Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

नागरी वस्तीत येणाऱ्या सगळ्या बिबटय़ांवर सरसकट ‘नरभक्षक’ असा शिक्का मारला जातो आणि दिसता क्षणी त्यांना मारून टाकण्याचा फतवाही काढला जातो. माणसाच्या दृष्टीने विचार करता याला अनेकजण दुजोरा देतील. यात काय चुकीचं आहे, असं विचारतील. माणसाच्या हद्दीत येऊन माणसालाच मारणाऱ्या बिबटय़ाला दोषी धरलं जातं, हे माणसाच्या दृष्टिकोनातून समर्थनीय असलं तरी बिबटय़ा असा का वागतो? त्याचेही काही प्रश्न, अडचणी आहेत का? त्या सोडवण्यासाठी त्याला जंगलाची लक्ष्मणरेषा ओलांडावी लागते आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे प्रभाकर कुकडोलकर यांनी ‘बिबटय़ा कोठे जाणार?’ या पुस्तकात.
बिबटय़ाने गावात शिरून धुमाकूळ घातला..
बिबटय़ाने मुलगी पळवली..
 

बिबटय़ाने गायीला जखमी केले..
नरभक्षक बिबटय़ाला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले..
या आणि अशा बातम्या सध्या वरचेवर पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा घटना घडतात तेव्हा जनमानसाची प्रतिक्रियाही संतप्त अशीच उमटते. बिबटय़ांच्या नावाने खडे फोडले जातात. नागर वस्तीवर हल्ला करणाऱ्या बिबटय़ांना मारून टाकण्याची मागणी केली जाते. आज मानव जात अजून श्रेष्ठ मानली जाते. माणसाची गरज, त्याचं अस्तित्व हे प्राधान्यक्रमात पहिलं मानलं जातं. साहजिकच त्याचा जीव महत्त्वाचा आणि मानवाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्यांना ठार मारलं जावं, त्यांना जगण्याचा अधिकार नाही यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. वन्यप्राण्यांचा अधिकार जंगलात, ती लक्ष्मणरेषा ओलांडून भक्ष्याच्या शोधात नागर वस्तीकडे येणाऱ्या बिबटय़ाचा माणसाशी संघर्ष अटळ आहे. पोटाची भूक, पिल्लांची चिंता, या बिबटय़ांना जंगलाची लक्ष्मणरेषा ओलांडायला भाग पाडते आहे, हे समजून घेण्याचं नाकारलेल्या माणसानं या वन्यजिवांशी उभा दावा मांडला आणि माणूस व बिबटय़ा यांच्यातली तेढ दिवसेंदिवस वाढतच गेली. नागरी वस्तीत येणाऱ्या सगळ्या बिबटय़ांवर सरसकट ‘नरभक्षक’ असा शिक्का मारला गेला आणि दिसता क्षणी त्यांना मारून टाकण्याचा फतवाही काढला गेला. माणसाच्या दृष्टीने विचार करता याला अनेकजण दुजोरा देतील. यात काय चुकीचं आहे, असं विचारतील. माणसाच्या हद्दीत येऊन माणसालाच मारणाऱ्या बिबटय़ाला दोषी धरलं जातं, हे माणसाच्या दृष्टिकोनातून समर्थनीय असलं तरी बिबटय़ा असा का वागतो? त्याचेही काही प्रश्न, अडचणी आहेत का? त्या सोडवण्यासाठी त्याला जंगलाची लक्ष्मणरेषा ओलांडावी लागते आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे प्रभाकर कुकडोलकर यांनी ‘बिबटय़ा कोठे जाणार?’ या पुस्तकात. सगळ्यांनी माणसाची बाजू उचलून धरलेली असताना कुकडोलकर यांनी बिबटय़ांची बाजू मांडण्याचा एक प्रामाणिक आणि सच्चा प्रयत्न केला आहे. फक्त बिबटय़ाच असं नाही तर हत्ती, काळवीट, हरणं हे प्राणीही जंगल सोडून मानवी वस्तीत येतात. या प्राण्यांच्या वाढत्या आक्रमणामुळे शेतकरीवर्ग हवालदिल होतो. माकडंही अनेक वेळा हैदोस घालतात. अशा वेळेला या प्राण्यांना टीकेचं लक्ष्य न करता त्यांच्या वर्तनशैलीचा अभ्यास करावा असं एका वनाधिकाऱ्याला वाटावं, या निमित्तानं नाण्याची दुसरी भेदक बाजू आपल्या नजरेसमोर यावी, हेच महत्त्वाचं आहे.
