मुंबईचे मॅजिस्ट्रेट कॉर्फिल्ड यांनी मालकाची अवज्ञा केल्याच्या आरोपावरून २१ दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावयास लावली. तेव्हा भाऊंनी विठोबा मल्हारीला कोल्हापूरहून परत बोलावले आणि कॉर्फिल्डकडे अब्रुनुकसानीची भरपाई मागणारा अर्ज त्याच्याकडून भरून घेतला. या खटल्याचा निकाल पुढे विठोबा मल्हारीच्या बाजूने लागला, तरी त्याला ५०० रुपये भरपाई मिळवून देण्यासाठी भाऊंना पदरचे १०,००० रुपये खर्चावे लागले होते. परंतु यातून गरीबांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध झगडण्याचा भाऊंचा वसा दिसून येतो.
दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेच्या व्यवस्थापक समितीचे भाऊ अध्यक्ष, तर द वेस्टर्न इंडिया कॅनल अॅण्ड इरिगेशन कंपनीचे ते एक डायरेक्टर होते. मुंबईतील पहिल्या कागद गिरणीच्या कार्यकारी मंडळाचे भाऊ स्थापनेपासून (१८५४) सभासद होते. एस. डी. मेहता यांच्या मते, मुंबईत कापड गिरणी सुरू करण्याची कल्पना सर्वप्रथम भाऊंनी मांडली. कावसजी दावर यांनी २२ फेब्रुवारी १८५४ रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
व्यापारावर कर बसविण्यासाठी इंग्रज सरकारने आणलेल्या लायसन्स बिलाच्या निषेधार्थ १० ऑक्टोबर १८५९ रोजी टाऊन हॉलमध्ये वकील, डॉक्टर व व्यापाऱ्यांच्या भरलेल्या सभेत भाग घेतलेल्यांपैकी डॉ. भाऊ दाजी हे एकमेव भारतीय होते. ब्रिटिश सरकारने भारतातील खर्चाचे अंदाजपत्रक दरवर्षी कायदे मंडळास सादर करावे, या रॉबर्ट रायरींच्या सूचनेस भाऊ दाजींनी दुजोरा दिला. आर्थिक व्यवहार लोकनियुक्त प्रतिनिधींकडे सोपविण्याची ब्रिटिश पद्धती भारतात लागू करावी, हिंदी राजांचे भत्ते वेळेवर द्यावेत व त्यांचे वारसा हक्क नामंजूर करू नयेत, धार्मिक व ऐहिक शिक्षणाचा प्रसार करावा, शेतसारा निश्चित करावा, कापसासारख्या मोठय़ा प्रमाणावर निर्यात होणाऱ्या वस्तूंवर जकात बसवावी, सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळावी, या मागण्या भाऊ दाजींनी केल्या. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या चुकांचे परिणाम भारतीयांना भोगावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देऊन ते म्हणाले, ‘आम्हाला सरकार सैन्यबळावर नव्हे, तर जनतेच्या इच्छेवर टिकलेले हवे आहे. जेव्हा ब्रिटिश साम्राज्याचा अस्त होईल, तेव्हा माझ्या देशबांधवांना आधुनिकतेचे धडे देऊन स्वदेशाचा कारभार सांभाळण्याची योग्यता त्यांच्यात निर्माण केल्याबद्दल ब्रिटिश स्वत:ला धन्य समजतील.’
अर्ज-विनंतीद्वारे ब्रिटिशांची न्यायबुद्धी जागृत करून भारताचे राजकीय हक्क मिळवू पाहणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या सुधारणांचे ऋण मानणाऱ्या दादाभाई नौरोजी व नौरोजी फर्दुनजींच्या पिढीतील डॉ. भाऊ दाजी होते. भाऊंचे चरित्रकार अ. का. प्रियोळकर म्हणतात, ‘जनतेत स्वातंत्र्याची आकांक्षा पल्लवित करून तिला राजकीय हक्कांसाठी जागृत करणारी आंदोलने उभारणाऱ्या मुंबईतील अनेक पुढाऱ्यांपैकी भाऊ एक महत्त्वाचे नेते होते.’ १८६९ ते १८७१ मध्ये भाऊ मुंबईचे शेरीफ झाले.
१८५२ मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनवर एलफिन्स्टन इन्स्टिटय़ूटतर्फे भाऊ दाजी निवडून आले. १८६९ साली आर्ट फॅकल्टीतर्फे सिंडिकेटवर निवडून आलेले ते पहिलेच हिंदी सभासद होत. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून आर्टस् व मेडिसिन फॅकल्टीचे सभासद असणाऱ्या कनवाळू व गुणग्राहक भाऊंमुळेच निराश्रित हंगेरियन बहुभाषावीर रेहात्सेक यांच्या भाषाध्यापन कारकीर्दीस प्रथम विल्सन महाविद्यालयात व नंतर मुंबई विद्यापीठात प्रारंभ झाला.
