Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

मुलींनी लग्न ‘नेमके’ कधी करावे?
- बी. जे. शेख, अंधेरी.

आई होण्याच्या आत!
निवडणूक व अडवणूक यात काय चुणूक आहे?
- विजय महाम्बरे, वेंगुर्ले.

फसवणूक.
मुली लिपस्टिक का लावतात?
- समीर मंत्री.

उत्तर अगदी ओठावर आहे, पण आत्ता आठवत नाही.
देव तुमच्यावर प्रसन्न होऊन ‘वर मागा’ म्हणाला तर काय मागाल?
 

- अरविंद करंदीकर.
जरा खाली काय चाललंय बघ!
नवी बायको व ताजे वर्तमानपत्र यात साम्य काय?
- गजानन थळपते, कळमनुरी.

उद्या सकाळपर्यंत कळ काढा.
मराठी माणसाच्या कथांचा इतिहास माहीत असूनही मराठी नेते असे का वागतात?
- शशिकांत पाटील.

शहाणपण आलं तर मग आपल्याला ‘मराठी’ कोण म्हणणार?
मुलीला प्रपोज कसे करावे?
- हिम्मत शेजवळ, भुलेश्वर, मुंबई.

तुमच्याकडे हेल्मेट असणारच!
आपल्या बायकोवरचे आपले प्रेम कसे मोजावे?
- श्रीपाद कुलकर्णी, पुणे.

फूटपट्टीने मोजण्याचा प्रयत्न कराल तर महागात पडेल.
नायगावकर काका

निवडणुकीचे निकाल धक्कादायक होते. काहींना सुखाचा धक्का, काहींना दु:खाचा धक्का तर काहींना आश्चर्याचा! बादशहा मोठय़ा चवीनं सगळी आकडेवारी पाहत आणि वाचत बसला होता. बिरबल आला तेव्हा बादशहा म्हणाला, ‘‘बिरबला, सगळ्यांचे अंदाज खोटे ठरले की रे!’’ बिरबलानंही मान हलवली. बादशहा अचानक म्हणाला, ‘‘काही तज्ज्ञांनी अभ्यास करून त्यांचे अंदाज जारी केले होते तर काहींनी ज्योतिषशास्त्राच्या आधारे अंदाज सांगितले होते. सगळ्यांचेच चुकले!’’ बिरबलानं पुन्हा मान हलवली आणि म्हणाला, ‘‘होय खाविंद!’’ मग बादशहानं डोळे बारीक केले आणि म्हणाला, ‘‘ज्यांचे ज्यांचे अंदाज चूक ठरले, त्या सर्वाना दहा दहा फटक्यांची शिक्षा जाहीर करू.’’ बिरबलानं विरोध केला आणि म्हणाला, ‘‘अहो ते अंदाजच होते, त्यात एवढं गंभीरपणे घ्यायचं काय आहे?’’ यावर बादशहा जरा घुश्श्यानं म्हणाला, ‘‘मी काहीही करायचं म्हटलं की तू टांग आडवी घालतोस, या वेळी मी तुझं अजिबात ऐकणार नाही.’’ बादशहाचं फर्मान ऐकून सगळे ‘अंदाजवाले’ हादरले. त्यांनी बिरबलाला साकडं घातलं. बिरबल म्हणाला, ‘‘मी या भानगडीत पडणार नाही, तुमचं तुम्ही बघा.’’ फटक्यांचा दिवस जवळ येत होता. बिरबल त्या विषयावर बादशहाशी एक शब्दही बोलत नव्हता. रोज पहाटे एकत्र फिरायला जाण्याचा शिरस्ता मात्र सुरूच होता. एका सकाळी फिरता फिरता दोघे तलावाच्या काठी आले. बिरबल म्हणाला, ‘‘चांगलं तीन पुरुष पाणी आहे या तलावात!’’ बादशहा म्हणाला, ‘‘छे! किमान सहा- सात पुरुष असावं!’’ ‘‘चला पोहून बघूया,’’ म्हणत बिरबलानं कपडे काढले, ते पाहून बादशहाही पाण्यात उतरला. खूप दिवसांनी दोघेही मनसोक्त पाण्यात डुंबले. बाहेर पडल्यावर अंग कोरडं करता करता बादशहा म्हणाला, ‘‘किमान पंधरा पुरुष पाणी असावं, वाटलं नव्हतं एवढा खोल असेल हा तलाव.’’ बिरबल हसत म्हणाला, ‘‘मग खाविंदांना आता सगळ्यांसोबत दहा फटक्यांची शिक्षा मिळणार म्हणायची!’’ बादशहा चमकला आणि त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दाटून आला. ते पाहून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद जनमनाचा कौल आणि पाण्याची खोली केवळ अंदाजानं सांगणं अशक्य असतं. तसं नसतं तर निवडणुकीवर कशाला खर्च केला असता आपण?’’ बादशहा कपडे चढवता चढवता म्हणाला, ‘‘तू कधी माझ्या मनाप्रमाणं मला वागू देणार आहेस का?’’ ते ऐकून बिरबलाचा चेहरा समाधानानं फुलून गेला!