हे प्राणी नागर वस्तीकडे येण्यामागे झपाटय़ानं झालेलं शहरीकरण, बेफाम जंगलतोड, वारंवार लागणाऱ्या वणव्यांनी होणारी जंगलांची हानी, जंगलाच्या आश्रयानं राहणाऱ्या आणि बिबटय़ाचे खाद्य असलेल्या तृणभक्षक प्राण्यांची अवैध शिकार, विकासाबरोबर होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, अशी कारणे आहेत. त्यातलंच आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे बिबटय़ांची वाढलेली संख्या. १९९७ मध्ये झालेल्या प्रगणनेनुसार राज्यस्तरावरील समितीला जुन्नर वन विभागात १० बिबटे असल्याचं आढळलं होतं. २००१ मध्ये हीच संख्या ५७ पर्यंत वाढली. यामागचं कारण असं की, आधी या परिसरात अन्न, पाणी आणि निवारा या तीन मूलभूत गरजा उपलब्ध असल्या तरी प्रजोत्पादनासाठी आवश्यक असे निवांत, एकांतातले क्षेत्र उपलब्ध नव्हते. पण या भागात साखर कारखान्यांची संख्या वाढली तसे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले. उसाच्या शेतात शेतकरी लागवड केल्या केल्या आठ दिवसांनी आणि शेवटच्या काही महिन्यांत पंधरा दिवसांनी पाणी देण्याइतपतच वेळ घालवतात. बिबटय़ांनी या परिस्थितीचा फायदा उठवला. सगळ्या प्राणी जगतात एक नियम पाळला जातो की, प्रजोत्पादनासाठी परिस्थिती प्रतिकूल असेल तर ते प्रजोत्पादन थांबवतात आणि परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा पिल्लांना जन्म देतात. इथली परिस्थिती बिबटय़ांना सर्वस्वी अनुकूल होती, त्यामुळे सर्वसाधारणपणे बिबटय़ांना एक किंवा दोन पिल्लं होत असताना इथल्या बिबटय़ांनी तीन तीन पिल्लांना जन्म दिला. त्यामुळे त्यांची संख्या झपाटय़ानं वाढली. अर्थात संख्या वाढली, पण त्या प्रमाणात भक्ष्य उपलब्ध न झाल्याने त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. बिबटय़ांनी नागर वस्तीला भक्ष्य केले आणि आपल्या पिल्लांसाठी अन्न मिळविण्याचा प्रयत्न केला. हे असे वाट चुकलेले बिबटे निसर्गाचे संतुलन ढळल्याचे लक्षण आहे. तो निसर्गाने दिलेला संकेत आहे. पण निसर्गाच्या संकेतांकडे माणसाने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले आहे.