मुंबईतील वाचनालय चळवळीचे भाऊ एक उद्गाते होते. १८४५ साली स्थापन झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीचे भाऊ प्रवर्तक आणि अनेक वर्षे अध्यक्ष होते. डेव्हिड ससून लायब्ररी आणि जुवेनाईल इम्प्रूव्हमेंट लायब्ररीचे सदस्य आणि पेटिट लायब्ररीच्या संस्थापकांपैकी ते एक होते. गुजराती हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह करण्यासाठी तसेच इतर भाषांतील ग्रंथांचे गुजरातीत भाषांतर करण्यासाठी, ग्रंथकारांना बक्षिसे देण्यासाठी व ग्रंथप्रकाशन करण्यासाठी १८६५ साली स्थापन झालेल्या फार्ब्स गुजराती सभेच्या कार्यकारी मंडळाचे ते सभासद, विश्वस्त व देणगीदार होते. भारतात संस्कृतशिक्षणाच्या प्रसाराने भारतीय भाषांचा उत्कर्ष होईल असे भाऊंना वाटे.
भाऊंचे मुंबईतील चिरंतन स्मारक म्हणजे १८७२ मध्ये स्थापन झालेले भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय! या वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीची धुरा बुइस्ट यांनी वाहिली असली तरीही त्यात भाऊ दाजींचा सक्रिय सहभाग होता. हे म्युझियम साहित्य, कला, निसर्ग व विज्ञानातील आश्चर्याच्या सकृद्दर्शनाद्वारे लोकशिक्षण देणारे एक मंदिर व्हावे, तसेच समाजातल्या सर्व थरांतील लोकांना राष्ट्रीय व सामाजिक जीवनातील सामूहिक उद्दिष्टे परस्पर सहकार्याने साध्य करण्यासाठी एकत्र येण्याचे व औद्योगिक कलांविषयी अधिक माहिती मिळवण्याचे एक ठिकाण व्हावे, अशी भाऊंची इच्छा होती. भारतात औद्योगिक कलाकुसरीची हेळसांड झाल्याने या संग्रहालयाची स्थापना भारतीय कलाकुसरीच्या उत्कर्षांसाठी वरदान ठरू शकेल असे भाऊंना वाटे. भाऊंचा सक्रिय सहभाग असलेल्या म्युझियम कमिटीने मुंबईकरांकडून जमविलेल्या १.१ लाख रुपयांत सरकारी मदतीची भर टाकून ४.३ लाख रुपयांत १८७२ मध्ये या वस्तुसंग्रहालयाची उभारणी झाली.
सांगलीचे नाटककार विष्णुदास भावे हे त्यांची नाटक कंपनी घेऊन मुंबईत आले असता भाऊंनी त्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत केली. एलफिन्स्टन हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या कालिदास एलफिन्स्टन सोसायटी या नाटय़संस्थेशी भाऊंचा संबंध होता. मुंबईत विविध भारतीय भाषांच्या रंगभूमींना भाऊंमुळेच ऊर्जितावस्था आल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व ‘नेटिव्ह ओपिनियन’ने नमूद केले आहे.
स्त्री-शिक्षणाच्या प्रसाराशिवाय समाज सुधारण्याची आशा नाही, असे मानणाऱ्या भाऊंनी स्टुडन्टस् लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी कन्याशाळेस १८५९ पासून १८६२ पर्यंत दरमहा चाळीस रुपयांची देणगी दिली. विधवा विवाहाच्या पुरस्कर्त्यां भाऊंच्या स्नुषा शांताबाई यांचा पुनर्विवाह झाला होता. लग्न-मुंजीत वेश्यांचे नृत्य ठेवण्याची चाल मोडूून भाऊंनी मुलाच्या मुंजीत गवयाचे गाणे ठेवले. भाटिया समाजाच्या धर्मगुरूंच्या अनाचारावर वृत्तपत्रांतून टीकेची झोड उठवल्याबद्दल करसनदास मुळजींवर धर्मगुरूंनी अब्रुनुकसानीची फिर्याद करताच भाऊंनी करसनदास मुळजींची पाठराखण केली. मद्यपान निषेध सभेचे सदस्य असलेले भाऊ सरकारी पातळीवर दारूबंदीची मागणी करीत. भाऊंना प्रार्थना समाजाबद्दल सहानुभूती व ख्रिस्ताबद्दल पराकोटीचा आदर वाटे. समाजाला बरोबर घेऊन व जुन्याचा सर्वस्वी त्याग न करता त्यातील ग्राह्य़ांशावर नव्याचे रोपण करूनच सुधारणा व्हाव्यात, अशी नेमस्त भूमिका भाऊंनी नेहमीच घेतली.