वर्तमानपत्राचे भेंडोळे काखेत घालून साशा स्मरनॉव्ह लगबगीने घरातून बाहेर पडला. लवकरच
डॉ. कोशेलकॉव्ह यांना भेटावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी, यासाठी तो अधिर झाला होता. त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. देण्यातील आनंद त्याला सुखावीत होता. विचारांच्या तंद्रीत तो बाजारपेठेतील डॉ. कोशेलकॉव्ह यांच्या दवाखान्यात केव्हा पोहोचला हे त्याच्या लक्षात आले नाही. त्याचा नंबर आल्यावर तो उत्साहाने आत गेला.
‘‘नमस्कार डॉक्टरसाहेब, मी साशा स्मरनॉव्ह. ओळखलं का मला? आपण माझे प्राण वाचविले. मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा’’ साशा एका दमात एवढे सगळे बोलला.
‘‘अरे ओळखलं का काय म्हणतो? तुला मी कसा विसरू शकतो’’ डॉक्टरांनी तितक्याच उत्साहाने सशाला दाद दिली.
‘‘नाही म्हणजे काय, आपण माझे प्राण वाचविले. मी आईचा एकुलता एक मुलगा. तुमचे आभार मानायला म्हणून मला आईने खास पाठविले.’’ डॉक्टरांच्या आदबशीर वागणुकीने त्याला पुढे बोलते केले होते.
‘‘आभार तर देवाचे मानायला हवे’’, आकाशाकडे बोट दाखवीत डॉक्टर वदले.
साशाने कागदाचे भेंडोळे डॉक्टरांच्या टेबलावर ठेवले. तो म्हणाला, ‘‘माझ्या आईने हे आपल्यासाठी पाठविले आहे. आपण माझे प्राण वाचविले. आईला त्यामुळे सुटल्यासारखे वाटले’’ साशाचा उत्साह ओसांडून वाहात होता.
‘‘अरे, मला भेटवस्तू नको. मी डॉक्टर म्हणून माझे कर्तव्य केले. त्यात विशेष काही केलेले नाही’’ डॉक्टरांनी नम्रपणे सांगितले.
‘‘नाही डॉक्टरसाहेब मी आईचा एकुलता एक मुलगा आहे. तुम्ही माझे प्राण वाचविले. आमची प्रार्थना आहे. आपण हे आपल्याजवळ ठेवा’’, असे म्हणत त्याने मूर्तीला गुंडाळलेले कागद काढले.
एकमेकाच्या मिठीत विसावलेल्या दोन मादक स्त्रियांची ती कलात्मक प्रतिकृती होती. त्यांचे अवयव आकर्षक होते. एका संगमरवरी ठोकळ्यावर ते व्यवस्थित चिकटविलेले होते. जगाच्या कोणत्याही वस्तूसंग्रहालयात स्थान मिळू शकेल एवढे ते आकर्षक होते.
त्या मूर्तीकडे बघितल्याबरोबर ते दचकले. त्यातील कलात्मकता वादातीत असली तरी ते दवाखान्यात ठेवण्याच्या लायकीचे नव्हते.
डॉक्टरसाहेब समजावणीच्या सुरात साशाला म्हणाले, ‘‘साशा माझा दवाखाना सभ्य वस्तीत आहे. माझ्याकडे येणारे रुग्ण मध्यमवर्गीय आणि मध्यवयीन स्त्री-पुरुष आहेत. त्यांनी हे माझ्या दवाखान्यात बघितले तर त्यांच्या मनात माझ्याविषयी असलेला आदर कमी होईल. कृपा करून तू हे परत घेऊन जा.’’ डॉक्टरांच्या बोलण्याकडे साशाचे फारसे लक्ष नव्हते. साशाने कागद गोळा केले आणि ते खिशात कोंबले.