बिबटय़ाची चाहूल लागली की लगेच वनखात्याला पाचारण केले जाते. त्यामुळे टेल्कोच्या आवारात आलेला बिबटय़ा सहीसलामत जंगलात पाठवण्यासाठी केलेले प्रयत्न, विहिरीत पडलेले बिबटे सोडवण्यासाठी केलेली धडपड, भर वस्तीत शिरलेल्या बिबटय़ांची संतप्त जमावापासून केलेली जपणूक, अशा अनेक केस स्टडीज आठवणींच्या स्वरूपात या पुस्तकात वाचायला मिळतात. बिबटय़ांची वारंवार होणारी आक्रमणं आणि या बिबटय़ांना परत जंगलात सोडण्यासाठी वनखात्याच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला काय सव्यापसव्य करावे लागते, याची सामान्य माणसाला कल्पना नसते. या प्रयत्नात समाजमनाला सांभाळून घ्यावं लागतंच, पण त्याचबरोबर बिबटय़ाचाही जीव वाचवायचा असतो. या अनाहूत पाहुण्याला परत जंगलात नेऊन सोडायचं असतं. ही तारेवरची कसरत असते. एकेका बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी दिवसरात्र अविश्रांत मेहनत करावी लागते. असे अनेक बिबटे जेरबंद करण्यात वनखात्याला यश आलेले असून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये त्याची नोंदही झालेली आहे. वन्यप्राण्यांचे संवर्धन आणि संरक्षण करायचे असेल तर स्थानिक लोकांचे प्रश्नही तातडीने सोडवले पाहिजेत. याची कल्पना असणाऱ्या वनखात्याला माणसे, पाळीव प्राणी, वाट चुकलेली बिबटय़ासारखी जंगली जनावरं, अशा सगळ्यांच्याच संरक्षणाची, सुखरूपतेची जबाबदारी घ्यावी लागते.
या पाश्र्वभूमीवर वनखात्याला ज्या अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यांचाही विचार होणं महत्त्वाचं ठरतं. प्रशिक्षित, अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता, अद्ययावत साधनसामग्रीचा तुटवडा यांसारख्या समस्यांना वनखात्याला तोंड द्यावे लागते. खात्याचे बळकटीकरण आणि विकासकामे करण्यासाठी आर्थिक बळ मिळावे. पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य मिळायला हवे, राजकीय स्तरावर या खात्याचे महत्त्व वाढायला हवे, दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात. त्यांना साहसाची कामे करावी लागतात. याचा विचार करता त्यांना विशेष भत्ता मिळावा. प्रोत्साहनपर बक्षिसे मिळावीत, अद्ययावत वन्यजीव दक्षता फिरती पथके निर्माण व्हावीत, पकडलेल्या प्राण्यांची देखभाल करण्यासाठी विशेष सोयी निर्माण व्हाव्यात, अशा अनेक सूचनावजा अपेक्षा या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या दृष्टोत्पत्तीस आणून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे यावर कृती होण्याची गरजही स्पष्ट करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे नागरी वस्तीत आलेल्या बिबटय़ाला पकडताना येणाऱ्या अडचणीही अनंत असतात. अतिउत्साही ‘बघ्यांची’ गर्दी, ही या प्रक्रियेतील सर्वात मोठी अडचण असते. या गर्दीचा रोख बिबटय़ांच्या विरोधातच असतो. बिबटय़ा नरभक्षक आहे, त्याला मारलाच पाहिजे, उगीच त्याला वाचवण्याचा आटापिटा नको, अशीच वृत्ती असते. बिबटय़ामुळे उद्भवलेली आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका, पोलीस, अग्निशमन दल, जिल्हाधिकारी, स्थानिक नागरिक आणि प्रसिद्धी माध्यमे यांच्यात समन्वय साधला जाण्याची गरज असते. हा समन्वय साधला गेला नाही तर कित्येक वेळेला सार्वजनिक तसेच वैयक्तिक मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच माणसांच्या जिवावर बेतू शकते किंवा बिबटय़ालाही वाचवणे शक्य होत नाही.