१८४५ च्या पावसाळ्यात सर अस्र्किन पेरींच्या समवेत पुराणेतिहास संशोधनासाठी अजंठय़ाला गेल्यापासून भाऊंना इतिहास संशोधनाची गोडी लागली. आर्यभट्ट, वराहमिहिर व भास्कराचार्याचा काळ, कालिदास, बाण, हेमाद्री व मुकुंदराजांच्या साहित्यकृती, हेमचंद्र, माधव आणि सायनाचे तत्त्वज्ञान, मेरुतुंगाचा वंशवृक्ष, भारतीय कालगणना, शालिवाहन व विक्रम संवत, भारतावरील शक आक्रमणे, कुतुबमिनार येथील लोहस्तंभ, प्राचीन भारतीय नाणी, अजंठा, अमरनाथ, जुनागढ, काठेवाड, धारवाड, म्हैसूर व अनामकोंडा येथील शिलालेख इत्यादी विषयांवर भाऊंनी एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात शोधनिबंध प्रसिद्ध केले.
प्रो. मॅक्सम्युलर १८८१ साली लिहितात, ''I always look upon Dr. Bhau Daji as a man who has written little, the little he has written is worth thousands of pages by others.''
१८५९ ते १८६४ पर्यंत एशियाटिक सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर असलेले आणि १८७३ ते १८७४ मध्ये एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष झालेले भाऊ हे पहिलेच भारतीय होत. वैद्यकीय व्यवसायामुळे भाऊंना शिलालेखांचे ठसे घेण्यासाठी दीर्घकाळ परगावी राहणे शक्य नसल्याने या कामावर २४ एप्रिल १८६२ पासून भाऊंनी भगवानलाल इंद्रजी यांची पगारी नियुक्ती केली. भाऊंकडे मिळालेल्या प्रशिक्षणामुळे पुढे प्राचविद्यातज्ज्ञ म्हणून इंद्रजी जगप्रसिद्ध झाले. अनेक नामवंत युरोपीय व अमेरिकन संशोधन संस्थांचे सदस्य असलेल्या व युरोपीय प्राच्यविद्यातज्ज्ञांच्या वर्तुळात मोठे नाव मिळविलेल्या भाऊंचे ग्रंथसंग्रहालय मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथसंग्रहालयाच्या तोडीचे होते.
पाश्चिमात्य वैद्यकाचे पदवीधर असलेल्या भाऊंनीच सर्वप्रथम आयुर्वेद व पाश्चिमात्य चिकित्साप्रणालींचे ऐक्य करण्याचा प्रयत्न केला. कोकण, गोवा, कारवार, कर्जत व तळेगाव येथून जमविलेल्या वनस्पती भाऊ घराभोवतालच्या औषधी वनस्पतींच्या बागेत लावत. ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र व औषधीविद्येचे प्राध्यापक असलेल्या बंधू डॉ. नारायण दाजींच्या मदतीने या औषधी वनस्पतींवर आधुनिक पद्धतीने दीर्घकाळ केलेल्या प्रयोगाचे फलित म्हणजे भाऊंनी संशोधित केलेले कुष्ठरोगावरील औषध! डॉ. भाऊ दाजींचे हे औषध जगास सर्वप्रथम ज्ञात करून देणाऱ्या अ. का. प्रियोळकरांच्या मते, हे औषध आयुर्वेदात उल्लेखलेल्या गरुडफळ (Hydnocarpus wightiana) म्हणजे मराठीत कवटी किंवा जंगली बदाम आणि कोकणीत खष्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि गोव्यात मोठय़ा प्रमाणावर आढळणाऱ्या फळाच्या बिया व तेलापासून तयार केलेले होते. कुष्ठरोगामुळे १२ ते १७ वर्षे आजारी असलेल्या व रोग बळावलेल्या रोग्यांवरदेखील पंधरवडा ते दोन महिन्यांत या औषधांचा गुण दिसू लागे व चार ते सहा महिन्यांत अर्धाअधिक कुष्ठरोग बरा होई. भाऊंच्या औषधाने संपूर्ण बरे झालेल्या वैयाकरणी बाळशास्त्री टोकेकर व अमेरिकन मिशनच्या विष्णू भास्कर करमरकरांनी म्हटले आहे की, भाऊ दाजींनी दिलेल्या दोन तेलांपैकी लाल तेलाचे दहा थेंब गाई किंवा म्हशीच्या तापवून थंड केलेल्या दुधातून सकाळी न्याहरीबरोबर व रात्री जेवणाबरोबर पोटात घ्यावे लागे. दुसरे तेल न्याहरी तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर अंगास चोळावे लागे. श्वासोच्छवास नीट होत नसल्यास अंगास लावण्याच्या तेलाचे थेंब वारंवार नाकात घालावे लागत. मोकळ्या हवेत फिरण्यावर व स्वच्छ कपडे घालण्यावर त्यांचा भर असे. दूध, तूप, गहू, तांदूळ व सर्व प्रकारच्या भाज्या खाण्याची कुष्ठरोग्यास मुभा होती. मात्र, आंबट, तिखट पदार्थ, मांसाहार, मिठाई, चहा, कॉफी, लेमनेड तसेच तंबाखू, अफूसारखी मादक द्रव्ये घेण्यास मनाई होती.