‘‘डॉक्टरसाहेब माझ्या वडिलांनी हे विकत घेतले होते. आईचा मी एकुलता एक मुलगा. आपण माझे प्राण वाचविले. खरे तर आईला त्याचा जोडीदारदेखील द्यायची इच्छा होती, परंतु जोडीदार विकायला कोणी येत नाही. तोवर थांबणे उचित नाही. म्हणून मी हे देऊन जात आहे.’’ असे म्हणून साशाने मूर्तीवरून प्रेमाने हात फिरविला आणि तो चालता झाला.
तो गेल्याबरोबर डॉक्टरांनी मूर्ती उचलली आणि टेबलाआड लपवून ठेवली. मूर्तीच्या डोळ्यात कारुण्य होते. चेहऱ्यावर सभ्यता होती, परंतु तरीही ती मूर्ती दवाखान्यात ठेवणे धोक्याचे होते. मूर्तीचे काय करायचे याचा विचार डोक्यात घोळत असताना अचानक त्याला त्याच्या रंगेल वकील मित्राची आठवण आली. अॅड. उकॉव्हला. मूर्ती देऊन टाकण्याचा त्याने निर्णय घेतला. त्याच्याकडे जाण्यापूर्वी तो घरी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने त्याला फोन केला.
‘‘अरे जरा घरी यायचे होते. वेळ आहे का आमच्यासाठी?’’ जवळीक साधण्याच्या हेतूने डॉक्टर बोलत होते.
‘‘अरे बाबा, तुम्ही डॉक्टर मंडळी कायम कामात असतात. मीच येतो तुमच्याकडे’’ तिकडून आवाज आला. अॅड. उकॉव्हचे इकडे येणे त्याला अडचणीत आणणारे ठरले असते.
‘‘नाही. मीच येतो. घरी थांब’’ एवढे बोलून त्याला पुढे बोलण्याची संधी न देता डॉक्टरांनी फोन खाली ठेवला.
थोडय़ाच अवधित मूर्ती पिशवीत घालून ते दवाखान्याबाहेर पडले. मूर्तीच्या सान्निध्यात त्यांची छाती धडधडत होती.
अॅड. उकॉव्हने त्यांचे उचित स्वागत केले. तरुणपणी केलेल्या आचरटपणाबद्दल दोघेही बोलले. चहापान झाले. डॉक्टरांनी हळूच पिशवी काढून टेबलावर ठेवली.
‘‘मला तुला प्रेझेंट द्यायचे आहे’’ डॉक्टर वकील मित्राला म्हणाले.
‘‘काय विशेष? म्हणजे कारण तरी कळू द्या आम्हाला’’ वकिलांनी उलटतपासणी सुरू केली.
‘‘काही नाही रे. एका पेशंटने आणून दिले. मला वाटले माझ्या दवाखान्यापेक्षा तुझ्या ऑफिसात ते चांगले दिसेल’’ डॉक्टरांनी पिशवीतून मूर्ती काढीत म्हटले.
डॉक्टरांनी मूर्ती टेबलावर ठेवली. पिशवीची घडी घालत असताना त्यांनी वकिलांकडे दृष्टिक्षेत टाकला. वकिलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकायला लागले होते.
‘‘मूर्ती फारच देखणी आहे. खरोखर देणाऱ्याच्या रसिकतेचे कौतुकच केले पाहिजे. मूर्तीवरून हात फिरवीत वकीलसाहेब म्हटले.
‘‘आवडली ना? मला कल्पना होती की ही भेट तुला नक्की आवडेल.’’ गिऱ्हाईक पटतंय असे डॉक्टरांना वाटायला लागले होते.’’