या सगळ्या अडचणींबरोबरच प्राधान्याने विचार होण्याची आवश्यकता आहे ती बिबटय़ा शहरांकडे वळणारच नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याची. बिबटय़ाला त्याचे नैसर्गिक भक्ष्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अभयारण्यांच्या क्षेत्रातच वन्यप्राण्यांची प्रजोत्पादन केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता आहे. या केंद्रांमध्ये सांबर, चितळ, भेकर या प्राण्यांची पैदास करता येईल आणि त्यांना जंगलात सोडता येईल. या प्राण्यांची शिकार करण्याचं माणसांनीही थांबवलं पाहिजे. म्हणजे बिबटय़ाला आपलं भक्ष्य मिळविण्यासाठी नागरी वस्तीत येऊन माणूस किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला करावा लागणार नाही. आज माणूस अभयारण्यांची जागा स्वत:च्या स्वार्थासाठी वापरतो आहे, त्यावर आक्रमण करतो आहे, याला आळा बसायला हवा. माणसाची बुद्धी जनावरांपेक्षा जास्त असते. मग त्याला त्याच्या परिघाची कल्पना नसेल तर प्राण्यांकडून ती अपेक्षा ठेवण्यात कोणत्या प्रकारचा शहाणपणा आहे?
वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी राज्यात सहा राष्ट्रीय उद्याने आणि ३५ अभयारण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पण माळढोक पक्षी अभयारण्याचे सात तालुक्यांतील खासगी क्षेत्र वगळले तर या सर्व संरक्षित क्षेत्राची टक्केवारी भौगोलिक क्षेत्राच्या फक्त २.५ टक्के येते. राष्ट्रीय वन नीतीनुसार किमान ५ टक्के क्षेत्र अभयारण्याखाली हवे. म्हणजे अजूनही अनेक अभयारण्यांची निर्मिती करण्याची किंवा अस्तित्वात असलेल्या अभयारण्यांचे क्षेत्र वाढवण्याची गरज आहे. ते तर होत नाहीच, उलट अभयारण्यांच्या विकासासाठी पुरेसा निधीही उपलब्ध होत नाही. या परिस्थितीत बिबटय़ांचे भरकटणे थांबवणे अशक्य आहे, असा धोक्याचा इशारा मिळतो. ‘थंडीच्या दिवसांत तुम्ही आम्ही घरेदारे बंद करून गोधडीमध्ये स्वत:ला गुंडाळून स्वस्थ झोप घेतो, पण आजच्या परिस्थितीत तरी बिबटय़ाच्या मनात ही शांतता नसेल तर आणि असा अस्वस्थ बिबटय़ा कडाक्याच्या थंडीतही गावाची वाट तुडवत येतो, तेव्हा त्याच्या क्रौर्याला कोणत्याही मर्यादा असत नाहीत. आपल्याला निवांत झोपायचे असेल तर बिबटय़ाच्या अंगावर मायेचे उबदार असे अभयारण्याचे वस्त्र घालावेच लागेल,’ या पुस्तकात मांडलेल्या या कळकळीच्या विचारांचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे, यात शंका नाही.
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com

प्रश्नमंजूषा क्रमांक ९
(राजहंस प्रकाशनाच्या सहकार्याने)

१. मराठीतल्या एका सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि सदरकाराने कोल्हटकरी नाटकांचे विडंबन करणारे ‘मेलो मेलो मेलो ड्रामा’ अर्थात ‘कोसळे आज इथे देव्हारा’ हे नाटक लिहिले. त्याचे लेखक कोण?
अ. जयवंत दळवी ब. संतोष पवार क. मुकुंद टाकसाळे ड. अजित दळवी.
२. ‘साष्टांग नमस्कार’, ‘ब्रँडीची बाटली’सारख्या विनोदी नाटकांच्या लेखकाचे हे आत्मचरित्र आहे-
अ. कऱ्हेचे पाणी ब. सारथी आणि घोडे क. आत्मचरित्राऐवजी ड. हसता हसता.
३. गाडगीळांच्या ‘बंडू’ कथांमध्ये त्याची पत्नी स्नेहलता आणि हा मित्र नेहमी आढळतो-
अ. तात्या ब. गुंडय़ा क. राजा ड. नानू.
४. ठणठणपाळ या नावाने जयवंत दळवी यांनी चालवलेल्या सदराचे नाव काय?
अ. घटका गेली पळे गेली ब. पळा पळा, कोण पुढे क. मुशाफिराची डायरी ड. अलाणे आणि फलाणे.