भाऊंच्या औषधाने आपल्या लहान मुलाचा कुष्ठरोग बरा झाल्याबद्दल मायदेशी परतताना एका इंग्रजाने भाऊंचे जाहीर आभार मानले. तसेच पंजाब सरकारने मुंबई सरकारकडे व हॉलंडच्या पूर्वेकडील वसाहतीच्या गव्हर्नरकडून ब्रिटिश सरकारकडे भाऊंच्या औषधाची मागणी झाली. तथापि औषध जाहीर केल्याशिवाय जे. जे. रुग्णालयातील कुष्ठरोगी भाऊंना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यास तेथील अधिकाऱ्याने नकार दिला. तेव्हा आपले औषध पूर्णत्वाला पोहचविण्यासाठी अधिक प्रयोगांची गरज असल्याने ते जाहीर करण्यास भाऊंनी नकार दिला. ‘भाऊंचे गुणकारी औषध जर नवे नव्हते, तर भाऊंच्या आधी त्याचा वापर न केल्याबद्दल ग्रँट मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांना व मुंबईतील डॉक्टरांना लाज वाटली पाहिजे,’ या शब्दांत भाऊंच्या कलकत्त्यातील एका चाहत्याने भाऊंचे योगदान नाकारणाऱ्या त्यांच्या विरोधकांना खडसावले होते. कवटी फळ कुष्ठरोगावर रामबाण औषध असल्याबद्दल भाऊंना आयुर्वेदामुळे समजले असले तरीही रोग्याच्या प्रकृतिमानानुसार सूक्ष्म निरीक्षणाने ते कसे, किती प्रमाणात, किती काळ द्यावे, याबद्दलची प्रयोगबद्ध योजना यशस्वी करण्याचे श्रेय भाऊंनाच जाते. व्यासंग, लोकसंग्रह, दूरदृष्टी, योजकता व नेतृत्वगुणांमुळे भाऊंनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्याचे सोने केले.
१४ जानेवारी १८७३ रोजी पक्षाघात झाल्यानंतर प्रदीर्घ आजाराने ३१ मे १८७४ रोजी भाऊंचे देहावसान झाले. रत्नागिरीस होऊ घातलेल्या कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयातील १०० रुग्णांच्या एका विभागाच्या उभारणीचा खर्च मुंबईतील धनवानांनी करून व त्यास भाऊंचे नाव देऊन त्यांचे स्मारक उभारण्याची सूचना ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने केली. तथापि स्मारकाच्या निधीसाठी ४ जानेवारी १८७६ पर्यंत फक्त ११,४४१ रुपयेच जमल्यामुळे कुष्ठरोग इस्पितळाची कल्पना मागे पडली आणि या निधीतून पाच हजार रुपयांवरील चार टक्के व्याजाच्या रकमेतून भाऊ दाजींच्या स्मरणार्थ दरवर्षी बी. ए. परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस पुस्तके देण्याचे ठरविले गेले व उरलेल्या पैशातून भाऊंची हस्तलिखिते विकत घेऊन मुंबईच्या एशियाटिक सोसायटीत 'Bhau Daji Collection' नावाचा स्वतंत्र विभाग उघडण्यात आला.
आज १३५ वर्षांनीही त्यांच्या मृत्यूपश्चात मुंबईतील त्यांच्या प्रचंड समाजकार्याची साक्ष देत भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाच्या आवारात भाऊ दाजी वस्तुसंग्रहालय दिमाखात उभे आहे. तर कवटीची फळे संशोधकांना आजही खुणावत आहेत.
अभिधा धुमटकर