‘‘अरे पण ही मूर्ती माझ्या ऑफिसमध्ये ठेवायची म्हणजे जरा अतीच होईल. नाही का?’’ वकिलाने शंका व्यक्त केली.
‘कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याकडे बघायचे’’ डॉक्टरांनी समजावणीच्या सुरात सांगितले.
‘‘हे बघ. माझ्या अशिलांना कलेतील काही कळत नाही. त्यांच्यासमोर मी हे ठेवू शकत नाही. त्यांचा माझ्याविषयी गैरसमज होईल. कलेच्या नादी लागून मला माझे गिऱ्हाईक घालवायचे नाही.’’ वकीलसाहेबांनी मनातील भीती बोलून दाखविली.
‘‘सगळेच अरसिक नसतात. त्यातील काहींना तरी मूर्तीतील सौंदर्य कळेल,’’ डॉक्टरांना मूर्ती माघारी घेऊन जायचे नव्हते.
‘‘माझ्या घरात माझी आई आहे. ती ऑफिसात आली तर काय म्हणेल,’’ वकिलांनी आईची ढाल पुढे केली.
‘‘तू इतका अरसिक असशील असे मला वाटत नाही. ऑफिसात अडचण झाली तर तुझ्या बेडरूममध्येच ठेव,’’ एवढे बोलून डॉक्टर खुर्चीतून उठले. त्यांनी एकवार वकील मित्राकडे आणि एकवार मूर्तीकडे बघितले आणि तेथून काढता पाय घेतला.
आजूबाजूला कोणीही नव्हते. वकिलांनी मूर्तीकडे डोळे भरून बघितले. तिच्यावरून हळुवार हात फिरविला आणि लगेचच तिला टेबलाखाली दडपले.
मूर्ती घरात ठेवता येणे त्यांना शक्य नव्हते; ती डॉक्टरांकडे परत पाठविणे उचित नव्हते. काय करायचे याचा विचार करीत असताना त्याला त्याच्या एका अविवाहित सोंगाडय़ा मित्राची आठवण झाली. मूर्ती कोणाच्या नजरेला पडण्यापूर्वी त्याने तिला बॉक्समध्ये गुंडाळली आणि तो धावतपळत शॉशकिनकडे निघाला.
दोन खोल्यांच्या घरात एकटाच राहत होता. आतल्या खोलीत त्याचे सर्व सामान होते आणि बाहेरच्या खोलीत बैठक होती. उकॉव्ह आल्याबरोबर तो उठला. त्याने त्याचे स्वागत केले.
‘‘आज आमच्या अड्डय़ावर कसे काय?’’ शॉशकिनने चौकशी केली.
‘‘तू मला विसरला म्हणून मी तुला विसरेन का?’’ उकॉव्हने आगमनाचा हेतू लपवीत सांगितले.
‘‘कसं काय चाललंय तुझं? बायको-मुले खुशीत ना?’’ शॉशकिनने विचारणा केली.
‘‘सगळं मजेत चालले आहे. तुला प्रेझेंट द्यायचे मनात आले आणि म्हणून क्षणाचाही विलंब न करता मी येथे आलो,’’ उकॉव्हने त्याचा हेतू स्पष्ट केला.
‘‘मला रे कशाला प्रेझेंट? मी काय पराक्रम गाजविला आहे की ज्यासाठी तू मला प्रेझेंट देत आहे,’’ शॉशकिनने विचारले.
‘‘मित्र म्हणून मी हे तुला देत आहे. दुसरा कोणताही हिशेब त्यात नाही,’’ असे म्हणत उकॉव्हने पिशवी बाहेर काढली.
‘‘नाही म्हणजे- काय- मूर्ती छानच आहे- माझ्या व्यवसायाला शोभेल- पण माझ्याकडे सभ्य लोक पण येतात. स्टेजवर आमचा चेहरा वेगळा- घरी आम्ही सभ्य. नको- घेऊन जा,’’ शॉशकिनच्या तोंडून एकसारखे शब्द बाहेर पडत नव्हते.