५. पुलंच्या साहित्याचे संकलन ‘पुलं एक साठवण’ या नावाने कोणी केले आहे?
अ. सुभाष भेंडे ब. मुकुंद टाकसाळे क. विजय तेंडुलकर ड. जयवंत दळवी.
६. जेम्स बाँड ब्रिटिश गुप्तहेराच्या व्यक्तिरेखेची टिंगल करणाऱ्या ‘जनू बांडे’ या व्यक्तिरेखेच्या विनोदी कथा कोणी लिहिल्या?
अ. दत्तू बांदेकर ब. सुहास शिरवळकर क. रमेश मंत्री ड. गंगाधर गाडगीळ.
७. ‘माकडाच्या हाती शँपेन’ या नाटकाचे लेखक कोण?
अ. संतोष पवार ब. मुकुंद टाकसाळे क. विवेक बेळे ड. गिरीष जोशी.
८. ‘निशाणी डावा अंगठा’ हा पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित चित्रपट कोणाच्या कादंबरीवर आधारित आहे?
अ. रमेश इंगळे ब. द. मा. मिरासदार क. व. पु. काळे ड. शंकर पाटील.
९. अमेरिकेविषयी ‘एक बेपत्ता देश’ अशा शीर्षकाचा लेख ‘जावे त्यांच्या देशा’ या प्रवासवर्णनपर पुस्तकात आहे. त्याचे लेखक कोण?
अ. रमेश मंत्री ब. पु. ल. देशपांडे क. सुभाष भेंडे ड. अनिल अवचट.
१०. खालीलपैकी कोणत्या पुस्तकास मानाचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार नाही?
अ. व्यक्ती आणि वल्ली (पु. ल. देशपांडे) ब. स्वामी (रणजित देसाई) क. ययाती (खांडेकर) ड. विशाखा (कुसुमाग्रज).
११. ‘हसरी गॅलरी’ या नावाने कोणत्या व्यंगचित्रकाराच्या चित्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे?
अ. वसंत सरवटे ब. शि. द. फडणीस क. श्याम जोशी ड. हरिश्चंद्र लचके.
१२. ‘व्यंकूची शिकवणी’ आणि ‘शिवाजीचे हस्ताक्षर’ या गाजलेल्या विनोदी कथांचे लेखक कोण?
अ. गंगाधर गाडगीळ ब. जयवंत दळवी क. व्यंकटेश माडगूळकर ड. द. मा. मिरासदार.

प्रश्नमंजूषा क्रमांक ८ चे विजेते
प्रथम पारितोषिक : १००० रूपये
नितीन प्रभाकर वैद्य, सोलापूर
द्वितीय पारितोषिक : ५०० रूपये
सुनंदा माधवराव वैद्य, धुळे
तृतीय पारितोषिक : ३०० रूपये
अरविंद श्रीधर पुजारी, सोलापूर

तुम्हीही ठरवा तुम्ही कसे वाचक आहात
बरोबर उत्तरे
६ पेक्षा कमी - सामान्य, अजून खूप वाचा.
६,७ - चांगले वाचक, पण अजून वाचा.
८,९ - उत्तम वाचक, वाचत राहा.
१०,११ - श्रेष्ठ वाचक, असेच वाचा.
१२ - महावाचक

विजेत्यांना ‘राजहंस’ प्रकाशनातर्फे बक्षिसे दिली जातील.
अकरा किंवा त्याहून जास्त उत्तरे बरोबर देणाऱ्या सर्व स्पर्धकांना राजहंस प्रकाशनातर्फे सवलत कुपनांची भेट दिली जाईल.

स्पर्धेचे नियम
प्रवेशिकेवर स्वत:चे नाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक, वय, ई-मेल ही माहिती लिहिलेली असावी.
प्रवेशिकेवर प्रश्नमंजुषा क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख असावा.