डॉक्टर कोशेलकॉव्हकडून आलेली मूर्ती याच कारणासाठी तो शॉशकिनकडे सरकवीत होता. माघार घेणे उकॉव्हला जमण्यासारखे नव्हते. त्याने शॉशकिनचे काहीएक न ऐकता तेथून पाय काढला.
शॉशकिनच्या समोर ती मूर्ती आव्हान म्हणून उभी राहिली. घरात ठेवली तर त्याच्याविषयी गैरसमज होण्याची शक्यता होती. नाही ठेवली तर इतक्या चांगल्या मूर्तीला तो मुकणार होता. कला आणि जीवन या दोन टोकात तो घुटमळत राहिला. कला उपाशी ठेवू शकते. जीवन अन्नाशिवाय चालत नाही. अन्नासाठी मूर्तीचा त्याग करणे गरजेचे होते. तो विनोदी नट असला तरी मूर्तीचा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नव्हता. मूर्तीची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार चालू असताना त्याचा एक मित्र त्या ठिकाणी आला.
‘‘रंभा, मेनका घेऊन बसला वाटतं. अरे आपला धंदा दुसऱ्याला हसविण्याचा. कोणी दिली ही मूर्ती?’’ मित्राने विचारले.
‘‘माझ्या वकील मित्राने,’’ शॉशकिन म्हणाला.
‘‘आपल्या घरात ही मूर्ती शोभत नाही. आपण कलाकार असलो तरी आपल्याकडे येणारे त्याच दृष्टीचे असतात असे नाही,’’ मित्राने त्याची नाराजी व्यक्त केली.
‘‘मला नको असताना तो ही मूर्ती येथे ठेवून गेला. मला ती घरात ठेवता येणार नाही. तू घेऊन जा तुझ्या घरी,’’ शॉशकिन म्हणाला.
‘‘मलाही ती माझ्या घरी नकोय. आपण असं करू या. जुन्या स्ट्रीटवर एक बाई अशा वस्तू विकत घेते आणि जुन्या बाजारात जाऊन विकते. आपण ही मूर्ती तेथे विकून टाकू या, चल,’’ असे म्हणून त्याने मूर्ती उचलली आणि दोघेही जुन्या बाजाराकडे चालते झाले.
एके दिवशी दुपारी डॉक्टर कोशेलकॉव्ह त्यांच्या दवाखान्यात निवांतपणे बसले होते. सकाळचे काम संपले होते. संध्याकाळचे सुरू व्हायचे होते. समोर कोणी पेशंट नव्हता. तेवढय़ात साशा स्मरनॉव्ह धापा टाकीत दवाखान्यात आला. ‘‘डॉक्टरसाहेब, आपण माझे प्राण वाचविले. मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही याची मला पुरेपूर कल्पना आहे. माझ्या आईचा मी एकुलता एक मुलगा आहे. आमची कधीपासून इच्छा होती की, तुम्हाला दोन मूर्त्यां भेट म्हणून द्याव्यात. दुसरीशिवाय पहिल्या मूर्तीला शोभा नाही. गेल्या खेपेस मी एक मूर्ती आणून दिली होती. आता ही दुसरी घ्या. आम्ही आमची मनोकामना पूर्ण करू शकलो याबद्दल मी व आई दोघेही परमेश्वराचे आभार मानतो,’’ साशाचा उत्साह ओसांडून वाहत होता.
या सगळ्या घडामोडींकडे हताशपणे पाहत राहण्यापलीकडे डॉक्टरसाहेबांकडे दुसरा पर्याय नव्हता.
मूळ रशियन कथा-
अँटन चेकॉव्ह
अनुवाद : आर. एस. जैन