प्रवेशिका प्रश्नांची उत्तरे स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात लिहिलेली असावी.
प्रश्नांची उत्तरे पाठविण्याची शेवटची तारीख
६ जून, २००९
प्रवेशिका खालील पत्यावर पाठवाव्यात.
लोकमुद्रा प्रश्नमंजूषा,
लोकसत्ता, एक्सप्रेस टॉवर्स,
पहिला मजला,
नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१
प्रवेशिका ०२२ २२८४ ६२ ७७ या
फॅक्स क्रमांकावर अथवा
prashnamudra@gmail.com
या ई मेल वरही पाठवता येतील
संजय भास्कर जोशी
prashnamudra@gmail.com

स्मिता पाटील, बोरीवली यांनी विचारलेल्या ‘पक्षाची माहिती हवी’ या प्रश्नाचे
उत्तर
त्या पक्ष्याचे नाव ‘होमा’ असे आहे. होमा हे फारशीच्या ‘हुमा’ शब्दाचे भारतीय रूप असावे असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधात सृष्टिवैचित्र्य सांगत असताना या पक्ष्याचा उल्लेख आला आहे. मात्र त्याचे नाव दिलेले नाही. ओवी अशी आहे.
‘येक प्राणी अंतरिक्षी असती। तेही नाही देखिली क्षिती।
वरीच्या वरी उडोनी जाती। पक्ष फुटल्या नंतर रे।। दासबोध (१५.८.१९)
रामकृष्ण परमहंस आपल्या नित्यसिद्ध भक्तांना ज्यांना पार्थिवतेचा स्पर्शही झालेला नाही, त्यांना ते होमा पक्ष्याची उपमा देतात. ‘नित्यसिद्ध हा ‘होमा’सारखा असतो. ‘होमा’ पक्ष्याची मादी वर आकाशात खूप उंच ठिकाणी राहते. तेथे तिने अंडे दिल्यावर ते अंडे खाली पडू लागते. पाहता पाहता ते फुटून पिल्लू बाहेर येऊन त्याला पंख फुटतात नि डोळे येतात. परंतु जमिनीवर येऊन आदळण्यापूर्वीच ते सरळ आईकडे उडू लागते’ (रामकृष्ण वचनामृत खंड-२). असाच उल्लेख हिंदीतील संत तुलसीसाहेब हाथरसवाले यांनी एक दृष्टांत देताना केला आहे, पण त्यांनी त्या पक्ष्याचे नाव ‘अललपच्छ’ असे दिले आहे. बऱ्याच फारशी ग्रंथांत होमाचा उल्लेख आहे असे म्हणतात. होमा पक्ष्याची छाया ज्याच्यावर पडेल तो राजपदी बसतो. त्याची हत्या करणारा ४० दिवसांत मरण पावतो अशा समजुती आहेत. हा एक सांकेतिक/ काल्पनिक पक्षी आहे, असेही म्हटले जाते.
- शांताराम मंजुरे, मालाड

अशोक परब, ठाणे यांनी विचारलेल्या श्राद्ध कशाला म्हणतात! श्राद्ध करतेवेळी पितर दिसतात का? या प्रश्नाचे
उत्तर १. परमेश्वरावर आपली श्रद्धा असते. श्रद्धेपोटी किंवा विश्वासाने परमेश्वर जसा दिसतो तसे श्राद्ध होय. श्रद्धा आणि श्राद्ध या शब्दांत फरक एका कान्याचा आहे. श्रद्धा म्हणजे परमेश्वराचे चिंतन. श्राद्ध म्हणजे आपल्या कुळातील मृत पावलेल्या व्यक्तीची त्या दिवसाच्या तिथीसह एक आठवण- साठवण आहे. श्रद्धा व श्राद्ध यामध्ये ‘द्धा’ वरचा काना ‘श्र’ वर गेल्यावर श्राद्ध होतो. ‘श्र’वरचा काना ‘द्ध’वर गेल्यावर श्रद्धा होतो. याचा अर्थ श्रद्धेने जर श्राद्ध केले तर नक्कीच पितरांचे दर्शन होते. ते पितर आपल्या मन:चक्षूसमोर उभे राहतात.