प्रिय तातूस,
तू आठवणीने पाठवलेली आंब्याची पेटी मिळाली. यंदा खरे तर आंबा फारसा नसताना तू प्रेमाने पाठविलीस म्हणून विशेष. त्यातले दोन आंबे मात्र लागलेले निघाले. (ते बहुधा पडीचे असावेत.) असो. आता काय रसावर ताव मारण्याचे आपले वय रहिलेले नाही. तुमच्याकडच्या कृष्णा पाटीलने एव्हरेस्ट सर केले. ती वहिनीच्या माहेरची, त्यामुळे नाक वर असेल. परवा दिवसभर घरात तिचाच विषय होता. लहान असताना काय सरसर चार जिने चढून यायची हे ती सर्वाना सांगत होती. आता तिचा विषय निराळा पण त्यावरून मला मात्र ‘तुम्हाला साधं माळ्यावरचं पातेलं काढायचं तर शेजारच्या दिगूला वर चढवावं लागतं.’ हे ऐकवायचं काय कारण. हिच्या मूळ स्वभावाला जागून ती कृष्णा भेटल्यावर एव्हरेस्टवरून काय काय खरेदी केली हाच प्रश्न विचारणार म्हणा. असो, मध्यंतरी निवडणुकांची एकूणच धामधूम असल्याने तुला लिहिता आले नाही. खरे तर एकदा निवडून आल्यावर पुन्हा पाच वर्षांनी निवडणुकीला उभं रहायचं हेच मला पटत नाही. नोकरीत कसं एकदा लागल्यावर रिटायर होईतो कुणी तुम्हाला काढू शकत नाही. ऐन सुटय़ांच्या काळात मतदान ठेवल्याने अनेकांचे सुट्टीतले बेत फिसकटले. पडलेल्या सगळ्या उमेदवारांना इलेक्षनची डय़ुटी करण्यारांचे शाप भोवले असणार. लोकसभेची निवडणूक होते न होते तोच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेवल्यात. दोन्ही निवडणुका एकावेळी घेतल्या असत्या तर एकात एक होऊन वेळ खर्च तरी वाचला असता. आपण भाजी आणायला गेलो तर येताना गहू पण घेऊन येतो. त्यासाठी दोन दोन चकरा मारत बसत नाही. खरं तर सरकारला हे कुणीतरी सांगायला हवं होतं. पण हल्ली असं रोखठोक सांगणारंच कुणी राहिलं नाही. हल्ली सगळीकडे तरूणांचं फॅड आलंय. त्यामुळे आपल्यासारख्या पन्नाशीच्या पुढच्या लोकांचं काही खरं नाही असं वाटायला लागलंय. आता लग्नाच्या बाबतीत म्हणशील तर माणसानं तरुण असायला पाहिजे हे समजू शकतो पण आताचा जमाना चेहरे बघायचा आहे. अर्थात पहिल्या शपथविधीत तरी सगळे पोक्त चेहरे दिसले. त्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात आनंदाचे वातावरण हाते. हल्ली ज्योतिषाचे तर इतके फॅड आलेय की चेहऱ्यावरुन ‘हा माणूस विरोधी पक्षासाठीच जन्माला आलाय’ हे ओळखतात. काही माणसांना काय सिद्धी असेल काही सांगता येत नाही. या लोकांना पुढचं कसं दिसतं याचंच आश्चर्य वाटतं. मला अजूनही चिंचपोकळी गेल्यावर पुढे करी रोड स्टेशन येतं हे सांगता येत नाही. आपल्याकडे कोण पण उठतो आणि निवडणुकीला उभा रहातो. अरे साधं केजीत मुलाला घालायचं तर शंभर प्रश्न विचारतात आणि आईवडिलांना पण काय काय पाठ म्हणायला लावतात म्हणे! निवडणुकांना उभं रहायचं तर मात्र कुठलीही एन्ट्रन्स एक्झाम वगैरे नसते याचं मला तर आश्चर्यच वाटतं. चाळीस वर्षांपूर्वी तात्या इथल्या छोटय़ा बॅंकेत लागले तर त्यांना संचालकांनी एकोणतीसचा पाढा म्हणायला लावला होता. किती बुकं शिकलात यावर पूर्वी माणसांना आपण ओळखायचो. मात्र अर्ज भरताना एका उमेदवाराने तर आपल्याकडे पाणी साठवायचे दोन मोठ्ठे ड्रम असल्याचं अर्जात लिहिलं होतं. मलादेखील आपल्या खालच्या मजल्यावरच्या सगळ्यांनी अनंतराव तुम्ही यंदा निवडणुकीला उभे रहाच असा आग्रह केला. ‘तुमच्यावर एकही केस नाही. निवडून नाही आला तरी सगळीकडे तुमचं नाव हेाईल. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.’ म्हणाले. तेवढय़ात हिनं पिशवी समोर ठेवून एवढे मटार सोलून द्या लवकर म्हणाली. बायकांना एखादा विषय काय चाललाय हेच समजत नाही. ते बिचारे एवढय़ा आशेनं आले होते ते चहा न घेताच निघून गेले. हिचं म्हणणं नसती खुळं डोक्यात घेऊ नका. पस्तीस वर्षांपूर्वी लग्नाला उभे राहिलात हे माझं भाग्य. आता असली खुळं डोक्यात घेऊन उगाच कुणाच्या भरीला पडून हसं करून घेऊ नका. माझं देखील मत तुम्हाला देणार नाही. लाल दिव्याची खुळी स्वप्नं बघू नका. पायी चालणाऱ्याकडे बघा म्हणाली. अर्थात हिच्या म्हणण्यात तथ्य होतंच म्हणा. पायी चालणाऱ्याकडं बघावं हे खरंच आहे. नाना तर म्हणतो पायी चालणारा माणूसच बुटाचा कचकन पाय अंगठय़ावर ठेवतो म्हणून आपल्याकडे पायी चालणाऱ्याकडं बघावं असं म्हणतात. नानाच्या डोक्यात नेहमी काहीतरी तिरकस विचार चालू असतात. नानाला थोडं गाण्याचं अंग आहे. त्यामुळे बुवांकडे तो शिकायला जातो. इथल्या छोटय़ा हॉलमध्ये बारशानंतर बुवांचं गाणं ठेवलं होतं आणि मागे साथीला नाना तंबोऱ्यावर बसला होता. गातागाता बुवांना ढास लागली आणि खोकला आला म्हणून बुवांनी पाण्याचं भांडं हातात घेत मागं नानाला हात केला तशी नानानंपण खोकायला सुरुवात केली. आम्ही समोर बसलेले सगळे अक्षरश: लोळलो.
पावसाळा अगदी तोंडावर आलाय. यंदा खूप लवकर पाऊस सुरू होणार असं म्हणतात. पण यामागे छत्र्या रेनकोट आणि पावसाळी बूट विकणाऱ्यांचा डाव आहे असं वाटतं. विधानसभेच्या निवडणुका पण लवकर जाहीर होऊन आचारसंहिता लागेल म्हणतात. ऑक्टोबरमध्ये मतदान असेल तर शिक्षकांची दिवाळीची सुट्टी पण बोंबलणार. दिवसेंदिवस पक्ष वाढत असल्याने यंत्रात ते कसे मावणार असा पेच आहे असो. माणसं बघत बसण्यापेक्षा मी हल्ली ढगांकडे बघत बसतो. त्यात छान वेळ जातो. कळावे.
तुझा-

I recently read that love is entirely a matter of chemistry.
That must be why my wife treats me like toxic waste.
David Bissonette

When a man steals your wife, there is no better revenge than to let him keep her.
Sacha Guitry

By all means marry. If you get a good wife, you'll be happy. If you get a bad one, you'll become a philosopher.
Socrates

Woman inspires us to great things, and prevents us from achieving them.
Dumas

The great question... which I have not been able to answer... is, "What does a woman want?
Sigmund Freud

I had some words with my wife, and she had some paragraphs with me.
Anonymous

"Some people ask the secret of our long marriage. We take time to go to a restaurant two times a week. A little candlelight, dinner, soft music and dancing. She goes Tuesdays, I go Fridays."
Henny Youngman

"I don't worry about terrorism. I was married for two years."
Sam Kinison

"There's a way of transferring funds that is even faster than electronic banking. It's called marriage."
James Holt McGavran

"I've had bad luck with both my wives. The first one left me, and the second one didn't."
Patrick Murray

Two secrets to keep your marriage brimming
1. Whenever you're wrong, admit it,
2. Whenever you're right, shut up.
Nash

The most effective way to remember your wife's birthday is to forget it once...
Anonymous
मुकुंद देशमुख
mukdesh123@rediffmail.com