यशवंत वाळवेकर,
पुणे
अशोक परब, ठाणे यांनी विचारलेल्या पत्नी पतीच्या डाव्या बाजूला केव्हा केव्हा बसते? या प्रश्नाचे उत्तर
ज्या वेळी एखादे धार्मिक कार्य पती-पत्नी मिळून जोडीने करतात त्या वेळी पत्नीची जागा कोणत्या बाजूला याबद्दल स्मृतिवचन-
‘यज्ञे होमे व्रते दान स्नानपूजा दि कर्माणि।
देवयात्रा विवाहेषु पत्नी दक्षिणत: शुभा।।
आशिर्वादेऽभिषेकेच व पादप्रक्षालने तथा।
शयने भोजने चैव पत्नी तूत्तरतो भवेत्।।
म्हणजे यज्ञ, होम, व्रत, दान, स्नान, देवपूजा, देवयात्रा, विवाह या कर्मात पतीच्या उजव्या हातास पत्नीने बसावे. आशीर्वाद घेताना, अभिषेक करून घेताना, पूजनीय व्यक्तीचे पादप्रक्षालन करताना, शय्येवर आणि भोजनास बसताना पत्नीची जागा पतीच्या डाव्या हातास असावी.
आ. म. वझे, पुणे

कमल शिंगटे यांनी विचारलेल्या रामनवमीला सुंठवडा का वाटतात या प्रश्नाचे
उत्तर
सुंठवडय़ाबद्दलच्या या प्रश्नाने मला गोंदवलेकर महाराजांच्या विचारांची आठवण करून दिली. प.पू. महाराज म्हणतात की, रामनाम हे सुंठीसारखे आहे. एखादा घटक कमी किंवा जास्त झाल्यास सुंठ घातल्याने समायोजन (Adjustment) होते, हा सुंठीचा गुणधर्म आहे.
सुरेश उपाध्ये यांनी विचारलेला नंदीविरहित शिवमंदिरातील उपासनेबद्दलचा प्रश्न वाचून जन्यजनक भावाप्रमाणे १४/१५ वर्षांपूर्वी नाशिकला एका शिवमंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितलेली माहिती आठवली. शंकरांनी ब्रह्मदेवाला आपले मस्तक कुठे संपले ते पाहायला पाठविले. (डोकं (मस्तक) अनादि असल्याने ब्रह्मदेव जितक्या वर जाई, त्याहूनही वर शंकराचे मस्तक जाई. ते कुठेच संपत नव्हते) ब्रह्मदेव खोटं बोलला त्यामुळे रागावून शंकराने त्याच्या चार तोंडांपैकी एक तोंड उडविले. शंकराला ब्रह्महत्येचे पाप लागले. तेव्हा नंदीने पापमुक्त होण्यासाठी काही उपाय (तोडगा) सांगितला. तो केल्याने शंकर पापमुक्त झाले. नंदीवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने नंदीला वरदान दिले. ‘तू माझा गुरू झाल्यामुळे या शिवमंदिरात तू असणार नाहीस.’ त्या स्थानात शंकराने नंदीचा गुरू म्हणून बहुमान केला.
रामकृष्ण परमहंस - कुणाचाही भाव दुखवू नका. दुसऱ्यांना तुम्ही चुकीचे ठरविता. कशावरून तुमचे बरोबर आहे?
जो जैसा भजे मला। मी तैसा पावे त्याला - साईबाबा
अनन्याश्चिंतयतो मां ये जना: पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम् वहाम्यहम्। भ.गी. ९(२२)
परमेश्वर एखाद्या कर्माचा हेतू पाहतो, परिणाम नाही.
- तत्त्वज्ञान मासिक - प. पू. आठवलेशास्त्री
- स्मिता दत्तात्रय पाटील, बोरीवली.